आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये यशराज राऊळला कांस्य पदक
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील आंबोली गावचा होतकरू युवा खेळाडू यशराज प्रसाद राऊळ याने नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित १७ व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरी करत कांस्य पदक पटकावले आहे. या उल्लेखनीय यशामुळे आंबोलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव वाढला असून सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दि. ३ ते ४ जून २०२६ दरम्यान पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५० किलो वजन गटात सहभागी झालेल्या यशराजने उत्कृष्ट कौशल्य, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत कास्य पदकावर आपले नाव कोरले.अवघ्या १५ व्या वर्षी स्थानिक स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत यशाची भरारी घेणाऱ्या यशराजच्या या यशामगे त्याचे पालक, आंबोली पब्लिक स्कूलचे मार्गदर्शक सोनु जाधव, आजोबा जगजीवन आत्माराम राऊळ तसेच शाळेचे प्राचार्य विलास मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.यापूर्वीही यशराजने विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विजापूर (कर्नाटक) येथे २०२५ मध्ये रौप्यपदक, कोल्हापूर ज्युडो स्पर्धेत सुवर्णपदक तसेच विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदके मिळवत त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.