आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत याशिताला सुवर्ण
वृत्तसंस्था/ मनामा
बहरीनमधील मनामा येथे सुरू असलेल्या युवा आशियाई क्रीडा स्पर्धेत सहा भारतीय बॉक्सर्सनी अंतिम फेरीत प्रवेश करून सहा पदके निश्चित केली तर किशोरवयीन कुस्तीगीर याशिताने तिच्या उर्जेचा पुरेपूर वापर करून कझाकस्तानच्या बलवान प्रतिस्पर्ध्यावर मात केली आणि मुलींच्या 61 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. अत्यंत चुरशीच्या लढतीत, 17 वर्षीय याशिताने कझाकस्तानच्या झैदर मुक्तारचा पराभव केला आणि दोघांनी 5-5 अशी बरोबरी केल्यानंतर मिळवलेल्या शेवटच्या गुणाच्या आधारे हा सामना जिंकला.
याशिताने तत्पूर्वी उपांत्य फेरीत किर्गिस्तानच्या अकिलाई छिनीबाएवाचा 6-0 असा पराभव केला होता. याशिताच्या अव्वलस्थानामुळे भारताची पदकांची संख्या 26 झाली, ज्यामध्ये चार सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्यपदकांचा समावेश आहे. 47 सुवर्णांसह एकूण 100 पदकांसह चीक आघाडीवर आहे तर भारत पदक तालिकेत 11 व्या स्थानावर आहे.
बॉक्सिंगमध्ये, भारताच्या 15 वर्षीय खुशी चंदने मंगोलियाच्या अल्तानझुल अल्तांगदासला 5-0 असे पराभूत करून मुलींच्या 46 किलो वजनी गटात अंतिम स्थान मिळवले. गुरुवारी होणाऱ्या जेतेपदाच्या लढतीत तिची गाठ चीनच्या चेन फांग-यूशी पडेल. मुलींच्या 54 किलो वजनी गटात, चंद्रिका पुजारीला कझाकस्तानच्या रमिना माखानोवावर 5-0 अशी एकतर्फी मात करून अंतिम फेरी गाठली. उझबेकिस्तानच्या 15 वर्षीय कुमरिनीसो मुहम्मदोवाशी तिची जेतेपदाची लढत होईल. हरनूर कौरची 66 किलो वजनी गटातील लढतही एकतर्फी ठरली. तिने चीन तैपेईच्या लू वेन-जिंगला 5-0 असे पराभूत करून कझाकस्तानच्या अयाउलिम ओस्पानोव्हाविरुद्ध सुवर्णपदकाची लढत निश्चित केली तर 80 किलोपेक्षा जास्त वजनी गटात अंशिकाने चीनच्या गुओ जियाकिंगला हरवले. अंतिम फेरीत ती कझाकस्तानच्या एलनुरा कोंगयाटशी गाठेल.
मुलींच्या 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत, अहाना शर्माला उझबेकिस्तानच्या नाझोकत मार्डोनोव्हाविरुद्ध 3-2 असा विजय मिळाला. अंतिम फेरीत तिचा सामना डीपीआर कोरियाच्या मा जोंग हयांगशी होईल. मुलांच्या गटात, लांचेनबा सिंगने 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत डीपीआर कोरियाच्या अन फ्योंग गुकविरुद्ध 5-0 असा विजय मिळवला आणि कझाकिस्तानच्या झुमागाली नुरमाखानशी जेतेपदाची लढत निश्चित केली.
बॅडमिंटनमध्ये, सूर्याक्ष रावतने दुसऱ्या फेरीतील अडथळा पार करून चीनी-तैपेईच्या हुआंग ज्युन-काईचा 21-14, 21-19 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर मिश्र दुहेरी जोडी जैसन ब्योर्न आणि एंजेल पुनेरा यांनी फिलीपिन्सच्या रामोस रोक्विन आणि शाची काल्डेरॉनचा 21-10, 21-13 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मुलींच्या एकेरीत वेन्नला कलागोटलाने फिलीपिन्सच्या इव्ह बेजासावर 21-10, 21-12 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर मुलांच्या एकेरीत टंकारा तालासिलाने फिलीपिन्सच्या प्रतिस्पर्ध्यावर सहज विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसमध्ये, दिव्यंशी भौमिकने थायलंडच्या 14 वर्षीय पनीता विजिथमचा 11-7, 11-6, 11-4 असा पराभव करून मुलींच्या पुढील फेरीत प्रवेश केला, तर सिंद्रेला दास आणि सार्थक आर्य यांच्या मिश्र दुहेरी संघाने कोरियाच्या सेउंगसू ली आणि हियो येरिम यांच्यावर 3-2 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पोहण्यात, भारताची किशोरवयीन खेळाडू धिनीधी देसिंगूने मुलींच्या 100 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत 57.72 सेकंद वेळेसह पाचवे स्थान मिळवले.