For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यशस्वी जैस्वाल फेब्रुवारीतील सर्वोत्तम क्रिकेटपटू

06:04 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
यशस्वी जैस्वाल फेब्रुवारीतील सर्वोत्तम क्रिकेटपटू
Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

आयसीसीतर्फे पुरूष आणि महिलांच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंची निवड प्रत्येक महिनाअखेर त्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन केली जाते. सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वाल याची फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. जैस्वालने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 712 धावा झळकविताना 2 द्विशतके नोंदविली.

फेब्रुवारी महिन्यात यशस्वी जैस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक नवे विक्रम नोंदविले. राजकोटच्या सामन्यात त्याने द्विशतक झळकविताना एका डावात सर्वाधिक म्हणजे 12 षटकार ठोकत कसोटीतील यापूर्वीच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. या मालिकेत जैस्वालने 2 द्विशतके तर 3 अर्धशतके नोंदविली. या मालिकेतील विशाखापट्टणमच्या कसोटीत त्याने 219 धावा झळकविल्या होत्या. राजकोटच्या सामन्यात त्याने नाबाद 214 धावांची खेळी केली. जैस्वालने आपल्या वयाच्या 22 वर्षे आणि 49 दिवस पाठोपाठ द्विशतके झळकविणारा तो भारताचा तिसरा युवा फलंदाज आहे. यापूर्वी कसोटीत क्रिकेटमध्ये असा विक्रम ऑस्ट्रेलियाचे दिवंगत सर डोनॉल्ड ब्रॅडमन आणि भारताच्या विनोद कांबळीने केला होता. तसेच या मालिकेतील पहिल्या तीन कसोटी सामन्यात जैस्वालने 112 धावांच्या सरासरीने 560 धावा जमविताना 20 षटकार ठोकले. जैस्वालने कसोटीतील आपला एक हजार धावांचा टप्पाही पार केला आहे. आयसीसीच्या फेब्रुवारी महिन्यातील या सर्वोत्तम पुरस्काराच्या शर्यतीमध्ये न्यूझीलंडच्या केन विल्यिमसन आणि लंकेचा पी. निशांका यांचा समावेश होता. पण जैस्वालने या दोन्ही प्रतिस्पर्धांना मागे टाकत आयसीसीचा हा पुरस्कार पहिल्यांदा पटकाविला.

Advertisement

Advertisement
Tags :

.