यश यादव, करुणा कॉम, खुशी राणा विजयी
वृत्तसंस्था, ताश्कंद (उझ्बेक )
येथे सुरू असलेल्या 15 आणि 17 वर्षांखालील वयोगटातील मुले आणि मुलींच्या आशिया मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या यश यादव, करुणा कॉम, खुशी राणा, समिर बोहरा, हंशिका अत्री यांनी विविध वजन गटात प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदवित आपल्या मोहिमेला प्रारंभ केला.
17 वर्षांखालील मुलांच्या विभागात 50 किलो वजन गटातील पहिल्या लढतीत यश यादवने तुर्कीच्या अहमेदोवचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव केला तर 60 किलो वजन गटात भारताच्या करुणा अल्बर्टसन कॉमने ताजिकिस्थानच्या अली नाझारोव्ह वर 4-1 अशा गुणांनी विजय मिळविला. मुलांच्या 52 किलो वजन गटातील सलामीच्या लढतीत ताजिकिस्थानच्या दामीरने भारताच्या गोपाल गणेशीचा 3-2 अशा गुणांनी पराभव केला. चीनच्या लिओने 57 किलो वजन गटात भारताच्या प्रशांत मिश्राचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला.
मुलींच्या 15 वर्षांखालील वयोगटातील खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या 49 किलो वजन गटातील लढतीत भारताच्या खुशी राणाने व्हिएतनामच्या नेगुयेनचा पराभव केला तर 46 किलो गटात भारताच्या हंशिका अत्रीने उझ्बेकच्या व्हिसोलाचा 5-0 अशा गुणफरकाने एकतर्फी पराभव केला. 55 किलो गटात कझाकस्थानच्या सलमानने भारताच्या नित्या पांडेचा निसटता पराभव केला. मुलांच्या 15 वर्षांखालील वयोगटातील लढतीत भारताच्या समीर बोहराने 43 किलो वजन गटात चीन तैपेईच्या चँगचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव केला.