महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘यशा’ला झालर दु:खाची!

06:30 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कर्नाटकासह दक्षिणेकडील राज्यात चित्रपट अभिनेत्यांबाबतच्या चाहत्यांची संख्या ही मोठी पाहायला मिळते. अभिनेत्याच्या वाढदिवशी तर चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आलेला असतो. या उत्साहाच्या भरातच अभिनेत्याच्या वाढदिनानिमित्त कटआऊट उभारताना गदग जिल्ह्यात एक दु:खद घटना घडली आणि तीन चाहत्यांना जीव गमवावा लागला. तर दुसरीकडे राज्यात आता लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेससह भाजप व इतर पक्ष तयारीत गुंतल्याचे पहायला मिळते आहे.

Advertisement

कर्नाटकासह दक्षिणेतील अनेक राज्यात चित्रपट अभिनेत्यांचे फॅन फॉलोअर मोठा असतो. काही वेळा आपल्या आवडत्या अभिनेत्याबद्दलचा अभिमान इतका अतिरेकाला पोहोचतो की चाहत्यांना जीव गमवावा लागतो. केजीएफ फेम यशच्या वाढदिवसादिवशी त्याचा कटआऊट उभारताना विजेचा धक्का बसून तीन तरुण दगावले आहेत. गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वरजवळील सुरणगी येथे ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत दगावलेले तीनही तरुण विशीतले आहेत. आणखी तिघे जण जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आपल्या चाहत्यांच्या मृत्युमुळे यशलाही धक्का बसला आहे. त्याच दिवशी आपले सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून यश सुरणगीत आला. मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. भविष्यात या तिनही कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची ग्वाहीही त्याने दिली आहे. कुटुंबीय दु:खात आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक मदत जाहीर करणे योग्य ठरणार नाही, असे सांगतानाच आपल्या वाढदिवसाला कोणीही कटआऊट, बॅनर बांधू नका, असे आवाहनही या आघाडीच्या अभिनेत्याला करावे लागले.

Advertisement

एखाद्या अभिनेत्याच्या निधनानंतर अनेक जण आत्महत्या केल्याचे उदाहरणे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यात आहेत. आत्महत्या केली नाही तरी निधनाच्या धक्क्याने अनेकांचे मृत्यू झाले आहेत. विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या तीन तरुणांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून परत जाणाऱ्या यशच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या आणखी एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याला जवळून पाहण्यासाठी, त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी तरुणाईच्या मनात असलेली ओढ किती महागात पडते, हे गदग जिल्ह्यातील घटनेवरून पुन्हा एकदा सामोरे आले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. 8 जानेवारी रोजी यशचा वाढदिवस होता. केजीएफच्या यशानंतर यश आपल्या वाढदिवसादिवशी बेंगळूरला रहात नाही. अलीकडे आपल्या चाहत्यांची माफी मागून तो कुटुंबीयांसह बाहेर जातो. यंदाही वाढदिवसा दिवशी तुम्हाला भेटता येणार नाही, असे यशने सांगितले होते. मात्र, चाहत्यांच्या अपघाती मृत्युमुळे त्याला गदगला यावे लागले.

अभिनेत्याला पाहण्यासाठीचा किंवा त्याच्यावर प्रेम क्यक्त करण्यासाठीचा अतिरेक कुटुंबीयांना महागात पडतो. या घटनेने मृत तरुणांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कोणाचेही जीव धोक्यात येतील, अशा पद्धतीचा अतिरेक करू नका, असे वारंवार अभिनेते आवाहन करीत असतात. मात्र, आपल्या आवडत्या अभिनेत्याबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी सुरणगी येथील तीन तरुणांनी जीव गमावला आहे. खरे तर या घटनेनंतर जागृती व्हायला हवी होती. अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याबरोबरच प्रत्येकाचा जीव मोलाचा आहे. आपल्यावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे, याचे भान चाहत्यांना करून देण्याचे काम व्हायला हवे होते. तसे होताना दिसत नाही. दक्षिणेतील राज्यात राजकीय नेत्यांपेक्षाही चित्रपट अभिनेत्यांना मोठे स्थान आहे. केवळ त्यांच्यावर प्रेमच नव्हे तर त्यांची आराधना केली जाते. काही अभिनेत्यांची तर मंदिरेही बांधण्यात आली आहेत. तुमच्या प्रत्येक दु:खात आपण सहभागी असणार आहे, असे यशने त्या तिन्ही तरुणांच्या कुटुंबीयांनी सांगितले असले तरी झालेली हानी भरून न येणारी आहे. त्यामुळे पालकांनीच आपल्या पाल्यांना शहाणपण सुचविणे गरजेचे आहे.

कर्नाटकात चित्रपट अभिनेत्यांचा वाढदिवस असो किंवा दिवंगत अभिनेत्यांचे पुण्यस्मरण असो, रक्तदान, अन्नदान असे उपक्रम त्यांचे चाहते राबवत असतात. राजधानीत तर सेलेब्रेटींचे शंभर फुटी कटआऊट उभे करून त्याला दुधाचा अभिषेक घातला जातो. काही चाहते तर आपल्या रक्ताने आवडत्या अभिनेत्याला पत्र पाठवतात. कटआऊटला दुधाचा अभिषेक घालण्यापेक्षा गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलणे, गरीब रुग्णांच्या औषधोपचारासाठी मदत करणे, निराश्रीतांना आधार देणे अशा विधायक उपक्रमातूनही आपल्या आवडत्या अभिनेत्याबद्दलचे प्रेम व्यक्त करता येते. असे उपक्रम अनेक संघटनांनी हाती घेऊन अनेकांसमोर आदर्श घालून दिले आहेत. अशा विधायक उपक्रमामुळे आपण ज्या अभिनेत्यावर प्रेम करतो, त्यांनाही आपल्या चाहत्यांबद्दल प्रेम, आनंद आणि अभिमान वाटतो. कर्नाटकातील बहुतेक अभिनेत्यांच्या चाहत्यांच्या संघटना आहेत. सिनेमा रिलीज होताना तर या चाहत्यांचा उत्साह मोठा असतो. या उत्साहाचा अतिरेक होऊन एखादी अप्रिय घटना होऊ नये, याची जाण कोणीतरी करून देणे गरजेचे आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला प्रारंभ

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप व त्यांचा मित्रपक्ष असणारा निजद यांची तयारी सुरू झाली आहे. गेले दोन दिवस काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला बेंगळूरमध्ये आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिंगायत, अल्पसंख्याक व मागासांसाठी उपमुख्यमंत्रीपद द्यावे, या मागणीने पुन्हा उचल खाल्ली आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या मागणीने जोर धरला आहे. कर्नाटकातील अधिकाधिक जागांवर विजय मिळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेस हायकमांडसाठी ही मागणी डोकेदुखीची ठरू लागली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तर निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्रीपदाची चर्चाच योग्य नाही, असे जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या वेगाला वेसण घालण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या समर्थक नेत्यांची ही राजकीय खेळी आहे. याबरोबरच लोकसभेसाठी डझनभर मंत्र्यांना उमेदवारी देण्याची चर्चाही काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेसमधील अस्वस्थता वाढतीच आहे. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार याची जाण प्रत्येक नेत्याला आहे. तरीही सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोन नेत्यातील सत्तासंघर्ष सुरूच आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article