राखीव गोलंदाजांत खलील अहमदच्या जागी यश दयालची निवड
वृत्तसंस्था/ पर्थ
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंच्या यादीत आता डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल सामील झाला आहे. राखीव खेळाडूंच्या यादीत असणाऱ्या खलील अहमदला दुखापत झाली असून त्याला मायदेशी पाठवण्यात आले आहे. त्याच्या जागी दयालला स्थान मिळाले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत दयालचा कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. नंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याला टी-20 संघातही सामील करण्यात आले. मात्र त्याला एकाही सामन्यात खेळविण्यात आले नव्हते. त्याने जोहान्सबर्गहून थेट पर्थला प्रयाण केले आहे. खलील अहमदची दुखापत चिघळली असल्याने त्याला नेटमधील सरावावेळी गोलंदाजी करता आली नाही. मेडिकल टीमने त्याला विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्याला मायदेशी पाठवण्यात आले तर दयालला पर्थला पाठविण्यात आले. ‘दोघांची गोलंदाजी सारखीच असल्याने दयालला निवडण्यात आले. मिचेल स्टार्कला भारतीय संघाला सामोरे जावे लागणार असल्याने त्याचा सराव व्हावा यासाठी दयालला संधी दिली आहे. दयाल आधी अ संघातून कसोटीत खेळणार होता. पण त्याला थेट दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात आले. खलील गोलंदाजी करणार नसल्याने त्याला तेथे ठेवण्यात काहीच अर्थ नाही, म्हणून त्याला मायदेशी पाठवण्यात आले,’ असे बीसीसीआयमधील सूत्राने या घडामोडीबद्दल सांगितले.
सईद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेत आयपीएल लिलावाआधी खलील अहमद खेळणार आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याला दिल्ली कॅपिटल्सने मुक्त केले असल्याने लिलावात त्याचाही समावेश असेल. दयालला आरसीबीने रिटेन केले आहे. मंगळवारी यशस्वी जैस्वालच्या खांद्याला वेदना जाणवत होत्या. पण बुधवारी त्याने सरावात भाग घेतल्याने सर्वांना दिलासा मिळाला.