दिल्लीत यमुनेने गाठली धोकापातळी
दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस : 10 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाची राजधानी दिल्लीसह एनसीआर प्रदेशात पूर इशारा असताना बुधवारी पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. दिल्लीच्या सखल भागात यमुना नदीला पूर आल्यामुळे पाण्याची पातळी 207.40 मीटरपर्यंत वाढली आहे. ही उंची धोकापातळीच्या वर पोहोचल्यामुळे हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पावसामुळे एनसीआरमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहनचालकांना अडचणी येत आहेत. गुरुग्राममध्येही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

देशभरात मान्सूनच्या पावसाचा कहर सुरूच आहे. दिल्लीपासून जम्मू-काश्मीरपर्यंत पावसाने कहर केला आहे. राजधानी दिल्ली आणि त्याच्या आसपासचा परिसरही या कहरातून सुटलेला नाही. सततच्या पावसामुळे आणि आजूबाजूच्या राज्यांच्या धरणांमधून पाणी सोडल्यामुळे दिल्लीतून जाणारी यमुना नदी दुथडी भरली आहे. नदीचे पाणी धोक्याची पातळी ओलांडून जवळच्या सखल भागात शिरले आहे. 3 ऑगस्टला यमुनेची पाणीपातळी 207.40 मीटरपर्यंत वाढली होती. ही पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा (205.33 मीटर) खूपच जास्त आहे. दरम्यान, हवामान खात्याने 6 सप्टेंबरपर्यंत दिल्ली-एनसीआरमध्ये असाच पाऊस सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
राजधानी व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मूसह संपूर्ण उत्तर भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये बुधवारीही मुसळधार पाऊस सुरू होता. 23 जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. 1200 हून अधिक गावे पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. 3 जण बेपत्ता आहेत. 7 सप्टेंबरपर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हरियाणामध्ये झज्जर, हिसार, यमुनानगर, कुरुक्षेत्र आणि पंचकुलाच्या अनेक भागात 3-5 फूटांपर्यंत पाणी आहे. येथील 200 हून अधिक शाळा बंद आहेत. अंबालामधील शेकडो घरे 2-4 फूट पाण्याने भरली आहेत. हथिनीकुंड बॅरेजमधून 67 तासांपासून सतत पाणी सोडले जात आहे. राजस्थानातील जयपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. येथील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय एसएमएसमध्ये पाणी शिरले आहे. त्याचवेळी कोटाच्या दारा रेल्वेस्थानकाजवळील रेल्वेट्रॅकवर भूस्खलन झाले आहे.
दिल्लीत 15 हजार लोक विस्थापित
दिल्लीत यमुना नदीजवळ बांधलेला लोखंडी पूल बंद करण्यात आला आहे. यमुना बाजार-तिबेटी बाजार, मठ बाजार यासह सखल भागात पाणी भरले आहे. येथून 10 हजारहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता लोहा पुलाजवळ नदीची पाण्याची पातळी 206.85 मीटर होती. यामुळे सखल भागातील लोकांच्या घरात पाणी शिरले. सुमारे 15 हजार लोक मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. बुधवारी दिल्लीतील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.