‘शाह बानो’ची व्यक्तिरेखा साकारणार यामी
बॉलिवूडची दमदार अभिनेत्री यामी गौतम आणि इमरान हाशमी एका पॉवरफुल कोर्टरुम ड्रामामध्ये दिसून येणार आहेत. हा चित्रपट 1985 साली सर्वोच्च न्यायालयात झालेल्या ऐतिहासिक शाह बानो विरुद्ध मोहम्मद अहमद खान खटल्यावर आधारित आहे. यावर आधारित चित्रपटात यामी गौतम मुख्य भूमिका साकारणार आहे.
स्वत:च्या अधिकारासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढलेल्या महिलेची ही कहाणी आहे. चित्रपटाची कहाणी मुस्लीम महिलांचे अधिकार, घटस्फोटानंतर निर्वाह भत्ता आणि सामाजिक अन्यायाच्या विरोधात उठलेल्या एका आवाजाला दर्शविणार आहे. यात इम्रान हाश्मी संबंधित पतीची भूमिका साकारणार आहे. या खटल्यात अहमद खानने स्वत:च्या पत्नीला तिहेरी तलाक देत सोडून दिले होते आणि मग निर्वाह भत्ता देण्यास नकार दिला होता.
यामी गौतम यापूर्वी ‘आर्टिकल 370’ चित्रपटात दिसून आली आहे. यातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. तर इमरान हाश्मी अलिकडेच ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटातून झळकला आहे. यात त्याने बीएसएफ अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.