यामाहा-रायझर व फॅसीनो परत मागविल्या
1 जानेवारी 2022 ते 4 जानेवारी 2024 दरम्यानच्या उत्पादीत स्कूटरचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडिया यामाहा मोटारने 1 जानेवारी 2022 ते 4 जानेवारी 2024 दरम्यान उत्पादन घेतलेल्या रायझर 125 एफआय हायब्रिड आणि फॅसीनो 125 एफआय हायब्रिड स्कूटरच्या अंदाजे 3 लाख युनिट्स परत मागविल्या असल्याची माहिती आहे. कंपनीने सांगितले की 125 सीसी स्कूटरच्या दोन्ही निवडक युनिट्समधील ब्रेक लिव्हर फंक्शनमधील समस्या दूर करण्यासाठी या गाड्या परत मागविण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.
कंपनीने म्हटले आहे की, सदरच्या स्कुटरचे बदलण्यात येणारे पार्ट्स हे संबंधीत ग्राहकांना मोफत उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. परत करताना स्कूटरची पूर्ण पडताळणी करुनच ती जमा करून घेण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने या दरम्यान दिले आहे.
संबंधीत ग्राहकांना जवळच्या यामाहा सेवा केंद्राला देखील भेट देता येऊ शकते किंवा अधिक माहितीसाठी टोल-फ्री नंबर 1800-420-1600 वर इंडिया यामाहा मोटरशी इच्छुक संपर्क साधू शकतात.
दोन्ही स्कूटरच्या सुमारे 3,00,000 युनिट्स परत मागवण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने गाड्या परत मागवण्याची ही कंपनीसाठी पहिलीच वेळ असल्याचे समजते. जुलै 2012 मध्ये एसआयएएमच्या ऐच्छिक रिकॉलची संहिता लागू झाल्यापासून कंपनीने एकूण 63,977 युनिट्स परत मागवल्या आहेत.
यामाहाची एकूण परत मागवायच्या गाड्यांची संख्या 3,63,977 युनिट्स झाली आहे. कंपनीने यापूर्वी जुलै 2013 मध्ये 56,082 सिग्नस रे स्कूटर, मार्च 2014 मध्ये 138 आर 1 मोटरसायकल आणि डिसेंबर 2019 मध्ये 7,757 एफझेड 150 बाइक्स परत मागवल्या होत्या.