For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यज्ञ कल्पवृक्षाप्रमाणे मनोरथ पूर्ण करणारा आहे

06:44 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
यज्ञ कल्पवृक्षाप्रमाणे मनोरथ पूर्ण करणारा आहे
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

बाप्पा सांगतायत की, ईश्वराने दिलेलं काम हे त्याचंच असतं आणि आपल्यावर ते त्यानं सांगितल्याप्रमाणे करायची जबाबदारी असते. मग ते सुरू झालं की, ईश्वराला सांगून टाकायचं की, तू काम करायची जेव्हढी प्रेरणा देशील तेव्हढे काम केलं की, माझी जबाबदारी संपली.

मग तुझ्या इच्छेनुसार ते पूर्ण होवो किंवा अपूर्ण राहो. यशापयशाचा तूच धनी आहेस. तेव्हा तुला योग्य वाटेल तसा निर्णय घे. यालाच कर्म ईश्वराला अर्पण करणे असं म्हणतात. तेव्हा निरपेक्षतेनं कर्म कर आणि मला अर्पण कर म्हणजे तू सदासमाधानी राहशील. आपण करत असलेलं कर्म ईश्वराचे असून ते करून झाल्यावर त्याला अर्पण करायचे आहे हे लक्षात राहण्यासाठी कर्म करत असताना सतत ईश्वराचे स्मरण करावे. अशा पद्धतीने तू कर्म करू लागलास की कर्माच्या सुरवातीपासून तुला आनंद मिळायला सुरवात होईल.

Advertisement

बाप्पा वारंवार हे सांगत आहेत तरीही काही केल्या माणसाची समजूत पटत नाही. घरातली वडीलधारी माणसे लहान मुले चुकल्यावर त्यांना वारंवार सांगत असतात की, बाबारे तू चुकतो आहेस. वेळीच आपली चूक सुधार म्हणजे भविष्यात तुझे कल्याण होईल. त्याप्रमाणे आपले परमपिता असलेले बाप्पा आपल्याला आईच्या मायेने सध्या आपण अभ्यासत असलेल्या श्लोकात समजावून सांगून, सावध करतायत. ते

म्हणतायत,

मदर्थे यानि कर्माणि तानि बध्नन्ति न क्वचित्। सवासनमिदं कर्म बध्नाति देहिनं बलात् ।।9।।  ह्या श्लोकाचा अर्थ असा की, अरे माझ्यासाठी माणसाने केलेली कर्मे त्याला कधीही बंधनकारक होत नाहीत. मात्र माणसाने मनात कर्मफलाची वासना ठेऊन केलेलं कर्म त्याच्या इच्छेनुसार किंवा त्याला करावंसं वाटतंय म्हणून तो करतो. असं केलं की, तो बंधनात अडकतो आणि हे बंधनच त्याच्या पुनर्जन्मास कारणीभूत होते.

बाप्पा वरेण्य राजाला उपदेश करताना सर्वसामान्य लोकांनाही त्याचा उपयोग व्हावा अशा इच्छेने कर्मयोगाबद्दल सविस्तर सांगत आहेत. जेणेकरून मनात कोणतीही शंका राहू नये. ते म्हणतात,

वर्णान्सृष्ट्वावदं चाहं सयज्ञांस्तान्पुरा प्रिय।

यज्ञेन ऋध्यतामेष कामद कल्पवृक्षवत् ।। 10 ।।

अर्थ- हे प्रिया, यज्ञासहवर्तमान (ब्राह्मणादि) वर्णांना पूर्वी मी निर्माण करून सांगितले की, यज्ञाने तुम्ही आपली समृद्धि करून घ्या. हा यज्ञ कल्पवृक्षाप्रमाणे मनोरथ पूर्ण करणारा आहे.

बाप्पा म्हणतात, हे प्रिय वरेण्य राजा, मी प्रत्येकाला कामे नेमून देत असतो. ही कामे त्यांच्या पूर्वकर्मानुसार त्यांच्या वाट्याला आलेली असतात. प्रत्येकाचा उद्धार व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्यादृष्टीने कर्मबंधन तुटण्यासाठी त्यांच्या हातून कर्मयोगाचे आचरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी माझी अशी अपेक्षा आहे की, वाट्याला आलेले काम प्रत्येकाने काहीही कुरकुर न करता आणि निरपेक्ष भावनेने करावे आणि मला अर्पण करावे. थोडक्यात माझी कितीही इच्छा असली आणि मी कितीही समजावून सांगितलं तरी एखाद्या माणसाचा उद्धार मी करू शकत नाही.

माणसाने स्वत:चा उद्धार होण्याच्या दृष्टीने स्वत:च प्रयत्न करायचे असतात. त्यासाठी मार्गदर्शक तत्व म्हणून यज्ञयागादी पवित्र कर्तव्ये व कुणी कोणते काम करायचे याचे वेदात सविस्तर वर्णन आलेले आहे. त्यानुसार मनुष्याने त्याची कर्तव्ये पार पाडावीत. प्रत्येकाला नेमून दिलेले काम हे त्याच्या दृष्टीने पवित्रच आहे म्हणजे एकप्रकारे ते यज्ञकर्मच आहे. ते त्याने निरपेक्षतेनं केलं की, देवता प्रसन्न होतात आणि या प्रसन्न झालेल्या देवता कल्पवृक्ष ज्याप्रमाणे जे मागेल ते देत असतो त्याप्रमाणे तुमच्या ज्या इच्छा तुमचं भलं करणाऱ्या असतात त्या सर्व अवश्य पुरवतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.