For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यज्ञ-वेत्ते चि हे सारे यज्ञाने दोष जाळिती

06:37 AM Feb 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
यज्ञ वेत्ते चि हे सारे यज्ञाने दोष जाळिती
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

योगी यज्ञामध्ये इंद्रियरुपी कुंडात त्याच्या सर्व इच्छांची आहुती देतो. हे करताना तो परब्रह्माशी एकरूप झाल्याने, तो त्याच्या शुद्ध स्वरूपात विरघळून जातो. येथे यज्ञाक्रियांचे काम संपते. त्यांची अष्टांगयोग साधना पूर्ण होते. अशावेळी त्याचे मन निर्विचार झालेले असल्याने त्याच्या मनात कोणत्याही विचारांचा प्रवेश होत नाही, कोणत्याही इच्छेचा प्रवेश होत नाही. यज्ञकर्त्याच्या सर्व वासना निमल्यामुळे मी म्हणजे हा देह ह्या कल्पनेचा समूळ नाश झालेला असल्याने तो संपूर्ण निरिच्छ होतो.

पुढे भगवंत म्हणाले, दुसरे काही योगी आहाराचे नियमन करतात आणि प्राणाचा प्राणवायूत होम करतात. हे करू शकणारे योगी यज्ञाने पापाचा नाश करून टाकतात.

Advertisement

प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडुनी । यज्ञ-वेत्ते चि हे सारे यज्ञाने दोष जाळिती ।। 30 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, कित्येक योगी वज्रासनात बसून मुळंबंधाच्या पद्धतीने सर्व आहाराचे संयमन करतात, प्रयत्नाने प्राणांचे प्राणाच्या ठिकाणी हवन करतात. त्यांनी यज्ञाच्या आधारे मनातील सर्व प्रकारचे दोष घालविले असतात. त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे त्यांचे मूळचे शुद्ध स्वरूप शिल्लक राहते. तेथे अग्नी व यज्ञकर्ता हे एकरूप होत असल्याने द्वैतभाव शिल्लक राहत नाही. येथे यज्ञ करणाऱ्याची इच्छा पूर्ण होते आणि यज्ञाक्रिया संपून जातात. यज्ञकर्त्याच्या सर्व वासना निमाल्यामुळे मी म्हणजे हा देह ह्या कल्पनेचा समूळ नाश होतो त्यामुळे तो संपूर्ण निरिच्छ होतो.

पुढील एकतिसाव्या श्लोकात भगवंत असं सांगतायत की, यज्ञ केल्याचे फल म्हणून मिळालेल्या ज्ञानरूपी अमृताचे सेवन करून योगीजन सनातन परब्रम्हाला प्राप्त होतात. जे मोहावर विजय मिळवण्यासाठी कोणताच यज्ञ करत नाहीत त्यांना ह्या लोकी सुख मिळत नाही. मग त्यांचा परलोक सुखाचा कसा होणार?

यज्ञ-शेषमृते धाले पावले ब्रम्ह शाश्वत । न यज्ञाविण हा लोक कोठूनि पर-लोक तो ।।31।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, अनादीसिद्ध, परिशुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञामध्ये शिल्लक राहिलेल्या ब्रम्हाचे ब्रम्हनिष्ठ लोक ‘अहं ब्रमास्मि’ मी ब्रम्ह आहे, या मंत्राने सेवन करतात आणि ब्रह्माशी एकरूप झाल्याची अनुभूती घेतात. जन्माला येऊन ज्यांच्याकडून संयमरुपी अग्नीची उपासना घडत नाही आणि जे योग-यज्ञही करत नाहीत, त्या लोकांना विरक्ती माळ घालत नाही. ज्यांचे इहलोकामध्ये आचार, विचार, उच्चार सात्विक नाहीत, त्यांना परलोकात सुख कुठून मिळणार?

पुढील श्लोकात भगवंत म्हणाले, असे विविध प्रकारचे यज्ञ वेदवाणीतून विस्तार पावले आहेत. ते सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न होणारे आहेत. म्हणून कोणतेही कर्म निरपेक्षता बाळगून केले की, तू संसारबंधनातून मुक्त होशील.

विशेष बोलिले वेदे असे यज्ञ अनेक हे । कर्माने घडले जाण जाणूनि सुटशील तू  ।।32 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अशा प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले, त्यांचे वेदांतात उत्तम वर्णन केलेले आहे. ते सर्व यज्ञ शरीर, मन व इंद्रिय यांच्या क्रियांनी केले जातात. ते सर्व यज्ञ फलाच्या इच्छेने केल्यास बंधन प्राप्त होते. हे सर्व यज्ञ कर्माने सिद्ध होतात. म्हणून कर्म निरपेक्षतेने केले की, कर्मबंधन लागू होत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.