For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime | यड्राव हादरले: ऑनलाईन गेमिंगच्या नादापायी २४ वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपली

12:23 PM Apr 20, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   यड्राव हादरले  ऑनलाईन गेमिंगच्या नादापायी २४ वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपली
Advertisement

                                ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे तरुणाची आत्महत्या

Advertisement

यड्राव -ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या व्यसनाने एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतल्याची हृदयद्रावक घटना कोरोची येथे घडली. एस. टी. स्टैंड परिसरातील आदित्य मिलिंद कोळी (वय २४) या तरुणाने ऑनलाईन गेममध्ये झालेल्या आर्थिक नुकसानीच्या नैराश्यातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याघटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आदित्य हा कुटुंबातील कर्ता मुलगा होता. वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन झाल्याने घरची जबाबदारी त्याच्यावर होती. मात्र, मोबाईलवरील ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्याने त्याचे आयुष्यभरकटले. सुरुवातीला लहान रक्कम लावून खेळ सुरू केलेल्या आदित्यने हळूहळू मोठ्या रकमांचा वापर केला. प्रथम दहा हजार रुपये गमावल्यानंतरही तो थांबला नाही. मित्रांकडून उसने पैसे घेऊन, तसेच स्वतःचा मोबाईल विकूनही त्याने खेळ सुरूच ठेवला.

Advertisement

हरलेले पैसे परत मिळवण्याच्या नादात त्याने तब्बल ८० हजार रुपयेउसने घेतले. मात्र, यातही अपयश आल्याने तो पूर्णपणे कर्जाच्या विळख्यात सापडला. या आर्थिक तणावातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले असून, कोणालाही जबाबदार धरू नये असेही लिहिले आहे.

शनिवारी सायंकाळी घरातील सदस्य कामात व्यस्त असताना त्याने वरच्या मजल्यावर गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मनमिळाऊ स्वभावामुळे परिसरात लोकप्रिय असलेल्या आदित्यच्या निधनाने मित्रपरिवारही हादरला आहे. ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याने पालकांनी वेळीच सावध राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.