यादव यांचा नातू घेतोय सैनिक प्रशिक्षण
सिंगापूर येथील विद्यालयात घेतला प्रवेश
वृत्तसंस्था / सिंगापूर
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचा एक नातू सिंगापूरमध्ये सैनिकी प्रशिक्षण घेत आहे. त्याने सिंगापूरच्या सैनिकी प्रशिक्षण विद्यालयात प्रवेश घेतला आहे. मात्र, त्याने सिंगापूरच्या सैन्यात प्रवेश घेतलेला नाही, असे स्पष्टीकरण त्याच्या कुटुंबियांकडून देण्यात आले आहे.
त्याचे नाव आदित्य असे असून त्याच्या सैनिक प्रशिक्षणासंबंधीची माहिती त्यांची आई रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियावर प्रसारित केली आहे. आदित्य हा निर्भय, शिस्तबद्ध आणि निश्चयी आहे. सैनिकी प्रशिक्षण घेण्याची त्याची इच्छा आहे. त्याला ती आवडही आहे. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादनही त्याच्या आईने केले आहे. तो सध्या 18 वर्षांचा झाला असून त्याने सिंगापूरला येऊन सैनिकी प्रशिक्षण घेण्याचा निर्धार केला होता. सिंगापूरमध्ये पायाभूत सैनिक प्रशिक्षण अनिवार्य आहे. आदित्य आचार्य याने पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले असून आता तो यापुढची दोन वर्षे सैनिकी प्रशिक्षण घेणार आहे. तो सैन्यात प्रवेश करणार की नाही, यासंबंधी आत्ताच निश्चित सांगता येणार नाही. तथापि, त्याच्या या निर्णयामुळे मला अतिशय आनंद झाला आहे. माझे हृदय भावनेने भरुन आले आहे, अशी पोस्ट रोहिणी आचार्य यांनी प्रसारित केली आहे.
सिंगापूरमध्येच वास्तव्य
लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य गेली कित्येक वर्षे सिंगापूरमध्येच वास्तव्यास आहेत. त्यांचे पती समरेशसिंग आचार्य यांचा तेथे व्यवसाय आहे. 2025 मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात वाद उफाळून आला होता. लालू यादव यांचा पुत्र तेजस्वी यादव याचा दोन मित्रांनी मला लालू यादव यांच्या घरातून बाहेर काढले, असा जाहीर आरोप रोहिणी आचार्य यांनी केला होता. तेजस्वी यादव यांचे आणखी एक बंधू तेजप्रताप यादव यांचेही कुटुंबाशी संबंध तुटले आहेत. तेजप्रताप यादव यांनी नवा पक्ष स्थापन केला असून विधानसभा निवडणूक लढविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. आचार्य यांच्या मुलांना राजकारणात रस नाही, असे दिसून येत आहे.