For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्षी जिनपिंग यांचा भारत दौरा निश्चित

06:45 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
क्षी जिनपिंग यांचा भारत दौरा निश्चित
Advertisement

400 अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळही समवेत असणार

Advertisement

वृत्तसंस्था/ बीजिंग

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा भारत दौरा आता जवळपास निश्चित झाला आहे. ते सप्टेंबर महिन्याच्या 12 आणि 13 या दिनांकांना भारताला भेट देतील. त्यांच्यासमवेत चीनच्या 400 अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळही असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या भारत दौऱ्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी दौऱ्यासाठी सज्जतेला प्रारंभ करण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये भारतात ब्रिक्स परिषदेची शिखर बैठक होणार आहे. या बैठकीला जिनपिंग उपस्थित राहणार आहेत, हे आता जवळपास निश्चित झाल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोवाल सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांची भेट घेऊन चर्चा केली. भारत आणि चीन यांच्या सीमेवर शांतता राखण्याच्या दृष्टीने त्यांची चर्चा झाली. चार वर्षांपूर्वी लडाखच्या सीमेवर दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. गलवान येथील संघर्षात भारताचे सैनिक हुतात्मा झाले होते, तसेच चीनचेही सैनिक प्राणास मुकले होते. त्यानंतर दोन्ही देशांच्या सेनाधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या होत्या, अखेरीस संघर्ष संपुष्टात येऊन शांतता प्रस्थापित झाली होती. या पार्श्वभूमीवर डोवाल आणि वांग यी यांची चर्चा महत्वाची आहे.

चीन अधिकाऱ्यांची सज्जता

क्षी जिनपिंग यांच्या संभाव्य भारत दौऱ्यासाठी चीनी अधिकाऱ्यांनी सज्जता करण्यास प्रारंभ केला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. जिनपिंग आणि त्यांच्या समवेत येणाऱ्या शिष्टमंडळाची वास्तव्याची व्यवस्था कोणत्या हॉटेलात करायची याविषयी चीनी अधिकारी योजना सज्ज करीत आहेत. दिल्लीतील अनेक हॉटेलांचा त्यासाठी विचार केला जात आहे. त्यांची सुरक्षा व्यवस्था आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांचाही सांगोपांग विचार चीनी अधिकारी करीत असल्याचे समजते.

सात वर्षांनंतर प्रथमच

2019 मध्ये क्षी जिनपिंग यांनी भारताचा दौरा केला होता. यावेळी ते भारतात आले, तर तो त्यांचा सात वर्षांच्या नंतरचा प्रथम भारत दौरा असेल. त्यांच्या मागच्या दौऱ्यात त्यांच्यासह आलेल्या अधिकाऱ्यांची संख्या 200 हून कमी होती. तथापि, यावेळी ही संख्या 400 किंवा त्याहीपेक्षा अधिक असू शकते. त्यामुळे हा एक नवा विक्रम होईल, अशी चर्चा दोन्ही देशांच्या राजकीय वर्तुळात होत आहे.

अत्यंत महत्वाचा दौरा

भारत आणि चीन यांच्यातील सीमा तणाव आणि सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती यांच्या पार्श्वभूमीवर क्षी जिनपिंग यांचा हा संभाव्य भारत दौरा महत्वाचा मानण्यात येत आहे. गेल्या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचा दौरा केला होता. त्या दौऱ्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली होती. तरी अद्यापही विश्वासाचे वातावरण निर्माण झालेले नाही, असे मानले जाते. जिनपिंग यांच्या या दौऱ्यात परिस्थिती आणखी सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही देशांचा तसा प्रयत्न असेल, असे वातावरण सध्या आहे.

कोणत्या विषयांवर होणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष जिनपिंग यांची एकमेकांशी चर्चा होईल, हे निश्चित मानले जात आहे. या चर्चेत भारत-चीन सीमावाद हा एक महत्वाचा विषय असेल, अशी चर्चा आहे. गेली जवळपास आठ दशके हा विवाद आहे. दोन्ही देशांमधींल सीमारेषा निश्चितपणे निर्धारीत केलेली नाही. त्यामुळे ती प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणून ओळखली जाते. भारताच्या काही भाग आपला आहे, असे चीनचे म्हणणे आहे. ते भारताने ठामपणे फेटाळले आहे. यासंबंधीही चर्चा अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे भारतासाठी अडचणीची व्यापारी तूट कमी करणे, चीनला होणारी निर्यात वाढविणे, व्यापार आणि गुंतवणूक या विषयांवर मोठी चर्चा अपेक्षित आहे.

संबंध सुधारण्याची अपेक्षा

ड गेली चार वर्षे तणावयुक्त असणारे भारत-चीन संबंध सुधारण्याची अपेक्षा

ड जिनपिंग यांच्या संभाव्य दौऱ्यात सीमावादावरही चर्चा होण्याची दाट शक्यता

ड भारताला अडचणीची असणारी व्यापारी तूट कमी करण्याविषयी चर्चा शक्य

ड गुंतवणूक, विश्वासनिर्मिती आणि सांस्कृतिक विषयांवरही वाटाघाटी शक्य

Advertisement

.