For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार क्षी जिनपिंग

06:22 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार क्षी जिनपिंग
Advertisement

23-25 सप्टेंबर या कालावधीत अमेरिकेत : ट्रम्प यांच्यासोबत करणार शिखर बैठक

Advertisement

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे 23-25 सप्टेंबर या कालावधीत अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर असणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावर जिनपिंग यांचा हा दौरा होणार आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सोमवारी याची माहिती दिली आहे.

वृत्तसंस्था, बीजिंग

Advertisement

क्षी जिनपिंग हे 23 सप्टेंबर रोजी वॉशिंग्टन येथे पोहोचतील, तेथे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. क्षी जिनपिंग यांचे विमान जॉइंट बेस अँड्य्रूजच्या विमानतळावर उतरणार आहे. तर विमानतळावर उपस्थित राहत ट्रम्प स्वत: जिनपिंग यांचे स्वागत करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष प्रत्यक्ष विमानतळावर उपस्थित राहून विदेशी अतिथींचे स्वागत करण्याचा प्रकार खूपच कमीवेळा घडत असतो. सर्वसाधारणपणे अमेरिकेचे अध्यक्ष हे विदेशी अतिथींना व्हाइट हाउसमध्येच भेटत असतात.

ट्रम्प आणि जिनपिंग यांची यापूर्वी मे महिन्यात भेट झाली होती. तेव्हा ट्रम्प हे बीजिंग दौऱ्यावर गेले होते, दोन्ही देशांनी स्वत:चे संबंध सुधारण्याबद्दल तेव्हा भूमिका मांडली होती. अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. ट्रम्प आणि जिनपिंग यांच्या मोठ्या बैठकीपूर्वी दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी अंतिम तयारीवरून चर्चा करत आहेत. या बैठकीत आयातशुल्काचा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे समजते. तर दोन्ही देश आर्थिक आणि व्यापारी मुद्द्यांवर चर्चा करतील.

100 टक्के आयातशुल्काची टांगती तलवार

दोन्ही नेत्यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. ट्रम्प यांनी शुक्रवारी नव्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. या नव्या कायद्यामुळे रशियाकडून कच्चे तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्के आयातशुल्क लादले जाऊ शकते. चीन आणि भारतावरही हे आयातशुल्क लागू होण्याची शक्यता आहे. रशियाच्या कच्चे तेल आणि गॅस खरेदीवरील अमेरिकेच्या निर्बंधांचा आम्ही विरोध करतो. दोन देशांच्या सामान्य व्यापारात त्रयस्थ देशाचा हस्तक्षेप होऊ नये अशी भूमिका चीनने मांडली आहे.

चीनचा एकतर्फी निर्बंधांना विरोध

चीन समानता आणि परस्पर लाभाच्या आधारावर इतर देशांसोबत सामान्य व्यापार करतो. हा व्यापार कुठल्याही त्रयस्थ देशाच्या विरोधात नाही. यात बर्हिगत दबाव असू नये. चीन एकतर्फी निर्बंधांना विरोध करतो. निर्बंधांना आंतरराष्ट्रीय कायद्यात कुठलाच आधार नाही आणि संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेची मंजुरी देखील नसल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी म्हटले आहे.

कम्युनिस्टांची विचारसरणी सर्वात मोठा धोका

कम्युनिझम हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा धोका आहे. मध्यावधी निवडणुकीत विरोधी पक्षांना यश मिळाल्यास अमेरिका कम्युनिस्ट होईल असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राला संबोधन करताना चीनवर 2020 च्या निवडणुकीत ‘दुष्ट हस्तक्षेपा’चा आरोप केला. चीनने 22 कोटी अमेरिकन मतदारांच्या नोंदी चोरल्या आणि निवडणूक निकालाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी ट्रम्प आता डेमोक्रेट्सना कट्टरवादी आणि कम्युनिस्ट ठरविण्याचे अभियान तीव्र करत आहेत. डेमोक्रेट्स विजयी झाले तर अमेरिका कम्युनिस्ट देश ठरेल. अमेरिकेने यापूर्वी कम्युनिझमला पराभूत केले आहे आणि पुन्हा पराभूत करणार असल्याचा दावा ट्रम्प यांनी डलास येथील सभेत बोलताना केला.ट्रम्प हे एकीकडे देशांतर्गत राजकारणात कम्युनिझमची भीती फैलावत आहेत, तर दुसरीकडे जगातील सर्वात मोठ्या कम्युनिस्ट नेत्याच्या स्वागतात रेड कार्पेट घालत आहेत. क्षी जिनपिंग यांच्या दौऱ्यामुळे अमेरिका-चीन संबंधांची दिशा निश्चित होणार आहे, परंतु ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

Advertisement
Tags :

.