For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोडार आयआयटीबाबत लेखी हमी हवी

01:09 PM Sep 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
कोडार आयआयटीबाबत लेखी हमी हवी
Advertisement

कोडार ग्रामस्थांचा आग्रह : नागरिकांनी दाखवलेल्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया

Advertisement

फोंडा : कोडार व कसमशेळ ग्रामस्थांचा प्रखर विरोध तसेच सर्व विरोधी पक्षांनी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यामुळे बेतोडा पंचायतक्षेत्रातील कोडार गावात होऊ घातलेला आयआयटी प्रकल्प सरकारने रद्द केल्याचे जाहीर केले आहे. स्थानिक आमदार तथा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी रविवारी पणजी येथे पत्रकार परिषदेत तसे जाहीर केले. त्यानंतर सायंकाळी कोडार गावात येऊन ग्रामस्थांची भेट घेत हा निर्णय कळविला. आपण एक चांगला प्रकल्प शिरोडा मतदार संघात आणू पाहत होतो. पण ग्रामस्थांना तो नको असल्यास त्यांच्या विरोधात जाऊन लादला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  मात्र त्यावर प्रतिक्रिया देताना सरकारच्या या निर्णयाचे स्वागतच आहे, पण हा प्रकल्प कोडार गावातून रद्द करण्यात आल्याचे लेखी जाहीर करण्याची मागणी आंदोलकांपैकी काही ग्रामस्थांनी केली आहे. आपल्या सुपिक जमिनी व शेती बागायती राखण्यासाठी ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीचा हा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया गोवा फॉरवर्ड, रिव्होल्युशनरी गोवन्स, शिरोड्याचे माजी आमदार महादेव नाईक यांच्यासह अन्य विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे.

फोंडा तालुक्यातील बेतोडा पंचायत क्षेत्रातील जेमतेम दीड हजार लोकवस्ती असलेल्या कोडार गावातील कोमुनिदादच्या सर्वे क्रमांक  63/2 मध्ये आयआयटी गोवा कॅम्पससाठी सरकाने जागा निश्चित केली होती.  कोडार कोमुनिदादकडे 14 लाख चौ. मिटर जागेच्या खरेदीचा व्यवहारासंबंधीचा तपशिल गेल्या महिन्यात सरकारी राजपत्रात जाहीर करण्यात आला होता. ग्रामस्थांना याचा सुगावा लागताच कोडार व कसमशेळ गावातील ग्रामस्थांनी या प्रकल्पाविरोधात आंदोलन सुऊ केले होते. काँग्रेस पक्षासह रिव्होल्युशनरी गोवन्स, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पार्टी या सर्व विरोध पक्षांच्या नेत्यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांना पाठिंबा जाहीर केला होता. भाजपा सरकारात असलेले प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांच्यासह उटा संघटनेने कसमशेळ गावातील एसटी बांधवांच्या जमीन हक्काच्या मुद्द्यावऊन आंदोलनाला पाठिंबा दिला होता. स्थानिक आमदार तथा माजीमंत्री महादेव नाईक यांनीही ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असलेल्या शेती बागायती व सुपिक जमिनी उद्ध्वस्त कऊन सरकारला प्रकल्प लादता येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. काही पंचसदस्यांनीही या ग्रामस्थांची भेट घेऊन आपला विरोध दर्शविला होता. आयआयटी विरोधी कोडार गावातील या आंदोलनाला विविध स्तरावऊन लाभणारा वाढता पाठिंबा व शेवटपर्यंत लढा देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार यामुळे अखेर सरकारने नमते घेतले आहे.

Advertisement

उशिर केलेला नाही...आता हा विषय संपला : सुभाष शिरोडकर

रविवारी पणजी येथील पत्रकार परिषदेत कोडार गावातील हा नियोजित प्रकल्प रद्द करण्यात आल्याची घोषणा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केल्यानंतर लगेच कोडार गावात येऊन येथील श्री सोमनाथ मंदिरात त्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. हा विषय हाताळण्यात आपण उशिर केलेला नाही, तर वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा करीत होतो. मुख्यमंत्र्यांशी दोनवेळा चर्चाही झाली. लोकांचा कोडार गावात आयआयटीला विरोध असल्याने हा विषय आता संपलेला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी सरपंच मधू खांडेपारकर, शिरोडा भाजपाचे अध्यक्ष अक्षय गावकर, कोडार कोमुनिदादचे मुखत्यार प्रशांत गावकर व सुशांत गावकर हे उपस्थित होते.

सरकारकडून लेखी हमी हवी : ज्ञानेश्वर खांडेपारकर

आयआयटी विरोधी आंदोलनात कसमशेळ ग्रामस्थांचे नेतृत्व करणारे ज्ञानेश्वर खांडेपारकर यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत असल्य चे सांगितले. मात्र ज्याप्रमाणे येथील कोमुनिदादच्या जमिनीचा खरेदी व्यवहार सरकारी राजपत्रात आलेला आहे, तसेच सरकारने हा प्रकल्प कोडार गावातून रद्द झाल्याचे लेखी जाहीर करण्याची मागणी केली आहे. याच मुद्द्यावऊन बोलावण्यात आलेली बेतोडा पंचायतीची विशेष ग्रामसभा घेऊन त्यात हा निर्णय अधिकृतपणे जाहीर करण्याची मागणीही कोडार ग्रामस्थांनी केली आहे. आयआयटी विरोधी कोडार कृती समितीचे निमंत्रक विश्राम गावकर यांनीही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करताना, तूर्त ग्रामस्थांची चिंता मिटल्याची भावना व्यक्त केली. कोडार हे छोटेसे, शांत व कृषीप्रधान गाव असून या ठिकाणी आयआयटीसारखा भव्य प्रकल्प आल्यास गावातील एकंदरीत माहोल बिघडला असता. येथील शांततेत बाधा येऊन अनेक समस्यांना लोकांना तोंड द्यावे लागले असते, असे सांगितले.

ग्रामस्थांचा मोठा विजय....

सरकारने कोडार गावातून आयआयटीची माघार घेणे, म्हणजे ग्रामस्थांचा विजय असून सर्वाच्या एकजुटीमुळेच हे शक्य झाल्याचे माजीमंत्री मंत्री महादेव नाईक यांनी म्हटले आहे. सर्व स्तरांवऊन वाढलेला दबाव आणि ग्रामस्थांची एकजुटीने लढण्याची जिद्द यामुळे एवढे दिवस गप्प असलेल्या स्थानिक आमदारांनाही नमते घेत ग्रामस्थांची भेट घ्यावी लागली. आपल्या सुपिक जमिनी, शेती बागायती आणि गाव राखण्यासाठी कोडारवासियांनी दिलेल्या लढ्याचा हा मोठा विजय असल्याचे गोवा फॉरवर्डने म्हटले आहे. सत्ता असली म्हणून जोरजबरदस्ती करता येऊ शकत नाही. जनता सर्वभौम आहे, असे गोवा फॉरवर्डने आपल्या संदेशात म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.