महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ज्ञानसत्तेचा दरारा लेखकांनी बुलंद करण्याची गरज

12:02 PM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रा. मिलिंद जोशी यांचे प्रतिपादन : सरस्वती वाचनालयातर्फे उमा कुलकर्णी यांना बेळगाव भूषण पुरस्कार प्रदान

Advertisement

बेळगाव : सत्याला कोणताही रंग नसतो, सत्य मध्यम मार्गाने किंवा बहुमताच्या बाजूनेही जात नाही. सत्याची बाजू घेणे किंवा सत्याचा झेंडा खांद्यावर घेणे हे लेखकाचे कर्तव्य आहे. एक काळ असता होता की राजसत्तेची पावले ज्ञानसत्तेकडे वळत. आजही राजसत्तेच्या पावलांना धर्मसत्तेकडे जाण्याचे आकर्षण निर्माण होत आहे, ही गंभीर बाब आहे. ज्ञानसत्तेचा क्षीण होत चाललेला दरारा लेखकांनी बुलंद केला पाहिजे, असे विचार लेखक व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

Advertisement

सरस्वती वाचनालयातर्फे दिला जाणारा ‘बेळगाव भूषण पुरस्कार’ बेळगावच्या कन्या व लेखिका डॉ. उमा कुलकर्णी यांना गुरुवारी देण्यात आला. महात्मा फुले रोडवरील बसवेश्वर कल्याण मंटप येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिलिंद जोशी यांचे ‘साहित्य व्यवहार : काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. सरस्वती वाचनालय, शहापूरच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य मराठी विकास संस्था अनुदान योजनेंतर्गत हा कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इनामदार, उपाध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद गिजरे, सचिव आर. एम. करडेगुद्दी उपस्थित होते.

प्रारंभी श्रेया व संजना यांच्या ईशस्तवन व स्वागतगीतानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रा. स्वरुपा इनामदार यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना मोजक्याच शब्दात वाचनालयाच्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांच्याच हस्ते डॉ. उमा कुलकर्णी यांना बेळगाव भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व पाच हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. स्वरुपा इनामदार व दत्तप्रसाद गिजरे यांच्या हस्ते प्रा. मिलिंद जोशी यांचा तसेच दानम्मा मंदिराचे अध्यक्ष चंद्रशेखर बेंबळगी यांचा सत्कार करण्यात आला.

मिलिंद जोशी यांनी कालचा आणि आजचा साहित्य व्यवहार व उद्याचा अपेक्षीत साहित्य व्यवहार यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. लेखनी आणि वाणी शब्दशक्तीची रूपे असून त्यांना साहित्य संस्कृतीमध्ये समान स्थान आहे. लेखक कागदावर लिहितो व वक्ता श्रोत्यांच्या काळजावर लिहितो, असे मानले जाते. परंतु आज चिखल कालविणारेच खूप बोलले जाते, त्यापासून आपण कटाक्षाने दूर राहायला हवे. ज्ञानसत्तेचा क्षीण होत असलेला दरारा कमी करून सत्याचा झेंडा खांद्यावर घेणे हे लेखकाचे आद्य कर्तव्य आहे. याचे विस्मरण लेखकांना होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बेळगावने घडविले : उमा कुलकर्णी

बालपण बेळगावमध्ये गेल्याने सर्व भाषांकडे मोकळेपणाने पाहण्याचा दृष्टिकोन या शहराने दिला. जीवनाला निधडेपणाने भिडण्याची शक्तीही दिली. कानडी तरुणाशी विवाह करण्यास तयारी नव्हती. तेव्हा पालकांनी समजावल्याने विवाह केला आणि कानडी समाजाची मानसिकता आणि ते जग नव्याने सामोरे आले. कानडी आणि मराठी या ‘सीमारेषा नव्हेत’ तर त्या ‘मिलन रेषा’ आहेत, असे समजून आपण कानडी साहित्यातून मराठी भाषेमध्ये अनुवाद केला, असे मनोगत उमा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. बेळगाव हे जन्मगाव आहे. आजवर अनेक पुरस्कार मिळाले, परंतु बेळगावमध्ये सरस्वती वाचनालयाने दिलेला पुरस्कार हा आपल्याला भावुक करणारा आहे. त्यामुळे बेळगावकरांचे ऋण व्यक्त करतानाच पती (कै.) विरुपाक्ष कुलकर्णी यांच्या स्मृती जागवत आपण हा पुरस्कार स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. वक्त्यांचा परिचय, मानपत्र वाचन व सूत्रसंचालन मनीषा सुभेदार यांनी केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article