‘त्या’ नगरसेवकांची रिट याचिका फेटाळली
उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाचा भाजपच्या निलंबित दोन नगरसेवकांना धक्का
बेळगाव : खाऊ कट्टा प्रकरणी प्रादेशिक आयुक्तांनी भाजपच्या दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केल्याने या निकालाला स्थगिती मिळावी यासाठी नगरसेवकांच्यावतीने उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात बुधवारी रिट याचिका दाखल केली. या याचिकेवर बुधवारीच तातडीने सुनावणी घेत दोन्ही पक्षांची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली. त्यानंतर न्यायमूर्ती सूरज गोविंदराजू यांनी सदस्यत्व रद्द झालेल्या नगरसेवकांची रिट याचिका फेटाळून लावली. त्यामुळे निलंबित नगरसेवकांना धक्का बसला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने गोवावेस येथे बांधण्यात आलेल्या खाऊ कट्ट्यातील गाळे नगरसेवक जयंत जाधव आणि मंगेश पवार यांनी आपल्या पत्नींच्या नावे घेतल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी याचिका सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे दाखल केली होती. त्यामुळे या खटल्याची सुनावणी प्रादेशिक आयुक्तांच्या न्यायालयात सुरू होती. त्यावेळी महानगरपालिकेचा अप्रत्यक्षरित्या फायदा घेतल्याचे सिद्ध झाल्याने प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टण्णवर यांनी दोन्ही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केल्याचा निकाल दिला.
त्यामुळे याबाबत उच्च न्यायालयात नगरसेवक याचिका दाखल करून या निकालाला स्थगिती घेतील या शक्मयतेने याचिकाकर्ते सुजित मुळगुंद यांच्या वकिलांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशीच उच्च न्यायालयात पॅव्हेट दाखल केले होते. प्रादेशिक आयुक्तांच्या निकालाला स्थगिती मिळावी यासाठी सदस्यत्व रद्द झालेल्या नगरसेवकांच्यावतीने वकिलांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात रिट याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने तातडीने सुनावणी घेतली. दोन्ही पक्षांच्यावतीने वकिलांनी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रादेशिक आयुक्तांनी हा निकाल दिला आहे, असा युक्तिवाद अॅड. नितीन आर. बोळबंडी यांनी केल्याने याबाबत सरकारकडे दाद मागावी, असा निर्वाळा देत न्यायमूर्ती सूरज गोविंदराजू यांनी सदस्यत्व रद्द झालेल्या नगरसेवकांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे भाजपच्या दोन्ही नगरसेवकांना हा दुसरा धक्का बसला आहे.