वृद्धिमान साहाचा क्रिकेटला निरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज वृद्धिमान साहाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. साहाने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना पंजाब बरोबर खेळला.
2024-25 च्या रणजी क्रिकेट हंगामातील क गटातील पंजाब आणि बंगाल यांच्यात हा सामना झाला. पण साहाला फलंदाजीत चांगली कामगिरी करता आली नाही. त्याला आपले खाते उघडता न आल्याने त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची निर्णय तातडीने घेतला. बंगालने हा सामना 1 डाव आणि 13 धावांनी जिंकला होता.
40 वर्षीय वृद्धिमान साहाने 2007 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने 142 सामन्यात 48.65 धावांच्या सरासरीने 14 शतके आणि 44 अर्धशतकांसह 7,169 धावा जमविल्या. 2024 च्या नोव्हेंबरमध्ये साहाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. साहाने भारताकडून 40 कसोटी सामन्यात खेळताना 3 शतके आणि 6 अर्धशतकांसह 1,353 धावा जमविल्या. तसेच त्याने 5 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले.