For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कळंब्यात ३ लाखांची कुस्ती बरोबरीत; प्रथम क्रमांकाची निकाली कुस्ती रेंगाळली

11:34 AM May 16, 2024 IST | Abhijeet Khandekar
कळंब्यात ३ लाखांची कुस्ती बरोबरीत  प्रथम क्रमांकाची निकाली कुस्ती रेंगाळली
wrestling match Kalamba
Advertisement

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सदगीर यांच्यात सव्वा तास लढत; मैदानात शंभरहून अधिक कुस्त्या

वार्ताहर कळंबा

कळंबा (ता.करवीर) येथे ग्रामदैवत महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदान पहिल्या क्रमांकाची तीन लाखाची कुस्ती बरोबरीत सुटली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये सुमारे सव्वा तास लढत चालली. रेंगाळलेल्या या लढतीमुळे कुस्तीशौकीन काहीशी निराशा झाली. तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत उपमहाराष्ट्र केसरी पै. हसन पटेल याने पंजाब केसरी सोनू कुमार याला हप्ता या डावावर अवघ्या तिसऱ्या मिनिटाला अन्मान दाखवले.

Advertisement

कळंबा येथे मंगळवार 14 रोजी जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने महालक्ष्मी तालीम, हनुमान तालीम, राम तालीम यांच्यावतीने कुस्ती मैदान झाले. पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये झाली. सुमारे सव्वातास सुरु राहिलेली हि कुस्ती पंचानी अखेर बरोबरीत सोडवली. दोन्ही मल्लांना कळंब्याचे माजी सरपंच सागर भोगम व सामाजिक कार्यकर्ते संतोष लोहार यांच्या हस्ते प्रथम क्रमांचे बक्षीस विभागून देण्यात आले.

त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत श्रीमंत भोसले याने उदायराज पाटीलला चितपट केले. सुभाष निऊगरे आणि प्रवीण पाटील यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये प्रवीण पाटील याने गुणांवर बाजी मारली. प्रतीक म्हेतर विनायक वास्कर यांच्यातील उत्तेजनार्थ आणि पाचव्या क्रमांकाची तेजस मोरे व सुदर्शन पाटील यांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. मैदानात लहान मोठ्या अशा एकूण 100 कुस्त्या झाल्या. सर्व विजेत्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी यावेळी भारत पाटील, उत्तम जाधव, अरुण टोपकर, भगवान पाटील, सुधीर पाटील, अविनाश टिपूगडे, संतोष हळदे, बाबासाहेब निकम आदी उपस्थित होते. उपमहाराष्ट्र केसरी रामा माने, तानाजी पाटील, प्रकाश पाटील, पंडित चाबूक यांनी पंच म्हणून काम पाहिले. समालोचन राजाराम चौगुले यांनी केले. मैदानाचे नियोजन विशाल तिवले, अमोल पाटील, संग्राम चौगुले, सोमनाथ शिंदे, संभाजी शिंदे, सागर ईळके, शरद खडके, सचिन कदम, अक्षय माने, रोहन तिवले, शरद मगदुम यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.