कुस्तीत मस्ती
कुस्ती विश्वामध्ये ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’ ही महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची आणि मानाची कुस्ती स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेला देदीप्यमान आणि वैभवशाली इतिहास लाभला असून, या स्पर्धेने देशाला आजवर अनेक नामांकित मल्ल दिले आहेत. मात्र, मागच्या काही वर्षांतील वादविवादाच्या घटना पाहता या स्पर्धेचा प्रवास झुंडशाहीच्या दिशेने तर सुरू नाही ना, असा प्रश्न उद्भवतो. अहिल्यानगरमध्ये नुकतीच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. तथापि, कुस्तीतील रंगतदार लढती, डाव-प्रतिडाव यापेक्षा ही स्पर्धा गाजली, ती नियमांचा बोजवारा आणि मारामारीमुळे. या स्पर्धेच्या उपांत्य लढतीत माजी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ आमनेसामने होते. दोघेही तोडीस तोड मल्ल असल्याने हा सामना अटीतटीचा होणार, याबाबत कुस्तीशौकिनांच्या मनात कोणतीही शंका नव्हती. अपेक्षेप्रमाणे सामन्याला सुऊवातदेखील झाली. याचदरम्यान मोहोळ याने शिवराजवर कुरघोडी करताच पंचांनी चितपटचा निर्णय दिला आणि वादाची ठिणगी पडली, असे दिसते. वास्तविक पंचांचा निर्णय चुकला, यात कोणतीही शंका दिसत नाही. मात्र, त्यानंतर शिवराजनेही संयम न ठेवता पंचांना लाथ मारल्याने तोही चुकला, असेच म्हणावे लागेल. हार व जीत हा कोणत्याही खेळाचा एक भागच असतो. कुस्तीसारख्या मर्दानी खेळामध्ये तर मल्लांचा प्रचंड कस लागत असतो. डोळ्याचे पाते लवत न लवते, तोच एखादा डाव पडतो आणि सगळा निकाल फिरतो. हे बघता पंच म्हणून काम करणेदेखील आव्हानात्मक असते. अशा वेळी एखादी चूक होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, हे खरेच. तरीही आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात या चुका कशा टाळता येतील, यावर कटाक्ष असायला हवा. अलीकडे सर्वच खेळांमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. यातून निर्णयातील चुका टाळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. असे असताना कुस्तीसारखा खेळही त्यामध्ये मागे राहणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. खरे तर कुस्तीकरिता प्रामुख्याने मुले येतात, ती ग्रामीण भागातून. मोठे कष्ट उपसून, कर्ज काढून खेड्यातील अनेक आई वडील मुलांना कुस्तीकरिता पाठवतात. मात्र, या मुलांना खराब निर्णयाचा फटका बसत असेल, तर त्यांच्या करिअरवरच परिणाम होतो. हे बघता अधिकाधिक अचूक निर्णय कसा देता येईल, हे पाहिले पाहिजे आणि त्याकरिता अंतिमत: तंत्रज्ञानाचा आधार घ्यायला हवा. त्यातूनच निर्णयावरून होणारे वाद टाळता येतील. कोणत्याही खेळामध्ये खिलाडीवृत्ती महत्त्वाची असते. निर्णय चुकला, तरी खेळाडूने संयम राखणे महत्त्वाचे असते. एखादा निर्णय पटला नाही, तरी त्याविरोधात अपिल करण्याचा मार्गही अवलंबता येतो. मात्र, त्याऐवजी पंचांशी हुज्जत घालणे, त्यांची कॉलर पकडणे किंवा त्यांना लाथ मारणे, हे शोभादायी नाही. तसे पाहिले, तर पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे शिवराजबद्दल काहीशी सहानुभूती निर्माण झाली होती. मात्र, लाथ मारून ही सहानुभूती त्याने घालवली, असे खेदाने म्हणावेसे वाटते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार राहुल द्रविड यांसारख्या खेळाडूंना त्यांच्या क्रिकेट करिअरमध्ये अनेकदा खराब निर्णयांचा फटका बसला. तथापि, आपला संयम त्यांनी ढळू दिल्याचे एकही उदाहरण ऐकीवात नाही. उलट दुसऱ्या सामन्यात खोऱ्याने धावा काढून आपला दर्जा सिद्ध केला. शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आहे. हे बघता त्याच्याकडून आणखी प्रगल्भ वागणे अपेक्षित होते. आता गैरवर्तनाबद्दल त्याच्यासह महेंद्र गायकवाड याच्यावरही तीन वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंचांवर कारवाई का नको, असा सवाल कुस्ती वर्तुळातील काही मंडळींकडून उपस्थित करण्यात येत आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने तर अशा पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत, अशी भाषा केली. पण, ही भाषा अयोग्य होय. कुस्तीसारख्या खेळामध्ये असे हिंसक शब्दप्रयोग होत असतील, तर या खेळाचे प्रयोजन काय, असाच प्रश्न यातून निर्माण होतो. वास्तविक, कोणत्याही खेळातील पंच हे काही आकाशातून टपकत नाहीत. तीही तुम्हा आम्हासारखी माणसे असतात. त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात. त्यांच्याकडून चूक झाली म्हणून त्यांना फासावर लटकवण्याची भाषा खेळभावनेलाच तिलांजली देणारी होय. भविष्यातही अशा प्रकारचे शब्दप्रयोग आणि लाथप्रयोग होत असतील, तर कुणीच पंच होण्यास धजावणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्राच्या कुस्तीला एक परंपरा आहे. महाराष्ट्राचे मल्ल खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिकमध्ये कुस्तीत भारताला पहिलेवहिले पदक मिळवून दिले. कोल्हापूर ही तर कुस्तीपंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. कुस्ती हा रांगडा, मर्दानी खेळ असला, तरी महाराष्ट्राने कुस्तीमध्ये मस्तीला, गुंडगिरीला कधीही थारा दिलेला नाही. हे बघता झाले, ते चुकीचेच झाले. मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्तीमध्ये राडेबाजी होत असल्याची उदाहरणे पहायला मिळतात. बऱ्याचदा हे राडे गटातटातून होत असल्याचे निदर्शनास येते. खेळ म्हणून खेळण्यापेक्षा अनेकदा मल्ल खुन्नस म्हणून खेळतात. त्यातूनच अलीकडच्या काळात कुस्तीच आखाडे हे वादाचे आखाडे होत असल्याचे निदर्शनास येते. हे काही आपच्या परंपरेला साजेशे म्हणता येणार नाही. मागच्या काही वर्षांत कुस्ती संघटनांमध्येही बरेच राजकारण शिरले आहे. ब्रिजभूषण वगैरे मंडळींचे प्रताप सारा देश जाणतो. तरीही केवळ काही मतदारसंघात प्रभाव असल्याने अशा बाहुबलींना राजकीय संरक्षण मिळते, यातच सगळे आले. म्हणूनच कुस्तीतून राजकारणाला आधी मूठमाती दिली पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून कुस्तीवर उत्तरेतील लॉबीने घट्ट पकड निर्माण केली आहे. पंजाब, हरियाणा, दिल्लीवगळता इतर भागातील मल्ल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर फारसे दिसत नाहीत. महाराष्ट्रात मल्लांना डावलले जाते, अशीही तक्रार केली जाते. त्यामुळे आपापसात लढायचे सोडून महाराष्ट्रातील मल्ल, कोच व कुस्ती क्षेत्रातील धुरिणांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मस्तीऐवजी कुस्तीवर लक्ष केंद्रित केले, तर महाराष्ट्राला कुणीच रोखू शकणार नाही, हे नक्की.