दोस्तीत कुस्ती
महाराष्ट्रात भाजप आणि शिंदेसेना या दोन मित्र पक्षांमधील दरी दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसते. कथित ऑडिओ क्लीप प्रकरण आणि विधान परिषद निवडणुकीनंतरचे वार-पलटवार हा त्याचाच भाग म्हणता येईल. त्यात शिंदेसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री बदलाची मोहीमही हाती घेतल्याचे पहायला मिळते. त्यामुळे आगामी काळात युतीतील वाद आणखी चिघळण्याची भीती आहे.
महाराष्ट्रात सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. या सरकारमध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे प्रमुख पक्ष सहभागी आहेत. परंतु, सरकारमधील या तीन मित्रांमधील बेबनाव सध्या वारंवार समोर येताना दिसतोय. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत या साऱ्याने टोक गाठल्याचे दिसून येते. वास्तविक, महाराष्ट्राचे राजकारण मागच्या काही दिवसांपासून भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाने व्यापून टाकले आहे. त्यामुळे अलीकडच्या प्रत्येक निवडणुकीत विरोधकांना बॅकफुटवरच रहावे लागल्याचे चित्र आहे. तथापि, ही निवडणूक त्याला अपवाद ठरली. विधान परिषदेच्या पाचपैकी तीन जागा जिंकत महाविकास आघाडीने महायुतीला जबरदस्त दणका दिला. मुख्य म्हणजे प्रतिष्ठेच्या पुणे व नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. नागपूर ही तर मुख्यमंत्र्यांची गृहभूमी. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराने भाजपला अस्मान दाखवल्याने हा पराभव पक्षाच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसते. त्यातूनच दोन मित्र पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये राज्यातील नेतृत्वाच्या विरोधात मतदान झाल्याने एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा महाराष्ट्राचे नेतृत्व दिले पाहिजे, अशी अपेक्षा शिंदेसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली आहे. अब्दुल सत्तार व अन्य नेतेही त्यांचीच री ओढताना दिसतात. त्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा अजेंडा शिवसेनेकडून सेट करण्यात येत असल्याचे संकेत आहेत. दुसऱ्या बाजूला शिंदेसेनेने या निवडणुकीत युतीधर्म पाळला नाही, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. शिंदेसेनेने युतीधर्म पाळला असता, तर पाचही ठिकाणी युतीचा विजय झाला असता, असा दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. विधान परिषद निवडणुकीत तिन्ही पक्षात समन्वय नव्हता, ही वस्तुस्थितीच आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे रिंगणात असतानाही शिंदेसेनेकडून उदय सामंत समर्थक सचिन सानप यांना पुरस्कृत करण्यात आले. सानप यांनी गावडे यांना चांगली लढत दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. याशिवाय अन्य जागांवरही शिंदे सेनेची भूमिका संदिग्ध वा संशयास्पद राहिल्याचे बोलले जाते. भाजप व शिंदेसेनेतील युती ही नैसर्गिक असल्याचा दावा दोन्ही नेत्यांकडून सातत्याने केला जातो. परंतु, या दोघांमधील वाढता तणावच काय ते स्पष्ट करतो. मुळात एकनाथ शिंदे हे अत्यंत महत्त्वाकांक्षी नेते आहेत. शिवसेनेत अभूतपूर्व फूट घडवून शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद पटकावले. या मुख्यमंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांनी राज्यात आपली वेगळी ओळख तयार केली. मात्र, 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. असे असले, तरी मुख्यमंत्रिपदाची त्यांची महत्त्वाकांक्षा कायम दिसते. भाजप मित्रपक्षांना कसे गिळतो, याची शिंदे यांनाही पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे त्यांनीही सध्या आक्रमक भूमिका घेतली असून, संधी मिळेल, तिथे भाजपाला चेपण्याची रणनीती आखली आहे. सध्या जेन झी पिढी भाजपवर नाराज आहे. अनेक आंदोलनेही सुरू आहेत. यातून आपल्याला काय मिळवता येईल, याचाही शिंदे विचार करताना दिसतात. काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती झाल्या, पण आम्ही नेहमीच युतीधर्म पाळतो. इतर नेत्यांनी कोणतेही भाष्य करू नये, असे आदेश शिंदे यांनी काढले खरे. पण, जे साधायचे, ते साधत भाजपलाच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे. पुढच्या टप्प्यात दोस्तीतील ही कुस्ती अधिक तीव्र होण्याचा संभव आहे.