For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुस्तीपटू बजरंग पुनियाने खेळात राजकारण आणले

11:49 AM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुस्तीपटू बजरंग पुनियाने खेळात राजकारण आणले
Advertisement

हरयाणाचे क्रीडामंत्री गौरव गौतम यांची प्रतिक्रिया, चार वर्षांची बंदी हे राजकीय षड्यंत्र असल्याचा बजरंगचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/चंदिगड, हरियाणा

कुस्तीपटू बजरंग पुनियावर राष्ट्रीय उत्तेजकविरोधी यंत्रणेने (नाडा) लादलेल्या चार वर्षांच्या बंदीवर बोलताना हरियाणाचे क्रीडामंत्री गौरव गौतम यांनी ही संघटना एखाद्या विशिष्ट व्यक्तीला हुडकून काढून कारवाई करत नाही, असे म्हटले आहे. कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघ आणि त्याचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध केलेल्या आंदोलनादरम्यान बजरंगने खेळात राजकारण आणले, असा आरोपही त्यांनी केला. डोपिंगविरोधी नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल राष्ट्रीय उत्तेजकविरोधी यंत्रणेने लादलेल्या चार वर्षांच्या बंदीवर बजरंगने ‘राजकीय षड्यंत्र’ असल्याचा आरोप केला आहे. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शौषणाच्या प्रकरणावरून भारतीय कुस्ती महासंघ आणि त्याचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनातील सहभागामुळे ही कारवाई आपल्यावर झाली असल्याचा दावा त्याने केला आहे.

Advertisement

‘नाडा’ने मंगळवारी सदर कुस्तीपटूला चार वर्षांसाठी निलंबित केले. सदर ऑलिम्पिक पदकविजेत्या कुस्तीपटूने राष्ट्रीय संघासाठीच्या निवड चाचणीदरम्यान 10 मार्च रोजी डोप चाचणीसाठी मूत्राचा नमुना देण्यास नकार दिला होता, असा ठपका या यंत्रणेने ठेवला आहे. त्याला प्रथम 23 एप्रिल रोजी तात्पुरते निलंबित करण्यात आले होते आणि नंतर जूनमध्ये निलंबित करण्यात आले होते, ज्यामुळे यावर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची त्याची संधी संपुष्टात आली होती. त्यानंतर युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनेही त्याला निलंबित केले होते. बजरंगने त्याच्या तात्पुरत्या निलंबनाविऊद्ध दाद मागितली होती आणि ‘नाडा’च्या शिस्तभंगविरोधी डोपिंग पॅनलने 31 मे रोजी हे निलंबन आरोपाची नोटीस जारी करेपर्यंत मागे घेतले होते. त्यानंतर 23 जून रोजी ‘नाडा’ने या कुस्तीपटूला पुन्हा निलंबनाची नोटीस बजावली होती.

बजरंगने बुधवारी यावर बोलताना चार वर्षांच्या या बंदीमध्ये केंद्र सरकारचा सहभाग असल्याचा आरोप केला. आम्ही महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी उभे राहिल्याने हे सर्व राजकीय षडयंत्र रचण्यात आले आहे. मी कोणत्याही ठिकाणी नमुना द्यायला तयार आहे, असे पुनिया पुढे म्हणाला. गेल्या वर्षभरापासून आपल्याला अशा छळाचा सामना करावा लागत आहे आणि लघवीचे नमुने न दिल्याबद्दल ‘नाडा’ने यापूर्वी आपल्याला तात्पुरते निलंबित केले होते. ऑलिम्पिकसाठीच्या राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचणीदरम्यान चाचणीसाठी नमुना देण्यात आपण अयशस्वी ठरलो आणि आपण नंतर सदर स्थळ सोडले असा ‘नाडा’चा आरोप आहे. याच्या उलट आपण खरोखरच त्या ठिकाणी उपस्थित होतो याचा आपल्याकडे पुरावा आहे. खेळाडू स्पर्धेत सहभागी होत असताना नमुने घेण्यासाठी संपर्क साधला जाऊ शकत नाही, असा दावा त्याने केला आहे.

Advertisement
Tags :

.