कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

घायवळ आणि घायाळ...

06:30 AM Oct 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुण्यातील गुंड नीलेश घायवळ याचे पलायन व त्याला राजकारण्यांकडून मिळालेली प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत यामुळे राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यात मारणे, आंदेकर यांच्याप्रमाणे घायवळ टोळीही कुप्रसिद्ध आहे. मागच्या काही दिवसांत ही घायवळ गँग राजकारण व गुन्हेगारीच्या पटलावर चांगलीच प्रकाशझोतात आल्याचे दिसून येते. या गँगशी बहुतांश पक्षातील नेते या ना त्या निमित्ताने कनेक्टेड असणे, हे आजचे राजकारण कुठल्या दिशेने चालले आहे, याचेच गमक. नीलेश घायवळचा इतिहास तसा थक्क करणाराच म्हटला पाहिजे. अहिल्यानगरमधून शिकण्यासाठी पुण्यात आलेला हा गडी गुन्हेगारीकडे वळतो, गज्या मारणेच्या टोळीत सहभागी होतो आणि त्याच्याशी मतभेद झाल्यानंतर आपली स्वतंत्र गँग तयार करतो, हे सगळेच एखाद्या चित्रपटाला साजेशे. मागच्या काही वर्षांत या दोन टोळ्यांमधील गँगवॉर, रक्तपातही पुणे शहराने अनुभवला आहे. काही दिवसांपूर्वी केवळ गाडीला वाट न दिल्याच्या रागातून या टोळीच्या सदस्यांनी कोथरूडमध्ये गोळीबार केला, दहशत माजवली आणि तिथून पुन्हा घायवळ गँग चर्चेत आली. गुंडांच्या टोळ्यांनाही अनेक चढ उतारातून जावे लागते. अमुक एका टोळीची हवा झाली, की दुसरी टोळी असुरक्षित होते. त्यातून आपले अस्तित्व दाखविण्यासाठी तसेच दहशत निर्माण करण्यासाठी राडे घातले जातात. घायवळ टोळीने तेच केले. मात्र, त्यानंतर पोलिसांनी मुसक्या आवळताच या महशयांनी थेट परदेशात पलायन केल्याचे दिसून आले. आधी लंडनमध्ये घायवळ पळाल्याची वदंता होती. नंतर स्वीत्झर्लंडमध्ये घायवळ गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. किंबहुना, मकोका अंतर्गत कारवाई झाली असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला, असा प्रश्न निर्माण होतो. नावात घोळ घालून, झोलझाल करून घायवळने हा पोसपोर्ट मिळविल्याचेही सांगितले जाते. परंतु, एक गुन्हेगार कागदपत्रांमध्ये खाडाखोड करतो आणि सहजपणे सर्वांच्या हातावर तुरी देऊन परदेशात पळून जाण्यात यशस्वी ठरतो, हे आपल्या सुरक्षा यंत्रणांचे अपयशच म्हटले पाहिजे. इतकेच नव्हे, तर या सर्व नाट्यामय घडामोडींमागे काही काळेबेरे तर नाही ना, अशी शंकाही आल्यावाचून राहत नाही. या सर्व शंकाकुशंका येण्याचे कारण म्हणजे घायवळचे राजकीय कनेक्शन होय. वास्तविक राजकारणी आणि गुंडांचे साटेलोटे आता लपून राहिलेले नाहीत. राजकारणी हवा तेव्हा, हवा तसा गुंडांचा कसा वापर करतात, याच्या सुरस कथा कमी नाहीत. परंतु, एकाच कुख्यात गुंडाचा बहुतेक पक्षात किती घट्ट दोस्ताना असावा, याचे घायवळ हे मूर्तिमंत उदाहरण मानता येईल. विधानसभेचे सभापती राम शिंदे आणि घायवळचे नाव आधीपासूच जोडले गेले आहे. त्यात घायवळचे गाव त्यांच्याच मतदारसंघात. अगदी शिंदे यांच्यात प्रचारातही तो उतरला असल्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यावरून आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला असला, तरी घायवळचे पवारांसोबतचे फोटोही व्हायरल झालेले दिसतात. शिंदे गटाचे नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी तर घायवळच्या मुद्द्यावर भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटलांनाच घेरण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांतदादांकडे कामाला असलेल्या समीर पाटील याच्याकडे 100 कोटींची प्रॉपर्टी कशी? समीर पाटील हा मकोकाचा आरोपी असून, घायवळ व समीर एकमेकांच्या संपर्कात आहेत, अशा आरोपांच्या फैरी झाडून त्यांनी दादांच्या दिशेनेच संशयाची सुई सरकवल्याचे पहायला मिळाले. त्याला काही तास उलटत नाहीत, तोच नीलेशचा भाऊ सचिन घायवळ याचा शस्त्र परवाना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने दिला गेल्याची माहिती पुढे आली. आपापसांतील भांडणातून भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांनी स्वत:ला कसे उघडे पाडले, याचाच हा नमुना ठरावा. घायवळबाबत प्रश्न विचारल्यावर दादा आय एम सॉरी, असे म्हणत प्रŽ टाळतात. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हेही मौन बाळगत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतात आणि या प्रकरणात योगेश कदम यांचे नाव येताच रवींद्र धंगेकर अचानक गप्प होतात. असा हा सगळा चक्रावून टाकणारा मामला. मध्यंतरी मुंबईतील डान्सबार प्रकरणावरून योगेश कदम अडचणीत आले होते. आता या प्रकरणातही एखाद्या गुंडाला शस्त्र परवाना देण्यात त्यांचा हात असेल, तर हे प्रकरण गंभीरच ठरावे. वास्तविक घायवळचा शस्त्र परवाना पोलीस आयुक्तांनी नाकारला होता. मात्र, तरीही त्याला परवाना मिळतो, यातून आपली व्यवस्था आणि आपले नेते काय पात्रतेचे आहेत, हे लक्षात येते. कोकणचे नेते रामदास कदम यांचा आक्रस्ताळेपणा व रडारड करण्यात कुणी हात धरणार नाही. या प्रकरणात पुत्राचे नाव आल्यानंतरही त्यांनी टाहो फोडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर विधीमंडळातील बड्या नेत्याकडून शिफारस झाल्याची सारवासारवही केली. पण, मग रामदास कदम किंवा त्यांचे सुपुत्र पुढे येऊन संबंधित नेत्याचे नाव का सांगत नाहीत, असा सवाल सर्वसामान्यांच्या मनात येतो. दसरा मेळाव्यात याच रामदासभाईंनी उद्धव ठाकरे यांच्यावर स्वैर आरोप करण्यात धन्यता मानली. आता एका गंभीर प्रकरणात त्यांच्याच मुलाच्या नावाची चर्चा होत आहे. हे पाहता नैतिक जबाबदारी स्वीकारून कदम पुत्र राजीनामा देणार का, याची महाराष्ट्राला उत्सुकता असेल. दुसऱ्या बाजूला घायवळला परदेशी पळून जाण्यात आणखी काही नेत्यांनी मदत केल्याचेही आरोप होत आहेत. संतोष बांगर तसेच तानाजी सावंत यांच्या नातलगांशीही त्यांचे कनेक्शन असल्याच्या चर्चा आहेत. हे बघता घायवळचे जाळे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वदूर पसरल्याचे तसेच त्यात अनेक नेते अडकल्याचे बघायला मिळते. महाराष्ट्रासारख्या राज्याचे हे अध:पतनच ठरावे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article