महाबळेश्वरच्या मुलांना अभिनयाचे धडे द्यायला आवडेल
महाबळेश्वर :
शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम व त्यांनी सादर केलेला अभिनय अत्यंत कौतुकास्पद आहे. मी महाबळेश्वरचीच असून भविष्यात या मुलांसाठी अभिनयाची कार्यशाळा घ्यायला मला आवडेल. त्याचे नियोजन केल्यास मी नक्की येईन. असे विचार अँकरफेम, सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी व्यक्त केले. महाबळेश्वर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने पं.स.चे गट शिक्षणाधिकारी आनंद पळसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण महोत्सवात शालेय विध्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम व विविध कला गुण दर्शन कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना अभिनेत्री देशपांडे यांनी वरील इच्छा व्यक्त केली.
मृण्मयी देशपांडे म्हणाल्या की, आपले आणि महाबळेश्वरचे नाते फार जुने आहे. आता तर येथे माझे घरच आहे. येथील निसर्गाशी एकरूप होऊन पानाफुलांशी गप्पा मारत त्याच्यातून काही शिकत शिकत सध्या माझी वाटचाल सुरू आहे. असे सांगून त्या पुढे म्हणाल्या की, आज काल पुण्या मुंबईत राहणाऱ्या लोकांचा जीव गुदमरतो आहे. त्यांच्या इथे चांगली हवा नाही, प्यायला चांगले पाणी नाही सगळीकडे प्रदुषणच. आपल्या सुदैवाने महाबळेश्वरसारख्या ठिकाणी जे महाराष्ट्रातच नाही तर देशातील नावाजलेल्या व चांगल्या पर्यटन स्थळापैकी एक आहे.
- मुलांनो आपल्या गावाचे नाव रोशन करा
आज गावामध्ये तरुण मुले नाहीत प्रत्येकजण शहराकडे धाव घेत आहे. गावातील हजरी पटावर मुलांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसते आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. अर्थात हे आताच या लहान मुलांना कळणार नाही. आपल्याकडे काय आहे याची मुलांना स्वतःला जाणीव होऊ दे. आपण आपल्या मुलांच्या बाबतीत जेव्हा मोठी स्वप्ने पाहतो त्यावेळी त्यात मोठी शहरेच असली पाहिजेत का? असा सवाल करून त्या म्हणाल्या की अशी भावना असता कामा नाही. गावांसाठी आपली मुले काय करू शकतात, आपली गावेची गावे कशी मोठी करू शकतात याचा विचार सूज्ञ पालकांनी करणे गरजेचे आहे. मुल चांगले असेल तर ते आपल्या गावाचं नाव रोशन करणारच.