विम्याच्या पैशासाठी वाट्टेल ते !
माणसाला सर्वात प्रिय वस्तू कोणती असेल तर ती ‘पैसा’ हीच आहे. कारण पैसा हाच त्याचा खरा आधार असतो. त्यामुळे तो मिळविण्यात माणसाचे आयुष्य खर्ची पडते. पैसा कायदेशीर मार्गाने मिळविलेला असेल तर ठीक आहे. पण बऱ्याच जणांना तेव्हढा संयम नसतो. ते कोणत्याही मार्गाने तो मिळविण्याचा प्रयत्न करतात. विम्याच्या पैशांवर तर अनेकांची दृष्टी असते. कारण विम्याची रक्कम एकमुष्ट मोठी मिळू शकते. त्यामुळे विम्याच्या पैशासाठी स्वकीयांच्या हत्या केल्याचीही प्रकरणेही घडतात. माणसांच्या शरीराप्रमाणे वाहने किंवा इतर वस्तूंच्याही विमा पॉलिसीज असतात. हे पैसे मिळविण्यासाठीही शक्कल लढविली जाते.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील काही व्यक्तींनी कारच्या विम्याचे पैसे मिळविण्यासाठी एक अभूतपूर्व युक्ती लढविल्याचे वृत्त सध्या प्रसिद्ध होत आहे. या लोकांच्या कारवर जंगली अस्वलाने हल्ला केला आणि त्यामुळे कारची हानी झाली, असा दावा करत या लोकांनी कारविमा कंपनीकडे पैसे मागितले. कारवर अस्वलाने हल्ला केल्याचा पुरावाही त्यांनी सादर केला. कारण विम्याचे पैसे मिळविण्यासाठी झालेल्या हानीचा पुरावा सादर करावा लागतो. या पुराव्यांची छाननी होते आणि नंतरच क्लेम मिळतो. अस्वलाने हल्ला केल्याचा व्हिडीओ पुरावा म्हणून सादर करण्यात आला. अर्थातच, या व्हिडीओचीही छाननी करण्यात आली.
पण छाननी करताना व्हिडीओतील काही दृष्ये संशयास्पद वाटू लागली. कारवर हल्ला केलेल्या अस्वलाचे दात आणि नखे खरी नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे या सर्व प्रकाराचे सखोल अन्वेषण करण्यात आले. तेव्हा असे निष्पन्न झाले की, हल्ला केलेले अस्वल खरे नव्हते. एका माणसालाच अस्वलाचे कातडे पांघरुन अस्वलाचे रुप देण्यात आले होते. अखेर या बहुरुप्याचा शोध घेण्यात आल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. हा बहुरुप्याही कारच्या मालकांचाच माणूस होता, हे देखील स्पष्ट झाले. आता या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.