आवडत्या दैवताचे पूजन जरी केले तरी भक्तांना देवत्व प्राप्त होते
भगवंत म्हणतात, प्रत्येकाच्या शरीरात मी वास करून असतो आणि त्याचे भले व्हावे म्हणून प्रयत्न करत असतो. निस्वार्थी असलेल्या ज्ञानी भक्ताने हे ओळखलेले असते आणि तो अनन्यतेने माझी भक्ती करत असतो परंतु बहुसंख्य लोक माझ्याकडे दुर्लक्ष करून स्वत:च्या वैषयिक इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून मीच निर्माण केलेल्या अन्य दैवतांची भक्ती करत असतात. ह्या देवांची निर्मिती मीच केलेली असल्याने त्यांची भक्ती जरी केली तरी अप्रत्यक्षरित्या ते माझीच भक्ती करत असतात. सर्व देव नमस्कारं केशवं प्रतीगच्छति असं एक संस्कृत सुभाषित आहे त्याचा अर्थ असा की, कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो केशवाला पोहोचतो.
कुणी अन्य दैवताची कुणी भक्ती केली तरी भगवंत नाराज होत नाहीत. म्हणून पुढील श्लोकात ते म्हणतात, जो अन्य दैवताची फलाकरिता उपासना करितो, त्याची इच्छा मी पुरवतो आणि त्या दैवताच्या ठिकाणी त्याची श्रद्धा स्थिर करतो.
श्रद्धेने ज्या स्वरुपास जे भजू इच्छिती जसे । त्यांची ती चि तशी श्रद्धा स्थिर मी करितो स्वये ।।21।।
माउली श्लोकाच्या विवरणात म्हणतात, सगळ्या देवी, देवता ही ईश्वराचीच रूपे आहेत परंतु लोकांच्या हे लक्षात येत नसल्याने ते सगळ्या देवी देवतांना वेगवेगळे समजतात. त्यांना वेगवेगळे पूजतात आणि ते आपली मनोकामना पूर्ण करतील अशा सर्वात्मक भावाने त्यांना कार्यसिद्धी होईपर्यंत पुजत राहतात.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, त्यांना हवे असेल ते देऊन मी इतर देवांना पुजणाऱ्या भक्तांची श्रद्धा स्थिर करतो. मात्र जे माझी भक्ती करतात त्यांना कायम टिकणारे फळ मिळते तर अन्य देवतांची पूजा करणाऱ्यांना अशाश्वत फल मिळते.
त्या श्रद्धेच्या बळाने ते त्या स्वरुपास पूजिती । मग मागितले भोग पावती मी चि निर्मिले ।। 22 ।।
अल्प बुद्धीमुळे त्यांस मिळे फळ अशाश्वत । देवांचे भक्त देवांस माझे ते मज पावती ।। 23 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, लोकांनी कोणत्याही देवाला पूजले तरी त्यांना जे हवे ते परमेश्वर त्यांना देत असतो. मात्र त्यांना हे कळत नाही कारण ते परमेश्वराला जाणत नाहीत. त्याला जाणण्यासाठी आशापाशातून मुक्त होणे आवश्यक असते आणि नेमके तेच त्यांना जमलेले नसते. त्यामुळे हवी असलेली फळे त्यांना जरी मिळत असली तरी ती विषयाशी संबंधित असल्याने नाशवंत असतात. अशाप्रकारे केलेले भजन हे संसाराचे साधन होय आणि त्यातून मिळणाऱ्या फळाचे सुख स्वप्नातून मिळणाऱ्या क्षणिक सुखाप्रमाणेच असते.
माऊली पुढे म्हणतात, ईश्वर हा अत्यंत दयाळू असल्याने लोकांनी, त्यांना हव्या असलेल्या दैवताचे पूजन निरपेक्षपणे केले तरी त्यांना देवत्व प्राप्त होते. जे अन्य दैवताची मनापासून भक्ती करतात, ते देहांती त्याच्यापर्यंत जातात. माउलीना असे म्हणायचे आहे की, जर इतर कशाची अपेक्षा न करता लोक त्यांच्या आवडत्या दैवताची पूजा करतात ते नक्कीच ईश्वराप्रत पोहोचतात.
क्रमश: