विविध मंदिरांमध्ये पूजा-अर्चा, अभिषेक
मंगळवारी चंद्रग्रहणामुळे धार्मिक विधी : शिधा देण्याच्या प्रथेचे पालन
बेळगाव : धुळवडीदिवशी म्हणजेच मंगळवार दि. 3 रोजी चंद्रग्रहण आल्याने या निमित्ताने विविध ठिकाणी पूजा-अर्चा, अभिषेक आदी धार्मिक विधी करण्यात आले. या दिवशी पुरोहितांना किंवा सुहासिनींना कोरडा शिधा व दक्षिणा देण्याची प्रथा असल्याने त्याचेही पालन करण्यात आले. हे चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरू झाले. सकाळी 11 पासून त्याचे वेध सुरू झाले. सश्रद्ध लोकांनी सकाळी 11 पूर्वीच भोजन करून ग्रहणाचा उदयास्त होईपर्यंत उपवास केला. सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांपर्यंत ग्रहणाचा पर्वकाल होता. तो संपल्यानंतर स्नान करून पुन्हा पूजा करून भोजन ग्रहण करण्यात आले. ग्रहण लागल्यानंतर परातीमध्ये मुसळ उभे करण्याची पारंपरिक पद्धत आहे. शहरामध्ये ती पद्धतही पाहायला मिळाली. दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरामध्ये संपूर्ण शिवपिंडी आणि कपिलनाथाच्या मूर्तीवर बेलपत्राचे आच्छादन चढविण्यात आले. तसेच परातीमध्ये मुसळ उभे करण्यात आले. शहापूर परिसरातही परातीमध्ये मुसळ उभे करण्यात आले. ते पाहण्यासाठी गर्दी झाली होती.