जगात भारी, मिसळ कोल्हापुरी !
कोल्हापूर / सुनिता कांबळे :
‘मम्मी भूक लागलीऽऽऽ’. ‘बस्स. दोन मिनिट बाळा..’ असे म्हणून आई काही तरी खायला देते. मुलं खुश. पण तर्रीदार मिसळ. त्यावर शेव चिवडा. बारीकसा कांदा, लिंबू, कोथंबिर आणि दाटसर सायीचं घट्ट दही बाजूलाच ब्रेडच्या स्लाईस. अशी डिश खायची जेव्हा इच्छा होते तेव्हा मिसळ बनवण्याचा घाट घालायला लागतो. त्यासाठी गृहिणींचा बराच वेळ जातो. पण हीच मिसळ जर इन्स्टंट मिळाली तर. म्हणजे ‘रेडी टू कुक अँड इट.’ तर काय धम्मालच. आपल्या सगळ्यांसाठीच ही इन्स्टंट मिसळ घेऊन आल्या आहेत, कोल्हापूरच्या लघु उद्योजिका शिल्पा कुलकर्णी.
शिल्पा कुलकर्णींचे पती कोल्हापुरातच कोकण शॉपी चालवतात. त्यामध्ये सर्व कोकणातील पदार्थ विक्रीसाठी आहेत. वेगवेगळ्या उत्पादकांकडून पदार्थ घेऊन ते शॉपीत विक्रीसाठी ठेवतात. त्यामध्ये ‘इन्संट मिसळ’ अशीच एका उत्पादकाने त्यांच्याकडे विक्रीसाठी दिली. शिल्पा घरातील कामे आटोपली की शॉपीमध्ये दिवसभर थांबून ‘इन्स्टंट मिसळ’ची माऊथ पब्लिसिटी करतात. मार्केटिंगची आवड येथूनच त्यांच्यात निर्माण झाली. तसेही त्यावेळी कोरोनामधून जग थोडे थोडे बाहेर येत होते.
कोल्हापूर मिसळने सगळ्यांनाच वेड लावले आहे. ही खवैय्यांची आवड ओळखून त्यांनी या ‘इन्स्टंट मिसळ’ची माऊथ पब्लिसिटी केली. मटकी, उकडलेला बटाटा, तेल, तिखट-मिठासह सगळा मसाला एका टिनमध्ये पॅकबंद केला जातो. हे पॅकबंद मिश्रण वर्षभर टिकते. यातून चार जणांसाठी भरपूर मिसळ तयार होते. फक्त टिन फोडून पातेल्यात ओतायचे आणि गरम पाणी घालायचे की झाली मिसळ तयार. मग बाकीच्या साहित्यांनी मिसळची सजावट केली अन् डिश समोर आली तर...! अहाहाऽऽऽ. तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहाणारच नाही.
सुरूवातीला त्यांना वाटले की ही अशी मिसळ कोण घेणार? कारण कोल्हापुरात तर पावलोपावली मिसळ मिळते. पण म्हणतात ना, कोणतीही गोष्ट मनापासून करायला लागलात तर तिथे तुमच्या सर्व प्रयत्नांचे यशात रूपांतर होते. अन् शिल्पा यांचेही असेच झाले. त्यांनी त्यांच्या मार्केटिंगचा कस लावला आणि पॅकबंद डब्यातील मिसळचे महत्व आणि चव याची माहिती दिली. ज्यांनी कुणी या पॅकबंद मिसळची चव चाखली त्यांच्याकडून आज मागणी वाढतच आहे.
पुणे, बेंगलोर, दिल्ली, मुंबई येथील आयटी क्षेत्रात, मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरीनिमित्त राहणाऱ्या किंवा शिकणाऱ्या तरूणाईच्या रूममध्ये या ‘टिन मिसळ’ ठाण मांडले आणि वर्षभर टिकत असल्याने रूमवर काही मिनिटातच मिसळचा आस्वाद घेणे सोपे झाले. देशाच्या सीमा ओलांडून ही मिसळ सातासमुद्रापार पोहोचली. तिचा प्रवास ऑस्ट्रेलिया, नेदरलँड कॅनडा आणि अमेरिका असा झाला. आता शिल्पांच्या मिसळने भारतीयांबरोबरच परदेशी पाहुण्यांनाही वेड लावले. 2022 ते 2025 या चार वर्षात या मिसळने बरीच घोडदौड केली.
- महिलांनी स्वत:ला सिद्ध करण्याची गरज
पदार्थांची चव आणि क्वालिटीच्या जोरावर बाजारात आपल्या व्यवसायात भरारी कशी घ्यायची, याचा पाठच शिल्पा यांनी दिला आहे. मुले लहान आहेत. नोकरी करणे जमत नाही, अशी सबब न देता मनापासून स्वत:ला सिद्ध करायचा प्रयत्न करायला हवा, असाच संदेश त्यांनी महिलांना दिला आहे.