कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

World Yoga Day 2025: योग म्हणजे आरोग्य, आनंद आणि आत्मशांती

05:16 PM Jun 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

धावपळीत एक गोष्ट मात्र हरवत चाललो आहोत ती म्हणजे आरोग्य आणि मनशांती

Advertisement

कोल्हापूर  : आज प्रत्येक माणूस काही ना काही कारणाने मानसिक तणावाखाली आहे. धकाधकीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं हे युग आहे. प्रत्येकजण यशाच्या, प्रगतीच्या, संपत्तीच्या मागे धावत आहे. पण या सर्व धावपळीच्या मध्ये एक गोष्ट मात्र आपण हरवत चाललो आहे ती म्हणजे आरोग्य आणि मनशांती.

Advertisement

मन आणि शरीर तंदुरुस्त नसेल तर यशाला काही अर्थ राहत नाही. पैसा, प्रतिष्ठा असते पण समाधान नसतं. म्हणूनच शरीर तंदुरुस्त आणि मन शांत, प्रसन्न ठेवायचं असेल तर योगशास्त्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. याच कारणासाठी जगभरात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.

भारताच्या या महान योगपरंपरेला मिळालेली ही जागतिक मान्यता अभिमानास्पद आहे. जवळजवळ 175 देशांनी संयुक्त राष्ट्रसंघात ठराव मंजूर करून हा दिवस साजरा करण्यास मान्यता दिली आहे. योग म्हणजे फक्त व्यायाम नव्हे; ती एक संपूर्ण जीवनशैली आहे. भगवद्गीतेमध्ये योग कर्मसु कौशलम् असं म्हटलं आहे म्हणजेच कर्मात कौशल्य प्राप्त करणं म्हणजे योग.

म्हणजेच केवळ शारीरिक कसरत नव्हे तर जीवनातील प्रत्येक कृतीमध्ये समतोल साधणं हे देखील योगाचाच भाग आहे. योगामुळे शरीर शुद्ध होतं, मन शांत होतं आणि आत्मा आनंदी बनतो. नियमित योग केल्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये प्राणशक्ती संचारते. शरीरातील चयापचय (मेटॅबोलिझम) सुरळीत होतं, पचनक्रिया सुधारते, झोप चांगली लागते, त्वचा तजेलदार बनते, केस गळणे कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनावरचा तणाव नाहीसा होतो.

मी स्वत: गेली 25 वर्षे रोज योगासने करतो. त्यामुळे वयाच्या पंच्याहत्तरीतसुद्धा शरीर हलकं, चपळ वाटतं, मन प्रफुल्लित राहतं. थकवा कधी जाणवत नाही, हे सर्व योगामुळेच शक्य झालं आहे. योगशास्त्र शिकण्यासाठी कुठलेही महागडे उपकरण लागत नाहीत, जिमसारखी फी भरावी लागत नाही, घरच्या घरी करता येणारी ही साधना आहे.

त्यासाठी फक्त वेळ आणि थोडं मनापासून केलं तरी पुरेसं आहे. सुरुवातीला योग्य मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. सकाळी सूर्योदयापूर्वी अर्धा तास शांत चित्ताने योग केलं, तर संपूर्ण दिवस ताजातवाना जातो. मनामध्ये नवी उमेद जागृत होते, शरीर हलकं राहतं आणि कामात एकाग्रता टिकते.

कोरोना काळात ज्या लोकांनी नियमित योग केला, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहिली. संसर्ग जरी झाला तरी सौम्य स्वरूपात झाला. यावरूनही योगाची उपयुक्तता सिद्ध होते. योगशास्त्राचा इतिहास 5000 वर्षांपेक्षा जुना आहे. आपल्या ऋषीमुनींनी त्याचा शोध लावला. भारताची ही अमूल्य देणगी आज संपूर्ण जग स्वीकारत आहे.

आजची तरुण पिढी सतत मोबाईल, टीव्ही, संगणक यामध्ये व्यस्त असते. त्यामुळे त्यांचं मन अस्थिर होतं, एकाग्रता कमी होते. पण जर लहानपणापासून योगाची सवय लागली, तर त्यांचं आयुष्य सुखकर, आरोग्यदायी आणि यशस्वी होईल. शेवटी इतकंच सांगतो की, योग आहे तर आरोग्य आहे, आरोग्य आहे तर जीवन आहे, जीवन आहे तर यश आहे.

मन शुद्ध, शरीर शुद्ध आणि आत्मा प्रफुल्लित ठेवण्याचं सर्वांत सोपं आणि नैसर्गिक साधन म्हणजे योग. त्यामुळे प्रत्येकाने दररोज न चुकता योग केला पाहिजे. योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नव्हे, तर तो आहे जीवनशैली, एकाग्रता, संयम, आनंद, आत्मविश्वास, उत्साह आणि आरोग्याचा मंत्र. आपण सगळे मिळून हा मंत्र उचलला तर आपल्या कुटुंबाचं, समाजाचं आणि देशाचं आरोग्य नक्कीच सुधारेल.

- श्री. विश्वास नारायण पाटील (आबाजी), माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक, गोकुळ दूध संघ.

Advertisement
Tags :
@kolhapur#central government#PM Modi#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaWorld Yoga Day 2025yog educationyoga day
Next Article