For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागतीक जल दिन विशेष

10:19 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
जागतीक जल दिन विशेष
Advertisement

कासावीस धरती...काय करणार एल अॅण्ड टी...

Advertisement

माणूस एकवेळ अन्नाविना राहू शकेल. परंतु पाण्याविना राहणे अशक्य. असे असूनही उपलब्ध असल्यामुळे आपल्याला पाण्याची किंमत नाही. मूलभूत आणि सार्वजनिक सुविधांच्या बाबतीत बेळगावकर नेहमीच दुर्दैवी ठरले आहेत. हा नन्नाचा पाढा नेहमीचाच आहे. परंतु जलाशयात पाणी असूनही केवळ योग्य नियोजनाचा अभाव, सातत्याने लागणाऱ्या गळत्या, पाणीपुरवठा करणारी एल अॅण्ड टी कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव बेळगावकरांच्या तोंडचे पाणी पळविणारा ठरला आहे. दुसरीकडे पाण्याच्या बाबतीत आपण किती जबाबदार आहोत? हा सुद्धा प्रश्नच आहे. सर्वसाधारणपणे आपण थोडेसे आत्मपरीक्षण केले तर आपणही किती पाणी वाया घालवतो याचा आपल्याला अंदाज येईल. त्यातील पहिले उदाहरण म्हणजे पिण्यासाठी आपण पाणी घेतो, दोन-तीन घोट पाणी पिल्यानंतर ते पाणी तसेच सोडून देतो, असे पाणी आपण जर मोजले तर आपल्या लक्षात येईल की आपण अतिशय अनमोल असलेल्या पाण्याची किंमत कवडीमोल करत आहोत.

सर्वत्र लागलेल्या गळत्यांमुळे वाया जाणारे पाणी हे तर नेहमीचेच. परंतु पाणी टंचाईमुळे, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे एल अॅण्ड टीच्या नावाने शिमगा करणारे आपण आपल्या टेरेसवरील टाक्या भरून वाहत असतात. तेव्हा त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करतो. आपल्या शेजारी-पाजारी हे चित्र नेहमीच दिसते. परंतु कशाला त्यांना सांगा, असे म्हणत आपण आपली जबाबदारी झटकतो. परंतु त्यामुळे किती लीटर पाणी वाया जाते, याची आपल्याला कल्पना येत नाही. अलिकडे सर्व समारंभामध्ये बिसलरी बाटल्या देण्याचे फॅड वाढले आहे. हजारो बाटल्या तेथे फक्त अर्धे पाणी पिऊन टाकून दिलेल्या आढळतात. याचे ना यजमानाना दु:ख आहे की निमंत्रितांना त्याचा खेद आहे! मुलांच्या हातात सुद्धा अशा बाटल्या देऊन पालक त्यांना मोकळे सोडतात. ही मुले पाण्याची प्रचंड नासाडी करतात. परंतु अतिलाडामुळे त्याकडेही आपण सोयिस्कर दुर्लक्ष करतो.

Advertisement

पाणी बचाव कार्यकर्ते सातत्याने अनेक सूचना करत असतात. ब्रश करताना बेसीनचा नळ सोडू नका?, दररोज गाड्या धुवू नका, सातत्याने भरपूर पाणी घेऊन फरशी धुवू नका, असे ते सातत्याने सांगत असतात. परंतु आपण मात्र ‘नळी फुंकली सोनारे’ असे म्हणत दुर्लक्ष करतो. एकूणच पाण्याचे महत्त्व फार कमी जणांच्या लक्षात आले आहे. उन्हाळ्यामध्ये बांधकामांसाठी पाणी वापराबाबत मार्गदर्शक प्रणाली ठरविणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, परंतु पाण्याची उधळपट्टी मात्र सर्व ठिकाणी दिसून येते. यापुढचे महायुद्ध पाण्यावरून होईल, अशी भीती वर्तविण्यात येते. म्हणूनच जागतिक शांततेसाठी पाणी या घोषवाक्यातून फार महत्त्वाचा संदेश दिला गेला आहे. आज नदी आणि धरण यांच्या पाण्यावरून राज्याराज्यांमध्ये, देशादेशांमध्ये वाद सुरू आहेत. जर शांततेसाठी पाणी याचे कृतिशील आचरण करावयाचे असेल तर पुढारलेल्या किंवा ज्यांच्याकडे पाणी किंवा त्याचे स्रोत उपलब्ध आहेत त्यांनी ते इतरांसाठी द्यायला हवेत. कारण पाण्याचे स्रोत किंवा पाणीच संपुष्टात आले तर  याचा परिणाम किंवा याच्या झळा एका व्यक्तीला नव्हे तर मानव समुहालाच बसणार आहेत, जे आपल्याला परवडणारे नाही.

शहरात सकाळी आणि सायंकाळच्यावेळी दुकानदार रस्त्यावर पाईपने भरमसाट पाणी मारतात. ठिकठिकाणी आपली दुचाकी आणि कार पाण्याचा गैरवापर करून वाहने धूत असतात. किमान उन्हाळ्यामध्ये जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन काही काळापुरते हे प्रकार आपण थांबवू शकतो. परंतु त्यासाठीची सामाजिक जाणीव प्रत्येकामध्ये असणे आवश्यक आहे. पाण्यावर कोणा एकाची मालकी नाही. त्यामुळे आम्हाला हवे ते आम्ही करू, असे मानणाऱ्यांनी पाण्याचा गैरवापर थांबविणे आवश्यक आहे. असा गैरवापर दिसल्यास एक जबाबदार नागरिक म्हणून आपण किमान त्यांना जाऊन पाण्याचे महत्त्व पटवून देणेही आवश्यक आहे.

नद्या समृद्ध ठेवल्यास पृथ्वीचे स्वास्थ चांगले : स्त्राsतांचे संवर्धन करणे गरजेचे

पाण्याला आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे, हे प्रत्येकालाच माहिती आहे. परंतु त्याचे महत्त्व जाणून घेण्याची गरज मात्र अधिक झाली आहे. यंदाच्या जलदिनाचे बोधवाक्य आहे ‘जागतिक शांततेसाठी पाणी’ शिकलेल्या सुसंस्कृत लोकांनी नैसर्गिक गोड्या पाण्याचे स्रोत नाहीसे केले आहेत. धरणे बांधून महाग पाणी दिले जात आहे. प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांच्या भविष्याबद्दल आपण गंभीर विचार करू शकत नाही. पाण्याला जीवन म्हणतात. आपल्या पृथ्वीवर पाणी मुबलक आहे म्हणून सजीव आहेत. समुद्राचे पाणी खारट असल्यामुळे ते सजीवांना उपयोगी नाही. समुद्रातले प्राणीदेखील जगण्यासाठी गरजेचे पाणी आपल्या अन्नातून मिळवतात. पृथ्वीवरील 98 टक्के पाणी समुद्रात आहे.

जीवित गोड्या पाण्यावर जगतात. 2 टक्के गोड्या पाण्यापैकी 80 टक्के पाणी जीविताना उपयोगी नाही कारण ते बर्फ आणि खूप जमिनी खाली आहे. आपण सर्व जीविताना नदी, नाले आणि तलाव यातील पाणी उपलब्ध आहे. पावसाचे पाणी हा मुख्य स्त्राsत. ते जमिनीमध्ये साठवले जाते. आणि जास्त असलेले पाणी नदी-नाल्यात वाहते. याच पाण्यावर उत्क्रांती झाली. कोट्यावधी सूक्ष्मजीव, प्राणी, पक्षी आणि वनस्पती तयार झाले. सर्व जीवितांचा पाण्यावर हक्क आहे. याच उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून एक सर्वात नवीन ‘मानव’ तयार झाला. आता बोला पृथ्वी कोणाची? कोट्यावधी वर्षे राहिलेल्या जीवाणू आणि इतर जीवितांची की तीन लाख वर्षांपूर्वी आलेल्या मानवाची? खर तर ‘पृथ्वी’ ग्रह म्हणून सजीव आहे. पृथ्वीमुळे आपण सजीव आहोत, आपल्यामुळे पृथ्वी सजीव नाही. हे पक्के ध्यानात ठेवले पाहिजे. नद्या पाणी इतरत्र पसरवतात. भारतात सह्याद्री डोंगरात पडलेल्या पावसाचे पाणी वर्षभर भारतीय द्वीपकल्पला पुरवितात आणि समृद्ध करतात. सह्याद्री डोंगरात पडणाऱ्या पावसाचे फक्त 1.5 टक्के पाणी जमिनीत मुरते आणि ते कृष्णा, कावेरी नद्यांतून वर्षभर वाहते. नदी प्रथम आपल्या खोऱ्यातील जमिनीमध्ये पाणी भरते. उपलब्ध पाणी आणि जमिनीतील क्षार वापरून त्यावर जीवसृष्टी उभी रहाते. एकदा आपले खोरे सक्षम झाले की मग बाजूच्या खोऱ्यात जीवसृष्टी आणि पाणी पाठवते. म्हणून एका नदीचे खोरे खराब झाल्यास त्याच्या बाजूच्या नद्यांची खोरे खराब होण्यास जास्त वेळ लागत नाही. नद्या समृद्ध ठेवल्यास आपले, इतर जिवांचे आणि पृथ्वीचे स्वास्थ चांगले राहणार.

जमिनीवरील उत्क्रांती ही नदी आणि नाल्यामुळे झाली. प्रत्येक नदी ही वैशिष्ट्यापूर्ण आहे. नदीचे खोरे हे नदीचे क्षेत्र असते. हे क्षेत्र जिवंत असते. त्यात विविध जीवित जगतात. प्रत्येक नदी खोऱ्यात विशिष्ट प्रकारचे जीव जगतात. म्हणूनच नदी आणि नदीचे खोरे हा जमिनीवरील स्वयंभू जीव आहे. मानव नदीकाठी निर्माण झाला आणि विकसित झाला. नदी हीच मानवाची खरी ओळख, संस्कृती आणि जननी आहे. आपण आईची जशी काळजी घेतली पाहिजे तशी नदी -खोऱ्याची घेतली पाहिजे. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी गोड्या पाण्याची गरज असते. जमिनीतील जिवाणू आणि वनस्पतीची मुळे जमिनीतील पाणी शोषतात. त्यावर जगणारे सजीव अन्नातून पाणी मिळवतात. सस्तन प्राणी आणि पक्षी यांना पाणी जास्त लागत असल्यामुळे पाणी पिण्याची गरज असते. निसर्गातील नद्या, नाले, डबकी, झरे व तलाव पिण्याच्या पाण्याची गरज भागवतात. हे सर्व पाणी फुकट आहे. माणूस पृथ्वीवर आल्यावर असाच लाखो वर्ष जगला. मानवाच्या आयुष्यात स्थिरता आल्यावर पाण्याची गरज वाढली. त्यानुसार विहिरी व तलाव निर्माण झाले. विहीर आणि तलाव खणायला किंमत मोजावी लागली. मग पाण्याची किंमत वाढली. आज मानवांनी पाण्याचे नैसर्गिक स्त्राsत खराब केले आहेत. शहरातील विहिरी आणि तलावदेखील दूषित केले आहेत किंवा झालेत. पाण्याची गरज तर कितीतरी पटीने वाढली.

पिण्याच्या पाण्याची किंमत?

आज आपल्या नळाला पाणी येते. ते मोठ्या बंधाऱ्यातून येते. नळ फिरवला की पाणी यायला चालू, ते नळ बंद करेपर्यंत येतच राहते. किती सोपे ना?

या पाण्याची किंमत मोजायचा प्रयत्न करूया.

  • बंधारा बांधण्यासाठी जागा शोध,
  • जागा विकत घेणे/ मिळविणे,
  • बंधारा बांधणे,
  • बंधारा ते गाव पाईप बांधणी आणि निगराणी
  • गावात पाणी निर्जंतुक करण्याची प्रक्रिया
  • लागणारी जागा, केंद्र आणि निगराणी
  • प्रक्रिया केंद्रापासून घरापर्यंत पाईप
  • बांधणी आणि निगराणी,
  • त्यासाठी रस्ते व वसाहत
  • दररोजच्या नियंत्रणासाठी मनुष्यब
  • दुऊस्ती.

वरील प्रत्येकाची किंमत किती तरी कोटी ऊपयात आहे. त्याची लिटर मागे किंमत काढली तर किती होईल? सामान्य कुटुंबाला परवडणारी आहे का? सरकार, जनतेसाठी हा सर्व खर्च करून पाणी आपल्या दाराशी आणून देते. इतके महाग पाणी, स्वस्त दरात देते. आपणच ठरवायचे की आपण पाण्याचा योग्य वापर कसा करायचा? खानापूर तालुक्मयात उगम पावणारी मलप्रभा नदी ही खानापूर, बेळगाव, धारवाड आणि बागलकोट भागाची जीवनधारा आहे. जीवनदायी माता मलप्रभाचे आजचे स्वरूप आपण मानवांनी केले आहे. त्यामुळे मलप्रभा नदीला पूर्व समृद्धी देण्याची जबाबदारी ही अपणा सर्वांची आहे.

चला तर मग लागुया कामाला..

आपली नदी, निकोप नदी.

बायोगॅसपासून पाणी तयार करणे शक्य : पुणे येथील शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांच्याकडून तंत्रज्ञान विकसित

बायोगॅसपासून पाणी तयार करणे शक्य आहे. पाणीटंचाई जाणवू लागते. तसे आपण पाणी तयार करू शकलो असतो तर बरे झाले असते, असे नक्कीच वाटून जाते. परंतु पाणी असे तयार करता येत नाही. मात्र बायोगॅस प्रकल्पामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून दररोज 1 हजार ते 1 लाख लीटर निर्मिती करणे शक्य आहे. हे तंत्रज्ञान पुणे येथील आंतरराष्ट्रीय किर्तीचे शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांनी विकसित केले आहे. त्यांच्या मते, 48 वर्षांपूर्वी हे तंत्रज्ञान अमेरिकेत विकसित झाले आहे. सरकारच्या नॅशनल बायोगॅस मॅनेजमेंट प्रोग्रॅम अंतर्गत देशभरात 10 लाख बायोगॅस प्रकल्प उभारले जात आहेत. त्या माध्यमातून युवकांना रोजगारही उपलब्ध होईल. या प्रकल्पासाठी मेंटेनन्सची गरज नाही. शहरात आणि ग्रामीण भागातही सतत कूपनलिका काढल्या जात असल्याने जमिनीतील पाणी पातळी कमी होते. त्यासाठी विजेचा आणि अन्य बराच खर्च येतो. शिवाय काही वर्षांनी पाण्याची पातळी बिघडते.

पाणी प्रश्न बऱ्याच अंशी मिटू शकेल

तथापि, बायोगॅस अंतर्गत या समस्येवर मात करता येते. त्यासाठी ओल्या कचऱ्यापासून खत आणि ऊर्जा निर्मितीसाठी बायोगॅस उभारले जातात. बायोगॅस हे हैड्रोकार्बन आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात हैड्रोजन असते. बायोगॅस पेटविला तेव्हा ठराविक तापमानानंतर यातील हैड्रोजन ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन पाणी तयार होते आणि वाफेच्या रुपातून वर उडून जाते. अशावेळी बायोगॅसच्या चिमणीपाशी ‘वॉटर रिकव्हरी युनिट’ वापरल्यास नागरिकांना पिण्यायोग्य पाणी मिळू शकते. एक किलो बायोगॅसपासून दोन लीटर पाणी मिळू शकते, असे शास्त्रज्ञ पार्थसारथी सांगतात. या तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास येत्या तीन वर्षांत देशातील पाणी प्रश्न बऱ्याच अंशी मिटू शकेल, असा त्यांचा विश्वास आहे.

सावध ऐका पुढल्या हाका... : शहरवासियांना पाणीटंचाईचे संकट

उन्हाळ्याची चाहूल लागली तशी बेळगावकरांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. शहराच्या असंख्य भागामध्ये पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. काही भाग तरी असे आहेत, की तेथे पंधरा-पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही. हे चित्र दरवर्षीचे आहे. पाण्याअभावी अनेक कामे खोळंबतात. परंतु त्याचा सर्वाधिक फटका महिलांना बसतो. पाण्याची वेळ निश्चित नसल्याने त्याची प्रतीक्षा करण्यात महिलांचा दिवस जातो. रात्री, अपरात्री, पहाटेच्यावेळी पाणी आले तर महिलांच्या झोपेचे खोबरे तर पुरुष मंडळींना घागरी उचलून पाणी ओतण्याचा त्रास. हे चित्र बहुसंख्य प्रभागामध्ये दिसते. शहरातील ड्रेनेज पाईप व्यवस्था, सुसुत्र व शिस्तबद्ध नसल्याने बहुसंख्य विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी मिश्रित झाले आहे. त्यामुळे एकीकडे पाण्याअभावी त्रास तर दुसरीकडे पाणी असूनही त्याचा वापर अशक्य, अशी विसंगती आढळते. विहिरी स्वच्छ झाल्यास पाण्याची टंचाई बऱ्यापैकी कमी होवू शकते. परंतु त्याबाबत मनपा उदासीन आणि नागरिक हताश अशी परिस्थिती आहे. सध्या सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या विहिरींची नियमित स्वच्छता करणे, त्यावर जाळी बसविणे, अशी कामे दरवर्षी हाती घेणे आवश्यक आहे. परंतु पाणीटंचाई म्हटले की, टँकर पाठवायचे आणि भरमसाट बिल वसूल करायचे?, एवढेच केले जात असल्याने बेळगावकरांच्या नशिबी असलेली पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता धूसरच. त्यातच तुम्ही लढा आम्ही मागे आहोत, ही वृत्ती या शहरातील सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी उपयोगाची नाही. सण-समारंभ आणि अगदी नुकताच महिला दिन करणाऱ्या बेळगावच्या सर्व महिलांनी किमान पाणीटंचाईचा, त्याच्या नियोजनाचा प्रश्न हाती घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा केला तर बदल निश्चितच होऊ शकतो. फक्त तो करायचा कोणी? इतकाच प्रश्न आहे.

Advertisement
Tags :

.