पॅरिसमध्ये सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब
रेल्वेस्थानकावरील घटनेमुळे वाहतुकीवर परिणाम
वृत्तसंस्था/पॅरिस
फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील रेल्वेस्थानकावरील ट्रॅकवर शुक्रवारी दुसऱ्या महायुद्धातील एक जिवंत बॉम्ब आढळल्यानंतर पॅरिस आणि लंडनला ये-जा करणाऱ्या सर्व युरोस्टार गाड्या रद्द करण्यात आल्या. याशिवाय फ्रान्सच्या उत्तरेकडील शहरांकडे जाणाऱ्या गाड्याही रोखण्यात आल्या होत्या. बॉम्ब सापडल्यानंतर अधिकाऱ्यांना तात्काळ सतर्क करून बॉम्ब निकामी पथक तैनात करण्यात आले. बॉम्ब निकामी पथकाने हा बॉम्ब अतिशय सावधगिरीने निकामी केला आहे. पॅरिसमधील एका रेल्वेट्रॅकवर शुक्रवारी सकाळी कामगार नियमित देखभालीचे काम करत असताना त्यांना एक विचित्र वस्तू निदर्शनास आली. ही वस्तू माती आणि ढिगाऱ्यात अर्धवट गाडलेल्या स्थितीत दिसत होती. याबद्दल कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर चौकशी करण्यात आली असता ही वस्तू दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले. त्याचे वजन सुमारे 660 पौंड होते.
या घटनेमुळे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वेसेवांना विलंब झाला आणि प्रवासात मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला. याचा परिणाम स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय रेल्वेसेवांवर झाला. बॉम्ब सापडल्यानंतर लंडन आणि पॅरिस दरम्यान हाय-स्पीड रेल्वे चालवणाऱ्या युरोस्टारने संपूर्ण दिवसासाठी त्यांच्या सर्व सेवा स्थगित केल्या. युरोस्टारने एक निवेदन जारी करून गैरसोयीबद्दल माफी मागितली आणि परिस्थितीमुळे झालेल्या व्यत्ययाबद्दल प्रवाशांना समजून घेण्याची विनंती केली. बॉम्ब सुरक्षितपणे निकामी केल्यानंतर रेल्वेसेवा हळूहळू पुन्हा सुरू झाली, परंतु प्रवाशांना विलंब आणि संभाव्य व्यत्यय येण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला. दुसऱ्या महायुद्धातील न फुटलेले बॉम्ब सापडणे ही फ्रान्समध्ये असामान्य घटना नाही. 1940 ते 1944 या काळात जर्मन ताब्याच्या काळात या देशावर मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ला करण्यात आला. या हल्ल्यातील लाखो न फुटलेले बॉम्ब जमिनीत गाडले गेले आहेत. या अवशेषांच्या शोधामुळे सुरक्षा धोक्यात येऊ शकते आणि अनेकदा व्यापक व्यत्यय येऊ शकतो.