जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब
वृत्तसंस्था/ बर्लिन
जर्मनीच्या हॅम्बुर्ग प्रांतात नुकताच दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडला. शाळेच्या बांधकामावेळी हा बॉम्ब सापडल्यानंतर तो सुरक्षितपणे निकामी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रक्रियेसाठी सुमारे अर्धा तास लागला. शनिवारी स्टर्नशांजे जिल्ह्यात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर 300 मीटरच्या परिघात राहणाऱ्या सुमारे 5 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. बॉम्ब सापडल्याने जिल्ह्यातील रेल्वेसेवाही बंद ठेवावी लागली. याशिवाय पोलिसांनी परिसरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारही बंद केले होते. जर्मनीमध्ये दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी जपानच्या दक्षिणेकडील मियाझाकी विमानतळाजवळ बॉम्ब सापडला होता. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानवर हा बॉम्ब टाकला होता. मात्र, त्याचा स्फोट झाला नसल्यामुळे तो जमिनीमध्ये तसाच राहिला होता.