दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बचा स्फोट
जपान विमानतळावरील घटना, वाहतूक विस्कळीत
वृत्तसंस्था / टोकियो
दुसऱ्या महायुद्धात उपयोगात आणल्या गेलेल्या ‘कामीकाझे’ प्रकारच्या बॉम्बचा स्फोट जपानमधील एका विमानतळावर झाला आहे. यामुळे या विमानतळाशी संबंधित 87 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. ही घटना बुधवारी मियाकाझी विमानतळावर घडली. स्फोटामुळे काही काळ घबराट पसरली होती. तथापि, नंतर स्थिती नियंत्रणात आणली गेली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (इ. स. 1939 ते 1945) अमेरिकेने टाकला होता. जपानने आपल्या ‘कामीकाझे’ हल्ल्यामुळे त्यावेळी अमेरिकेला संकटात टाकले होते. जपानला असा हल्ला करता येऊ नये, म्हणून अमेरिकेने जपानचे विमानतळ निकामी करण्याचे वायु अभियान चालविले होते. त्याच काळात हा बॉम्ब मियाकाझी विमानतळावर टाकण्यात आला होता. मात्र, त्यावेळी त्याचा स्फोट न होता तो विमानतळ परिसरात भूमीमध्ये खोलवर रुतून बसला होता. पण बुधवारी 2 सप्टेंबरला त्याचा अचानक स्फोट झाल्याने विमानतळ परिसर हादरला होता. सुरक्षेचा उपाय म्हणून 87 विमानउड्डाणे रद्द करण्यात आली होती.
दुसऱ्या महायुद्धातील स्थान
मियाकाझी हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानच्या क्यूशू बेटावर असणारा नौदलाचा तळ होता. त्यावेळीही तेथे हा विमानतळ होता. याच नौदल तळावरुन जपानने आपली अनेक आत्मघाती विमानपथके अमेरिकेच्या आस्थापनांवर हल्ला करण्याची पाठविली होती. त्यामुळे अमेरिकेने असे हल्ले रोखण्यासाठी या नौदल तळावर मोठा बॉम्ब हल्ला केला होता. त्या हल्ल्यात या परिसरात अनेक बॉम्ब अमेरिकेने टाकले होते. त्यातलाच हा एक स्फोट न झालेला बॉम्ब होता.
पहिला प्रसंग नव्हे....
विमानतळांवर दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बचा स्फोट होण्याचे हे जपानमधील प्रथम प्रकरण नाही. यापूर्वीही असे प्रसंग घडले आहेत. जपानमध्ये अनेक स्थानी असे न फुटलेले बॉम्ब भूमीत गाडले गेलेले आहेत. त्यांच्या कधीतरी अचानकपणे स्फोट होत असतो. गेल्यावर्षी जपानच्या साहाय्यता पथकांनी असे 37.5 टन वजनाचे 2 हजार 348 बॉम्ब निकामी केले आहेत. आणखी अनेक टन बॉम्ब अशाप्रकारे भूमीत गाडलेल्या स्थितीत असावेत, असे तज्ञांचे मत आहे. दुसरे महायुद्ध संपून आता 79 वर्षे झाली असली, तरी अनेक देशांमध्ये आजही असे बॉम्ब सापडतात.