विश्वरूपदर्शन
अध्याय आठवा
बाप्पांनी प्रदान केलेल्या ज्ञानचक्षुंनी वरेण्यराजा विश्वरूप पाहू लागला. असंख्य मुखांनी युक्त, असंख्य पाय व हात असलेले, सुगंधाने लिप्त, दिव्य अलंकार-वस्त्रs व माळा धारण केलेले, असंख्य नेत्र असलेले, कोटी सूर्याप्रमाणे तेज असलेले, आयुधे धारण केलेले असे ते सूंदर रूप होते. बाप्पांच्या शरीरामध्ये त्याने नानाप्रकारची त्रिभुवने पाहिली तो म्हणाला, देवा तुझ्या देहामध्ये देव, ऋषिगण व पितर मी पहात आहे. पाताळे, समुद्र, द्वीपे, राजे, महर्षि यांची सप्तके पहात आहे. हे विभू, नानाप्रकारच्या पदार्थांनी भरलेले तुझे रूप आहे.
पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग, मनुष्य, नाग, राक्षस, ब्रह्मदेव, विष्णु, महेश, इंद्र, नानाप्रकारचे देव व प्राणी तुझ्या शरीरामध्ये मी पहात आहे. पुढे तो म्हणाला,
अनाद्यनन्तं लोकादिमनन्तभुजशीर्षकम् ।
प्रदीप्तानलसंकाशमप्रमेयं पुरातनम् ।। 11 ।।
किरीटकुण्डलधरं दुर्निरीक्ष्यं मुदावहम् ।
एतादृशं च वीक्षे त्वां विशालवक्षसं प्रभुम् ।।12।।
अर्थ- आदिरहित, अन्तरहित, स्वर्ग, मृत्यु इत्यादि लोकांचा उत्पन्नकर्ता, अनन्त बाहु व शिरे असलेला, प्रदीप्त अग्नीप्रमाणे असलेला, अप्रमेय, पुरातन, किरीट व कुंडले धारण करणारा, ज्याच्याकडे पाहणे कठिण आहे असा, आनंदकारक, विशालता असलेल्या, प्रभु तुला मी पहात आहे.
सुरविद्याधरैर्यक्षैऽ किन्नरैर्मुनिमानुषैऽ ।
नृत्यद्भिरप्सरोभिश्च गन्धर्वैर्गानतत्परैऽ ।। 13 ।।
वसुरुद्रादित्यगणैऽ सिद्धैऽ साध्यैर्मुदा युतैऽ ।
सेव्यमानं महाभक्त्या वीक्ष्यमाणं
सुविस्मितैऽ ।।14।।
वेत्तारमक्षरं वेद्यं धर्मगोप्तारमीश्वरम् ।
पातालानि दिशऽ स्वर्गान्भुवं व्याप्याऽ खिलं स्थितम् ।। 15 ।।
भीता लोकास्तथा चाहमेवं त्वां वीक्ष्य रूपिणम् ।
नानादंष्ट्राकरालं च नानाविद्याविशारदम् ।। 16 ।।
प्रलयानलदीप्तास्यं जटिलं च नभऽ स्पृशम्
दृष्ट्वा गणेश ते रूपमहं भ्रान्त इवाभवम् ।। 17 ।।
आनंदाने जमलेल्या देव, विद्याधर, यक्ष, किन्नर, मुनी, मनुष्य, नाचत असलेल्या अप्सरा, गायनामध्ये तत्पर असलेले गंधर्व, वसु-रुद्र-आदित्य यांचे समुदाय, सिद्ध, साधू इत्यादिकांनी अत्यंत भक्तीने ज्याची सेवा चालविली आहे व अत्यंत विस्मयाने ज्याचे अवलोकन चालविले आहे अशा, ज्ञानी, नाशरहित, जाणण्याला योग्य, धर्माचे रक्षण करणारा, जगावर सत्ता चालविणारा ईश्वर, पाताळे-दिशा-स्वर्ग आणि संपूर्ण पृथ्वी व्यापून राहिलेला, अशा प्रकारचे रूप धारण करणाऱ्या तुला पाहून लोक व मी भय पावलो आहोत. हे गणेशा, अनेक दाढांच्यामुळे तुझे रूप भीषण दिसत आहे, नानाप्रकारच्या विद्यांमध्ये प्रवीण, प्रळयकाळच्या अग्नीप्रमाणे मुख प्रदीप्त असलेले, जटायुक्त, गगनाला स्पर्श करणारे असे तुझे रूप पाहून मी भ्रमिष्टासारखा झालो आहे.
मनुष्यनागाद्याऽ खलास्त्वदुदरेशयाऽ ।
नानायोनिभुजश्चान्ते त्वय्येव प्रविशन्ति च ।।18।।
अब्धेरुत्पद्यमानास्ते यथाजीमूतबिन्दवऽ ।
त्वमिन्द्राsऽ ग्निर्यमश्चैव निर्ऋतिर्वरुणो मरुत् ।।19 ।।
गुह्यकेशस्तथेशानऽ सोमऽ सूर्योऽ खिलं जगत् ।
नमामि त्वामतऽ स्वामिन्प्रसादं कुरु मेऽ धुना ।। 20।।
अर्थ- देव, मनुष्य, नाग इत्यादि, सर्व तुझ्या उदरामध्ये राहतात, नानाप्रकारच्या योनी पावतात व अखेरीस तुझ्यामध्येच प्रवेश करतात. ज्याप्रमाणे सागरापासून उत्पन्न होणारे मेघाचे बिंदु पुन्हा सागरात प्रवेश करतात तद्वत् इंद्र, अग्नि, यम, वरुण, वायु, गुह्यकांचा स्वामी कुबेर, शंकर, चंद्र, सूर्य, सर्व जग तू आहेस. म्हणून हे स्वामिन्, मी तुला प्रणाम करतो. आता माझ्यावर कृपा कर.
क्रमश: