विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ओव्हलवर
वृत्तसंस्था, लंडन
2027 मध्ये होणाऱ्या आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामन्यांचे यजमानपद ओव्हलला बहाल करण्यात आले आहे. हा अंतिम सामना 9 ते 13 जून दरम्यान खेळविला जाईल, अशी घोषणा गुरुवारी आयसीसीतर्फे करण्यात आली आहे.
आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचे गेल्या वर्षी इंग्लंडने यजमानपद भूषविले होते. आता 2027, 2029 आणि 2031 मध्ये होणाऱ्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामन्याचे यजमानपद पुन्हा इंग्लंडकडे ठेवण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. 2027 ची आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना ओव्हल मैदानावर होणार असून या मैदानाला दुसऱ्यांदा यजमानपदाची संधी मिळाली आहे. यापूर्वी म्हणजे 2023 साली ओव्हल मैदानावर या स्पर्धेतील अंतिम सामना खेळविला गेला होता आणि ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करुन विजेतेपद मिळविले होते.
सध्याच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या सायकलमध्ये अंतिम फेरीत पोहचण्यासाठी अद्याप 9 संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 8 पैकी 7 कसोटी सामने जिंकून 87.50 टक्के गुणासह आघाडीचे स्थान मिळविले आहे. विद्यमान विजेते दक्षिण आफ्रिका 75 टक्के गुण घेत दुसऱ्या, न्यूझीलंड 72.22 टक्के गुण घेत तिसऱ्या स्थानावर आहे. अलिकडेच बांगलादेशने पाकिस्तानचा कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव करुन 58.33 टक्के गुण मिळविले असून हा संघही अंतिम फेरीतील प्रवेशासाठी चुरस करीत आहे. भारतीय संघ 48.15 टक्के गुण नोंदवित पाचव्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 9 पैकी 4 कसोटी सामने जिंकले आहेत. श्रीलंका 41.67 टक्के गुणासह सहाव्या, इंग्लंड 24.36 टक्के गुणासह सातव्या, विंडीज 15 टक्के गुण घेत आठव्या तर पाकिस्तान 8.33 टक्के गुण घेत नवव्या स्थानावर आहे.
जुलै-ऑगस्ट दरम्यान विंडीज आणि पाक यांच्यात विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार असून या मालिकेला 25 जुलैपासून प्रारंभ होईल. तसेच ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियात 13 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ या मालिकेत एकतर्फी विजय मिळवून गुण तक्त्यातील आपले अग्रस्थान अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करेल. श्रीलंका आणि भारत यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून लंकेत खेळवली जाणार आहे. तर पाकचा संघ ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. आतापर्यंत आयसीसीची विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा तीन वेळा भरवली गेली. न्यूझीलंडने 2021 आणि 2023 साली तर ऑस्ट्रेलियाने आणि 2025 साली दक्षिण आफ्रिकेने विजेतेपद मिळविले आहे.