For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताच्या ‘चांद्रयान-3’ला जागतिक अंतराळ पुरस्कार

06:48 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताच्या ‘चांद्रयान 3’ला जागतिक अंतराळ पुरस्कार
Advertisement

इटलीमध्ये 14 ऑक्टोबरला पुरस्कार वितरण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरून इतिहास रचणाऱ्या आणि जगभरात भारताचा ध्वज फडकवणाऱ्या चांद्रयान-3 मोहिमेला जागतिक अंतराळ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाने रविवारी यासंबंधीची घोषणा करताना भारताने केलेली ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे म्हटले आहे. 14 ऑक्टोबर 2024 रोजी इटलीतील मिलान येथे होणाऱ्या 75 व्या आंतरराष्ट्रीय अंतराळवीर परिषदेत चांद्रयान-3 ला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘चांद्रयान-3’ने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर यशस्वी लँडिंग केले होते.

Advertisement

भारताशिवाय आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन चंद्रावर उतरले आहेत. इस्रोचे यशस्वी केलेले चांद्रयान 3 उ•ाण हे वैज्ञानिक प्रयोग आणि किफायतशीर अभियांत्रिकीचे अनोखे उदाहरण आहे. हे भारताच्या अवकाश संशोधनाच्या प्रचंड क्षमतेचे प्रतीक आहे, असे इंटरनॅशनल एस्ट्रोनॉटिकल फेडरेशनने सांगितले. चांद्रयान-3 ने चंद्राची रचना आणि भूगर्भशास्त्रातील न पाहिलेले पैलू उघड केले आहेत. ही मोहीम अंतराळ क्षेत्रातील नवीन प्रयोगांसाठी जागतिक यश मिळवू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

इस्रोचे कठोर परिश्रम-जिद्द

भारताने पाठवलेल्या चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिणेकडील पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केले. देशाच्या इतिहासातील हा अभिमानाचा क्षण होता. चांद्रयान 3 मोहिमेच्या यशामागे त्याचे प्रकल्प संचालक पी वीरामुथुवल आणि इस्रोमधील त्यांच्या टीमने रात्रंदिवस काम केले. यापूर्वी भारताने चांद्रयान-1 आणि चांद्रयान-2 प्रक्षेपित केले होते. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही. यानंतर चांद्रयान-3 मोहीम हाती घेत ती यशस्वी करून दाखवली होती.

इस्रो अध्यक्षांकडून शास्त्रज्ञांना श्रेय

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) प्रमुख एस सोमनाथ यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाचे श्रेय आपल्या सर्व शास्त्रज्ञांना दिले होते. या मोहिमेत दु:ख आणि त्रास सहन करूनही यशप्राप्तीवर ठाम राहिल्यामुळेच ही मोहीम यशस्वी झाल्याचे सोमनाथ यांनी म्हटले होते. येत्या काही वर्षांत भारतीय अवकाश यंत्रणा अशाचप्रकारे मंगळावर यान उतरवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशात देशातील अंतराळ संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाच्या नव्या पिढीच्या योगदानाचीही त्यांनी प्रशंसा केली होती.

Advertisement
Tags :

.