जागतिक दृष्टीदान दिन 2025 : कोल्हापुरात नेत्रदानाने दिली 100 जणांना दृष्टी
काळानुरूप नेत्रदानाचे प्रमाण आणि प्रबोधनात्मक उपक्रम वाढवण्याची गरज
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयाच्या (अंतर्गत) जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या पाच नेत्र पेढ्या, बँकांच्या माध्यमातून जिल्ह्यात 185 जणांनी नेत्रदान केले आहे. यामध्ये 100 जणांना डोळे बसवण्यात यश आले आहे. त्यांना नव्याने दृष्टी मिळाली आहे. तरीही काळानुरूप नेत्रदानाचे प्रमाण आणि प्रबोधनात्मक उपक्रम वाढवण्याची गरज आहे.
दरवर्षी 10 जून हा जागतिक नेत्रदान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त नेत्रदानाचे महत्त्व आणि त्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. जिह्याने नेत्रदान आणि अवयवदानाबाबत उल्लेखनीय कामगिरी केली असली, तरी याबाबत आणखी प्रबोधनाची गरज आहे.
जिह्यात 2024-25 या वर्षात 185 जणांनी नेत्रदान केले, आणि अवयवदान आणि नेत्रदानात कोल्हापूर जिह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. ही बाब अभिमानास्पद असली, तरी नेत्रदानाबाबत जनजागृतीसाठी अधिक प्रभावी पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
नेत्रदान एक महान दान आहे, ज्याद्वारे अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आणता येतो. मृत्यूनंतर केवळ काही मिनिटांत नेत्रसंकलन करून कॉर्निया प्रत्यारोपणाद्वारे दृष्टीहीन व्यक्तीना दृष्टी प्रदान करता येते. जिह्यातील नेत्रपेढ्या आणि रुग्णालये यासाठी कार्यरत आहेत. परंतु शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालये, चित्रपटगृहे, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण करणारे फलक किंवा माहितीपटांचा अभाव आहे. यामुळे जनजागृतीला मर्यादा येत आहेत. तेथे माहितीपूर्ण फलक लावणे आणि स्थानिक भाषेत प्रबोधनाचे कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे.
गैरसमज दूर करण्याची गरज
ग्रामीण भागात नेत्रदानाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी शिबिरे, व्याख्याने आणि जनजागृती अभियानांची गरज आहे. अनेकांना असे वाटते, की नेत्रदानामुळे मृतदेहाचे स्वरूप बिघडते किंवा ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. प्रत्यक्षात, नेत्रसंकलन ही 10 ते 15 मिनिटांची साधी प्रक्रिया आहे, जी केवळ नोंदणीकृत डॉक्टरांद्वारेच केली जाते.
राज्यात कोल्हापूर तिसऱ्या स्थानावर
जिह्याने अवयवदान, नेत्रदानात राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. परंतु, देशात दरवर्षी होणाऱ्या 80 लाख मृत्यूंपैकी केवळ 25 हजार जणच नेत्रदान करतात, अशी माहिती सर्वेक्षणाद्वारे उपलब्ध झाली आहे. यावरून नेत्रदानाचे प्रमाण अजूनही खूपच कमी आहे, हे स्पष्ट होते.
जनजागृतीसाठी प्रभावी उपाय
स्थानिक पातळीवर नेत्रपेढ्यांचे जाळे विस्तारणे, फिरत्या नेत्र पथकांचा वापर करणे आणि सोशल मीडियासह पारंपरिक माध्यमांद्वारे प्रबोधन आवश्यक आहे. विशेषत: चित्रपटगृहांसारख्या सार्वजनिक ठिकाणी लघुपट दाखवणे, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये माहिती केंद्रे उभारणे आदी उपाय प्रभावी ठरू शकतात.
जिल्ह्यातील नेत्रपेढ्या
सीपीआर हॉस्पिटल अंतर्गत जिल्ह्यात सहा नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. यामध्ये सीपीआर आय बँक, डी. वाय. पाटील नेत्रपेढी, अॅस्टर आधार, प्रगती नेत्र रूग्णालय, आदित्य आय बँक इचलकरंजी, अपुंर हॉस्पिटल गडहिंग्लज यांचा समावेश आहे.
प्रत्येकाच्या पुढाकाराची गरज
"प्रशासनाद्वारे नेत्रदानाविषयी जनजागृती केली जात आहे. कोणताही गैरसमज न बाळगता नेत्रदानासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. ‘सीपीआर’मध्ये डोळ्यांच्या विविध आजारावर आधुनिक तंत्राद्वारे उपचार केले जातात."
- डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक, कोल्हापूर