धनुषचा नेमबाजीत विश्वविक्रम
वृत्तसंस्था/ टोकियो
येथे सुरु असलेल्या 25 व्या उन्हाळी डेफलिंपिकमध्ये नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देताना धनुष श्रीकांतने 10 मीटर एअर रायफलमध्ये नवा विश्वविक्रम नोंदवला. त्याने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी डेफलिंपिक पात्रता विक्रमही मोडल्यानंतर अंतिम फेरीत धनुषने 252.2 गुण मिळवत 251.7 गुणांचा स्वताचा विश्वविक्रम मोडून काढत सुवर्णपदक जिंकले.
त्याचा सहकारी मोहम्मद मुर्तझा वानियाने 250.1 गुणांसह रौप्यपदक मिळवले. महिलांनी रौप्य व कांस्य मिळवित स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नेमबाजीत भारतासाठी चार पदके मिळवली.
महिलांच्या 10 मी एअर रायफलच्या अंतिम फेरीत, महित संधूने 250.5 गुणांसह रौप्यपदक जिंकले. युक्रेनच्या व्हायोलेटा लायकोवाने 252.4 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. भारताच्या कोमल मिलिंद वाघमारेने 228.3 गुणांसह कांस्यपदक जिंकून भारतीय महिलांसाठी दुहेरी पोडियम फिनिशिंग केले. महिलांच्या पात्रता फेरीत विश्वविक्रम असलेल्या महितने दक्षिण कोरियाच्या डेन जेओंगच्या मागे 623.4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले होते.
अंतिम फेरीत धनुषचा स्कोअर गेल्या आठवड्यात झालेल्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिमध्ये त्याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत जर्मनीच्या मॅक्सिमिलियन डॅलिंगरने मिळवलेल्या शॉटपेक्षा जास्त आहे. पात्रता फेरीत, धनुषने 630.6 गुणांसह दक्षिण कोरियाच्या किम वू रिमने ब्राझीलमधील कॅक्सियास दो सुल येथे मागिल आवृत्तीत प्रस्थापित केलेल्या 625.1 गुणांचा विद्यमान डेफलिंपिक विश्वविक्रम मागे टाकला. मुर्तझाने 626.3 गुणांसह डेफलिंपिक वैयक्तिक स्कोअरमध्येही सुधारणा केली. अंतिम फेरीत दोन्ही भारतीय खेळाडूंत चुरस लागली होती. परंतु धनुषने 10 गुणा जास्त वेळा मिळवल्यामुळे त्याला सुवर्णपदक मिळाले. दक्षिण कोरियाच्या सेउंघक बेकने कांस्यपदक जिंकले.