For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

दिल्लीत जागतिक पॅरा-आर्मरेसलिंग स्पर्धेचे उद्घाटन

06:34 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीत जागतिक पॅरा आर्मरेसलिंग स्पर्धेचे उद्घाटन
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या महिला पॅरालिम्पिक पदक विजेत्या आणि पद्मश्री, खेल रत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या दीपा मलिक यांनी रविवारी पूर्व दिल्लीतील द लीला अॅम्बियन्स कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये 28 व्या जागतिक पॅरा आर्मरेसलिंग स्पर्धेचे उद्घाटन केले. ही स्पर्धा 7 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या 47 व्या जागतिक आर्मरेसलिंग स्पर्धेसोबत आयोजित केली आहे.

Advertisement

मलिक सध्या आशियाई पॅरालिम्पिक समितीच्या (एपीसी) कार्यकारी मंडळावर दक्षिण आशियाच्या उप-प्रादेशिक प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत आणि त्या भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या (पीसीआय) माजी अध्यक्षा आहेत. भारतीय पॅरालिम्पिक समितीचे उपाध्यक्ष आणि पॅरिस 2024 पॅरालिम्पिक खेळांमधील भारतीय पथकाचे माजी प्रमुख सत्य प्रकाश संगवान हे उद्घाटनासाठी मलिक यांच्यासोबत हजर होते. यावेळी जगभरातील पॅरा-अॅथलीट एकत्र जमले होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना दीपा मलिक म्हणाल्या की, मैत्री, अडथळे तोडणे, सीमांच्या पलीकडे जाणे आणि हृदय जुळविणे हीच खरी क्रीडा भावना आहे. एकमेकांच्या संस्कृतींचा स्वीकार करायला हवा आणि प्रत्येक वेळी स्पर्धेसाठी वेगवेगळ्या देशात जाताना एकमेकांकडून शिकायला हवे, असे त्या पुढे म्हणाल्या. 60 हून अधिक देश सहभागी झाले असून जगाच्या विविध भागांतून 400 हून अधिक पॅरा-अॅथलीट एकत्र आले आहेत. हे आपल्या सरकारचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष दिल्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांना एक नवीन भारत पाहायचा आहे जो सर्वसमावेशक असेल, जो सर्वांच्या विकासाचा उत्सव साजरा करेल, समान संधी देईल आणि एक सर्वसमावेशक क्रीडा परिसंस्था तयार करत आहे.

Advertisement

जेव्हा भारताला या स्पर्धेचे आयोजन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली, तेव्हा मी स्वत: बल्गेरियामध्ये उपस्थित होते आणि ही गोष्ट प्रत्यक्षात साकार होताना पाहून मला आनंद होत आहे, असेही त्या म्हणाल्या.

Advertisement
Tags :

.