पुढील आठवड्यात पणजीत जागतिक मराठी परिषद
परिषद तीन दिवस कला अकादमीमध्ये होणार : परिषद यशस्वी करण्यासाठी विविध समित्या, उपसमित्या स्थापन
पणजी : पुढील आठवड्यात गोव्यात जागतिक मराठी परिषद आयोजित केली असून नामवंत मंडळी त्यानिमित्त गोव्यात येणार आहे. परिषदेच्या आयोजनासाठी इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब यांच्या अध्यक्षतेखाली सध्या जोरदार तयारी चालू आहे. परिषद तीन दिवस कला अकादमीमध्ये होणार असून उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याबरोबरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले आहे. जागतिक मराठी अकादमीच्या नेतृत्वाखाली गोव्यात ही परिषद दुसऱ्यांदा होत असून परिषदेच्या आयोजनाच्या विविध समित्या जोरदार कार्य करीत आहे. या परिषदेत गोव्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शिक्षक देखील मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत. हे परिषद सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली असून अनेक परिचर्चा मुलाखती तसेच विविध सादरीकरण देखील करण्यात येणार आहे.
मराठी मान्यवरांचा सहभाग
ही परिषद साहित्य संमेलन नसून त्यामध्ये मराठी क्षेत्रातील अनेक उद्योजक, अनेक समाजसेवक, अनेकांचा उत्तुंग पातळीवर पोहोचलेला जीवन प्रवास, त्याचबरोबर कर्तृत्वान मंडळींचा सन्मान देखील केला जाईल. त्याचबरोबर त्यांच्या जीवन प्रवासावर प्रकाशझोत टाकण्यात येईल. कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभागृहात हे परिषद होत असून देशी व विदेशातील अनेक नामवंत मराठी मंडळी या परिषदेच्या निमित्ताने गोव्यात पोहोचत आहेत. परिषदचे अध्यक्ष म्हणून प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हे उपस्थित राहतील. उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे या परिषदेचे स्वागताध्यक्ष आहेत. सध्या परिषदेचे यशस्वी आयोजन व्हावे या उद्देशाने विविध समित्या व उपसमित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि विविध पातळीवर उत्साहाने काम चालू आहे.
मराठी शिक्षकांना ‘ऑन ड्युटी’ची सवलत
तीन दिवसांच्या या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी गोवा सरकारने तथा शिक्षण संचालनालयाने परिपत्रक जारी केले असून सरकारी, निम सरकारी तथा खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कूलमधील मराठी शिक्षकांना या कार्यक्रमास ‘ऑन ड्युटी’ पाठविण्याची शिफारस केली आहे. जे मराठी शिक्षक या परिषदेत सहभागी होण्यासाठी येतील त्या सर्व शिक्षकांना त्यांची हजेरी ही सेवेतील हजेरी म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे जागतिक मराठी परिषद ही गोव्यातील शिक्षक वर्गासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.