World Heritage Panhala: आमचे अस्तित्व राहणार काय? पन्हाळ्यांतील रहिवाशांच्या मनातील शंका
युनेस्कोच्या नावावर मूळ रहिवाशांना हलवू नये एवढीच आमची अपेक्षा
कोल्हापूर : पन्हाळा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत गेला याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. पण वारसा स्थळामुळे जे काही निर्बंध येतील त्यात पन्हाळ्यातील वस्ती हलवणार की काय ही भीती जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाने पन्हाळकरांना लेखी आश्वासन देऊन त्यांच्या मनात विनाकारण दडलेली एक अनामिक भीती दूर करावी अशी अपेक्षा पन्हाळ्यातील काही ज्येष्ठ रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
पन्हाळ्याचे रहिवासी म्हणून आम्ही अभिमान जपला. आणि त्याचबरोबर पन्हाळाही जपला. पण युनेस्कोच्या नावावर मूळ रहिवाशांना हलवू नये एवढीच आमची अपेक्षा आहे. असाही सूर काही रहिवाशांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना व्यक्त केला आहे.
वीस नागरिकांच्या समितीला गरज, लागेल तेव्हा प्रशासन बोलवणार वारसा स्थळासंदर्भातल्या ज्या विविध शंका आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी पन्हाळ्यातील नागरिकांनीच 20 रहिवाशांची एक यादी द्यावी. जेणेकरून सर्व नागरिक सर्व रहिवाशांना बोलावून बैठक घेण्याऐवजी या वीस जणांच्या समितीशीच प्रशासनालाच चर्चा करता येईल असे पत्र प्रशासनाने जेष्ठ रहिवासी रामानंद गोसावी यांना आज दिले आहे.
"पन्हाळ्याला पुरातत्व खात्याचे अनेक नियम लागू आहेत. याची अंमलबजावणी कमी अधिक प्रमाणात होत आहे. पण वारसा स्थळ म्हणून पन्हाळा जाहीर झाल्यानंतर या वस्तीचे काय होणार ही शंका अनेकांच्या मनात नक्कीच आहे. प्रशासनाने याबाबत आश्वासन जरूर दिले आहे. पण पन्हाळकरांना आणखी विश्वासात घेऊन ही भीती दूर करण्याची नक्कीच गरज आहे."
- विजय पाटील, माजी नगराध्यक्ष
"पन्हाळा वारसा स्थळाचे यादीत गेला चांगलीच गोष्ट आहे. पण म्हणून पन्हाळ्यातील नागरिकांचे स्थलांतर होणार नाही असे आश्वासन जरूर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आहे. पण त्या बैठकीचे ठळक मुद्दे आम्हाला लेखी मिळावेत अशी मागणी करूनही अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या मनात काही शंका येणे साहजिकच आहे. प्रशासनाने ही शंका दूर करून रहिवाशांना हलवले जाणार नाही असे लेखी देण्याची गरज आहे. जेणेकरून पन्हाळकर अगदी मनापासून युनेस्कोच्या निर्णयाचे स्वागत करतील."
- अॅङ रवी तोरसे
"पन्हाळगडाचा समावेश वारसा स्थळाच्या यादीत झाला याचा आम्हाला अभिमान आहे. पण आपल्याला पन्हाळ्यातून हळूहळू हलवणार अशा स्वरूपाची एक शंका प्रत्येकाच्या मनात घर करून राहिली आहे. पन्हाळ्यातले आपले अस्तित्व गेले तर काय? ही कल्पनाच पन्हाळकरांना सहन होत नाही. त्यामुळे युनेस्कोच्या निर्णयाचे स्वागत करताना पन्हाळ्याच्या रहिवाशांनाही एक ठाम असे आश्वासन वरिष्ठ पातळीवर देणे आवश्यक आहे."
- चेतन भोसले
"पन्हाळ्यातील स्थानिक नागरिकांना जागतिक वारसा स्थळामुळे स्थलांतरित व्हावे लागणार नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जरूर सांगितले आहे. पण त्या बैठकीतील ठळक मुद्दे जे काही असतील ते प्रशासनाने लेखी पन्हाळकरांना द्यावे अशी एक अपेक्षा आहे. कारण ज्या वेळा युनेस्कोची समिती पाहणीला आली त्यावेळी पन्हाळ्यातील सर्व खाऊच्या हात गाड्या हलवण्यात आल्या. मोबाईलचे टॉवर काढण्यासाठी नोटीसा देण्यात आल्या. त्यामुळे रहिवाशांच्या मनात काही शंकांनी घर केले आहे. या शंका दूर करणे अतिशय आवश्यक आहे. कारण पन्हाळा वारसा स्थळांच्या यादीत गेला याचा आनंद जरूर आहे. पण त्याला चिंतेची जोड आहे."
- असिफ मोकाशी, माजी नगराध्यक्ष
"आम्ही पन्हाळकरांनी पहिल्यांदा युनेस्कोच्या पाहणीला विरोध केला. त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे पन्हाळ्यावर आले. त्यांनी पन्हाळकरांशी चर्चा केली. त्या चर्चेत चर्चेत जिल्हाधिकाऱ्यांनी पन्हाळ्यावरची वस्ती हालणार नाही असे आश्वासन दिले. तेच आश्वासन आम्ही लेखी स्वरूपात मागत आहोत. ही बैठक होऊन तीन महिने झाले तरी आम्हाला अजून त्यातील ठळक मुद्दे मिळालेले नाही. वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा गेला याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे. पण याचवेळी प्रशासनानेही आम्हाला ठोस आश्वासन देण्याची गरज आहे."
- रामानंद गोसावा