World Heritage Panhala: विरोध असूनही पन्हाळ्याचा युनेस्कोत समावेश, गावकऱ्यांत घेतली धास्ती
गावकऱ्यांनी निवदने, गावसभा घेत समावेशाला विरोध दर्शवला होता
By : आबिद मोकाशी
पन्हाळा : पन्हाळ्याचा युनेस्कोच्या यादीत समावेशाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवला. मात्र विरोध असून देखील आता युनेस्कोत पन्हाळ्याचा समावेश झाला. याचा त्रास होणार की फायद्याचे ठरणार, हे येत्या काळात समोर येईल. त्यामुळे आता पुढे काय, याकडे पन्हाळकरांच्या नजरा लागल्या आहेत. पन्हाळगडाला इतिहासात फार मोठे महत्त्व आहे.
स्वराज्याची उपराजधानी आणि मराठ्यांच्या दैय्यदिप्यमान इतिहास पन्हाळ्याशिवाय पूर्णच होत नाही. त्यामुळे पन्हाळ्याची ओळख जगाच्या नकाशावर होणे ही अभिमानास्पद बाब आहे. पण येथील स्थानिकांच्या हक्काला बाधा येत असेल तर त्याचा काय उपयोग, याकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळेच गावकऱ्यांनी निवदने, गावसभा घेत समावेशाला विरोध दर्शवला होता.
त्यात पाण्याच्या टाकीची उंची कमी होणार, आकशवाणी, बीएसएनएल टॉवर काढण्यात येणार आहेत. युनेस्कोच्या पथकाच्या पाहणीवेळी जुन्या जकात नाक्याची पाडलेली इमारत, छोटे-मोठे हलवलेले स्टॉल यामुळे आताच एवढा त्रास होत असेल तर युनेस्कोत सामील झाल्याल काय, याची पन्हाळकरांनी धास्तीच घेतली.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला, पण जिल्हाधिकाऱ्यांनी पन्हाळ्यात येऊन चर्चा करुन सर्वांना विश्वासात घेऊन, कोणताही अधिकचे नियम लादले जाणार नाही, याची खात्री दिली. तरी देखील गावकऱ्यांनी तशी लेखी मागणी लावून धरली. पण जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी हमी दिली नाही. त्यामुळे विरोध कायमच होता.
त्यात स्थानिक आमदार आणि खासदारांनी देखील गावकऱ्यांच्या भावना तीव्र असून देखील त्यांनी आपले पत्ते ओपन न केल्याने त्यांच्या भुमिकेवर देखील संभ्रम निर्माण झाला. आता काहीही असू दे. पन्हाळ्याची नोंद जागतिक वारसा स्थळात झाली. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक येतील, पर्यटन व्यवसायाला बहर येईल.
रखडलेली कामे मार्गी लागतील, पन्हाळ्याचा विकास होईल, अशी अपेक्षा आहे. पण येथील निर्बंध कडक होऊन स्थानिकांच्या हक्कांना बाधा पोहोचणार, असा संभ्रम कायम आहे. त्यामुळे ही घोषणा झाल्यापासून गडावर सन्नाटाच जास्त आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांशी समन्वय साधून संभ्रम दूर करण्याची गरज आहे
"पन्हाळ्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश होणे ही अभिमानास्पद बाब आहे. पण याबाबत स्थानिकांना विश्वासात घेणे, त्यांचा संभ्रम दूर करणे गरजेचे होते. ते अद्यापही दूर झालेले नाहीत. हे संभ्रम दूर झाले असते तर या आनंदोत्सवात गावकऱ्यांनी उत्साहात सहभाग घेतला असता."
- अख्तर मुल्ला, माजी नगरसेवक, पन्हाळा
"पन्हाळ्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्याने पन्हाळा जगाच्या नकाशावर पोहोचला आहे. त्यामुळे पन्हाळ्याला विदेशी पर्यटक देखील भेट देतील. पर्यटकांची संख्या वाढल्याने पन्हाळ्याच्या पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस येणार आहेत."
- चेतनकुमार माळी, मुख्याधिकारी, पन्हाळा