For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

World Heritage: पन्हाळ्याच्या इतिहासाचा मान राखूया, रक्षणासाठी आपण ढाल बनूया..

11:23 AM Jul 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
world heritage  पन्हाळ्याच्या इतिहासाचा मान राखूया  रक्षणासाठी आपण ढाल बनूया
Advertisement

या पन्हाळ्याची अवस्था आजही कस्तुरीमृगासारखीच आहे, कारण...

Advertisement

By : सुधाकर काशीद

कोल्हापूर : पन्हाळगडाने छत्रपती शिवरायांच्या शौर्यशाली इतिहासाचा थरार अनुभवला, छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द पाहिली, राजाराम महाराजांच्या कारकिर्दीच्या साक्षीदार राहिला. महाराणी ताराराणींनी तर पन्हाळगडालाच मराठ्यांची राजधानी बनवली.

Advertisement

इतका सारा इतिहास उदरात घेऊन उभ्या असलेल्या पन्हाळ्याच्या मातीचे मोठेपण अमूल्यच आहे. युनेस्कोची यादी हे त्याचे एक परिमाण जरूर आहे. युनेस्को’मुळे हा इतिहास जगासमोरही जाणार आहे. पण या पन्हाळ्याची अवस्था आजही कस्तुरीमृगासारखीच आहे.

कस्तुरीचा सुगंध त्याच्या बेंबीतच दडला होता आणि मृग मात्र सुगंध शोधत फिरत होता. निदान आता तरी युनेस्कोच्या माध्यमातून त्यांच्या मोठेपणावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता तरी पन्हाळ्याच्या रक्षणासाठी सर्वांनी ढाल म्हणून पुढे येण्याची गरज आहे.

पन्हाळा म्हणजे मौजमजा, पार्टीचे ठिकाण. पन्हाळ्याचा पाऊस म्हणजे मान्सून ट्रेक, पन्हाळ्याचा गारवा म्हणजे उघड्या माळावर बसून रिचवले जाणारे पेग, हे चित्र बदलावेच लागणार आहे. केवळ युनेस्कोच्या निर्बंधामुळे नव्हे, तर पन्हाळ्याच्या इतिहासाचा मान म्हणून.

हे याआधीच व्हायला पाहिजे होते. पण पन्हाळा आपण सर्वांनी इतका ‘स्वस्त’ केला की पन्हाळ्याचा इतिहासच मौजमजेच्या वातावरणात दडून गेला. पन्हाळ्यावर देशभरातून पर्यटक जरूर येत राहिले. पण पन्हाळ्याचा इतिहास पर्यटकापर्यंत नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे मुंबई येथून येणाऱ्या पर्यटकांपर्यंतही जसा जमेल तसाच पोहोचला.

पन्हाळा म्हणजे रंगीत-संगीत सहलीचा गड म्हणूनच नव्या पिढीच्या मनावर ठसला. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी रात्री पन्हाळ्यावर शिवज्योत पेटवायचे ते ठिकाण ठरला. पन्हाळा लोकांसमोर आला तो शिवकालीन इतिहासातील काही महत्त्वाच्या घडामोडीमुळे. पण पन्हाळ्यावर त्या अंगाने हा इतिहास अनुभवण्यासाठी, पाहण्यासाठी खूप कमी लोक आले.

तीन दरवाजा, पुसाटी बुरुज, नायकिणीचा सज्जा, धान्याचे कोठार एवढी ठिकाणे बघायची. तीन दरवाजा परिसरात खाणेपिणे करायचे आणि अंधार पडू लागला की पन्हाळा सोडून खाली उतरायचे, हाच बहुतेक पर्यटकांचा प्रघात ठरलाज्या पन्हाळ्यावर आपण पेग रिचवत पार्टी करत आहे त्या पन्हाळ्यावर खुद्द शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यामुळे तीन महिने अडकून पडले होते. म्हणजे सलग तीन महिने शिवाजी महाराजांचे वास्तव्य पन्हाळ्यावर होते.

यामुळे इथल्या मातीच्या प्रत्येक कणाला शिवरायांचा पदस्पर्श आहे. आता हा इतिहासच बाजूला पडला होता. मावळ्यांच्या शौर्याचा अद्वितीय इतिहास प्रत्येक जण जमेल तसा सांगू लागला. अलीकडच्या काळात पन्हाळा-पावनखिंड मोहिमेमुळे या इतिहासाला जरूर उजाळा मिळत आहे. पण या मोहिमेतील काही जणांनी पन्हाळा- पावनखिंड मोहिमेला इव्हेंटचे स्वरूप दिले आहे.

पन्हाळा बहुतेकांना शिवकालापासून माहिती आहे. पण पन्हाळ्याचा इतिहास दहाव्या, अकराव्या शतकापासूनचा आहे. पन्हाळ्यावरच्या सर्वच वास्तू शिवकालीन नाहीत. त्या अगोदरच्या राजवटीतील आहेत. पन्हाळा गावठाण आहे. किल्ल्यावर एवढी मोठी वस्ती असलेला हा देशातील एकच किल्ला आहे.

पन्हाळ्यावरील लोकवस्तीची माहिती घेता तेथे बारा बलुतेदारांची पिढ्यान्पिढ्या वस्ती आहे. पन्हाळ्यावर पाण्याचे नैसर्गिक स्त्राsत आहेत. हिंदू-मुस्लिमांची दैवते आहेत. साधोबाच्या दर्ग्यावर पर्शियन शिलालेख आहे. तो मोहम्मदशहा बहामनीच्या काळातील आहे. या कालावधीतील ते बांधकाम आहे.

पन्हाळा थंड हवेचे ठिकाण असल्यानेपर्यटकांचीही जरूर गर्दी असते. त्या पर्यटनावर पन्हाळ्याचा आर्थिक विकास जोडला आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले. पन्हाळ्यावर पाचशे, सहाशे वर्षांपूर्वीची बांधकामे आहेत ती बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. नायकिणीचा सज्जा मात्र आपले अस्तित्व कसेबसे टिकवून आहे.

यातील तीन दरवाजा, वाघ दरवाजा, धान्याचे कोठार, पुसाटी बुरुज, पावनगडाचा अधिक इतिहास जाणून घेण्याची नक्कीच गरज आहे. पन्हाळ्याचा युनेस्कोच्या यादीत समावेश केला म्हणून त्याचा इतिहास जागतिक पातळीवर अधोरेखित झाला आहे. पण आपण या किल्ल्याच्या सहवासात राहूनही त्याचे मोल जाणून घेण्यास कमी पडलो, हे मात्र निश्चितच कबूल करावे लागणार आहे.

सचिन पाटील यांचा पुरातत्वीय अंगाने अभ्यास

सचिन पाटील यांनी पन्हाळ्याच्या भूगर्भातील दगडांच्या रचनेपासून ते सर्व वास्तुचा अभ्यास करत आहेत. त्या अभ्यासासाठी त्यांनी त्या काळातील कर्नल जेम्स वेल्स यांनी पन्हाळ्याची काढलेली पाच दुर्मिळ छायाचित्रे मिळवली आहेत. पन्हाळ्याचा नकाशा मिळवला आहे. हाताने काढलेली त्या काळातील पन्हाळ्याची चित्रे त्यांच्याकडे आहेत.

नको त्या चिंतेत मूळ पन्हाळकर

युनेस्कोमुळे पन्हाळगडावर काही निर्बंध येणार, हे खरेच आहे. पण त्याची भीती फक्त बेकायदेशीर काहीही करणाऱ्यांना आहे. मूळ पन्हाळकरांना काहीजण जाणीवपूर्वक भीती घालत आहेत. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा येऊनही पन्हाळकर आपल्या अस्तित्वाचे काय होणार, असल्या विनाकारण चिंचेत आहेत.

दरवाजावर कविता

पन्हाळ्याच्या तीन दरवाजा वास्तूवर दहाव्या शतकातील ओमर खय्याम या इराणी कवीच्या कवितेतील ओळी दगडावर कोरलेल्या आहेत.

वाघ दरवाजा

पन्हाळ्याच्या वाघ दरवाज्याचा संदर्भ इब्राहिम आदिलशहा दुसरे यांच्या काळाशी जोडला जातो आणि त्याच्या कमानीवर जो शिलालेख आहे त्याच्यावर गणपतीची मूर्ती आहे. पण त्या मूर्तीच्या डोक्यावर मुकुटाऐवजी मंदिल आहे.

विपश्यनेसाठी खोल्या

पन्हाळा अभ्यासकांच्या माहितीनुसार आता मेघदूत हॉटेलच्या पाठीमागील बाजूस भूगर्भात असलेल्या विपश्यना किंवा ध्यान धारणेच्या खोल्या आहेत.

Advertisement
Tags :

.