For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागतिक कुरणक्षेत्र वर्ष 2026

06:30 AM Jan 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
जागतिक कुरणक्षेत्र वर्ष 2026
Advertisement

संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाचे वर्ष जागतिक स्तरावर कुरणांचे पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरे करण्याचे जाहीर केले आहे. खरंतर यापूर्वी 6 मे जागतिक कुरण दिन म्हणून यापूर्वीच साजरा केला जात असून, त्यामुळे गवताळ प्रदेशाचे महत्त्व आणि त्यांच्या समोरील आव्हाने या विषयीचा उहापोह केला जातो. कुरण जमीन, खरंतर पडीक, नापीक आणि उपयोग नसलेली मानून, मागचा पुढचा विचार न करता, त्या प्रामुख्याने विमानतळे, औद्योगिक वसाहती उभारण्यासाठी विकसित केल्या जातात आणि त्यामुळे जगभरात अशी कुरणे झपाट्याने विस्मृतीत जात आहेत.

Advertisement

पडीक, नापीक जमीन समजून, कुरणे दुर्लक्षित ठरलेली आहेत. पृथ्वीवर आज 24 टक्के गवताळ भूमी असून, प्रस्तावित विकास प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी त्यांचा वापर होत असल्याने, त्यांचे अस्तित्व संकटग्रस्त झाले आहे. इसवी सन पूर्व 10 हजार वर्षांपूर्वी मनुष्य काही जंगली श्वापदांना माणसावळून त्यांचे कळप बाळगू लागला आणि त्यातून पशुपालक समाज उदयाला आला. कुरणांचा प्रदेश प्रामुख्याने गवताने व्यापलेला, विशाल, सपाट, किंचित उताराचा असतो. भारतीय लोकमानसाने या कुरणाचे महत्त्व ओळखले होते आणि त्यासाठी आपली पाळीव गुरेढोरे, बकऱ्या, मेंढ्या, उंट पोसताना, त्यांना चरण्यासाठी अशा कुरणात सोडले जायचे. अशा कुरणात अनेक वनस्पती आणि जंगली श्वापदांचा नैसर्गिक अधिवास असतो. भारतात अशी कुरणे पाळीव तृणहारी जनावरांच्या चरण्यासाठी राखीव ठेवण्याची परंपरा होती. अशी गायराने, गव्हाणी, गोठणी संरक्षित होत्या. तृणपाती, औषधी वनस्पतींनीयुक्त कुरणे समाजाने राखली होती. तृणहारी प्राण्यांच्या वैरणासाठी अशी कुरणे उपयुक्त होती आणि तेथे प्रामुख्याने द्विदल वर्गातील वनस्पती असायच्या.

एकेकाळी भारतभर विखुरलेल्या पशुपालक जातीजमातींना कुरणे त्यांच्या पाळीव जनावरांसाठी चारा आणि त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था करायची. 1970 साली जगात 300 कोटी हेक्टर क्षेत्र कुरणाखाली होते तर भारतात 140 लाख हेक्टरांत कुरणे वसली होती. अशा कुरणांतून चाऱ्याचे हेक्टरी उत्पादन 5 ते 10 टन मिळायचे. गवतांनी समृद्ध असणारी कुरणे खरंतर जमिनीची पावसाच्या माऱ्याने होणारी धूप नियंत्रित करण्याबरोबर मृदेचे आरोग्य संवर्धित करण्यात महत्त्वाचे योगदान द्यायची. अशा कुरणात तृणपात्यांच्या नानाविविध प्रजातींबरोबर लसूणघास, रानमटकीची पैदासी व्हायची. पूर्वीच्या काळी अशा कुरणातून उपलब्ध होणाऱ्या गवताची कापणी करून, वाळवून त्याचे बिंडे बांधून, साठवून ठेवले जायचे आणि गरजेनुसार गुरांना खाद्यान्न म्हणून दिले जायचे. चाऱ्यातून गुराढोरांना प्रथिने,

Advertisement

कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्वे प्राप्त व्हायची. जेव्हा बाजारपेठेत आजच्यासारखी पेंड आणि अन्य कृत्रिम खाद्यान्न उपलब्ध नव्हते. तेव्हा अशी कुरणे गुराढोरांसाठी पौष्टिक आणि चवदार अन्नाचा स्रेत ठरली होती.

गवतांनी युक्त कुरणे मृगकुळातील हरण, चितळ, चौशिंगा, भेकरे, पिसय त्याच प्रमाणे गव्यासारख्या रानटी प्राण्यांसाठी जीवनाधार ठरली होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून अशा कुरणांचे अस्तित्व मिटवून तेथे काजू, अननस आणि अन्य नगदी बागायती पिकांचे उत्पादन घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे. वनखात्याने तर इथल्या पर्यावरणीय परिसंस्थेकडे कानाडोळा करून अकेशिया मँजेनियम, अकेशिया ओरिकूलस, युकालिप्टससारख्या वृक्षारोपणाला प्राधान्य दिले. त्यामुळे चारापाण्याच्या प्राप्तीसाठी तृणहारी जंगली श्वापदे शेती आणि बागायतीकडे आपला मोर्चा वळवत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि बागायतदार यांच्या तोंडचा घास मिळणे दुरापास्त होत असल्याने, त्यांच्यातला आणि जंगली श्वापदे यांच्यातला संघर्ष विकोपाला गेलेला आहे. एकेकाळी ज्या जमिनी कुरणक्षेत्र म्हणून राखून ठेवल्या होत्या तेथील पाण्याच्या मुबलक साठ्यामुळे या जमिनी शेती आणि बागायतीच्या क्षेत्राखाली आल्या आणि त्यामुळे पशुपालक जातीजमातींना त्यांच्या पाळीव जनावरांना चरण्यासाठी कुरणे शिल्लक राहिली नाहीत आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना पारंपारिक व्यवसायाचा त्याग करून, विस्थापित होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

धनगरांसाठी कुरणे गुराढोरांना चरण्यासाठी महत्त्वाचा आधार ठरली होती परंतु अशी कुरणे शेती आणि बागायतीच्या क्षेत्राबरोबर औद्योगिक आस्थापनासाठी वापरण्यात आल्याने शेळ्या, मेंढ्या आणि गुराढोरांना चरण्यासाठी कुठे न्यायचे हा प्रश्न आ ऽ वासून उभा राहिल्याने त्यांच्यावर विस्थापित होण्याची परिस्थिती आली. एकेकाळी गावोगावी पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाद्वारे लोकांना दूध, दही, ताक, तूप, लोणी, पनीर, चीज यांचा पुरवठा करणाऱ्या समाजाला, उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे उपजिविकेसाठी नव्या पर्यायांचा स्वीकार करणे भाग पडले. महाराष्ट्रात जेथे कुरणांनी युक्त पठारे होती, तेथे पशुपालक जातीजमातींची प्रामुख्याने वस्ती होती. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत अशा कुरणांनी युक्त पठारांवर प्रस्तर रेखाचित्रे कोरलेली पहायला मिळतात. बारसू, देवाचे गोठणे, बावल्याचे टेंब, देवी हसोळ, कशेळी आदी ठिकाणी गवताळ कुरणांच्या सान्निध्यात प्रस्तर रेखाचित्रांचे दर्शन घेता येते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी त्याचप्रमाणे गोवा राज्यात गवतांनी युक्त कुरणे अस्तित्वात आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध जांभ्या दगडांचे उत्खनन करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे पर्यावरणीय कायदे कानून यांना कवडीमोल ठरवून चिऱ्याच्या खाणींचे बेदरकारपणे प्रस्थ विस्तारत चालले आहे. त्यामुळे येथील पुरातत्वीय आणि ऐतिहासिक संचितांबरोबर ते वैविध्यपूर्ण जैविक संपदेचे वैभव इतिहासाच्या उदरात गडप होणार आहे.

औद्योगिकीकरण, नागरीकरणाच्या झंझावातात सरकारी यंत्रणा आपणाला सत्ताधारी नेत्यांकडून येणाऱ्या आदेशांचे पालन करण्यात धन्यता मानत असून, आपल्या कुरणातील जैविक संपदा त्याचप्रमाणे पर्यावरणीय परिसंस्था यांना बेदखल करण्याच्या कृत्यामुळे तेथील पशुपालक जातीजमातींच्या विस्थापनाबरोबर तृणहारी प्राण्यांबरोबर त्यांच्या शिकारीवर अवलंबून असणाऱ्या बिबटे, वाघ यासारख्या मांसाहारी जंगली जनावरांचे विस्थापन होणार आहे याचे भान राहिलेले नाही. त्यामुळे एकेकाळची गवताळ प्रदेशाने युक्त कुरणे औद्योsगिक आस्थापने, नागरी वस्ती, पायाभूत साधन सुविधांचे प्रकल्प यांच्या विस्ताराखाली आपले मूळचे नैसर्गिक वैभव झपाट्याने हरवत चालली आहे आणि त्यामुळे या कुरणक्षेत्रांचे अस्तित्व आणि तेथील निसर्ग, पर्यावरण राखणे महत्त्वाचे असून, त्यादृष्टीने कुरणक्षेत्राच्या संवर्धन आणि संरक्षणाच्या विचाराला कृतीत आणण्याची नितांत गरज आहे.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :

.