For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विविध ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा

10:54 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
विविध ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा
Advertisement

बेळगाव शुगर्स

Advertisement

हुदली येथील बेळगाव शुगर्सच्या आवारात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन व मुख्य आर्थिक अधिकारी प्रदीपकुमार इंडी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ उपाध्यक्ष एल. आर. कारगी, उपाध्यक्ष ए. एस. राणा, मुख्य व्यवस्थापक एस. आर. बिर्जे, एन. बी. चौगुला, बी. ए. पाटील व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. पर्यावरणाला धक्का पोहोचला तर प्रत्येकाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन प्रदीपकुमार इंडी यांनी केले. देशाची राजधानी नवी दिल्ली येथे पारा 52.3 वर पोहोचला होता. भविष्यात तो आणखी वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती, संस्था, संघटनांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले. कारखान्याच्या आवारात 4 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. चालू वर्षी आणखी दीड हजार झाडे लावून त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे.

मारवाडी युवा मंच

Advertisement

मारवाडी युवा मंचतर्फे मच्छे येथे कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या कार्यालय परिसरात विविध प्रकारची रोपे लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध प्रकारच्या फळांच्या एकूण शंभर रोपांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष राधेश्याम तोष्णीवाल यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. यावेळी इव्हेंट चेअरमन अभिमन्यू दादा यांनी पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत केले. खजिनदार नटवर मोदानी यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी अध्यक्ष गोपाळ उपाध्याय, मधु भट्टड, अजय हेडा, आकाश अगरवाल, रविराज पुरोहित, उमेश शर्मा उपस्थित होते.

विमल फाऊंडेशन

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विमल फाऊंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांनी परिसरात रोपलागवड करून ‘झाडे लावा झाडे जगवा’चा संदेश दिला. जीवनात प्रत्येकाने एक तरी रोपटे लावून जगवावे, आपापल्या परिसरात झाडे लावून त्यांचे संगोपन करावे व ढासळत चाललेल्या पर्यावरणाचा समतोल राखावा, असे ते म्हणाले. याप्रसंगी लक्ष्मण पवार, वनखात्याचे चैतन्य कुलकर्णी तसेच अन्य अधिकारी, फाऊंडेशनचे सदस्य चेतन नंदगडकर, अभिषेक वेर्णेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा प्रशासन

जिल्हा प्रशासनातर्फे सुवर्ण विधानसौध आवारात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकरी महिलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना फळांच्या रोपांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपवन संरक्षणाधिकारी के. एस. गोरवर, साहाय्यक वनसंरक्षणाधिकारी खेमसिंग डी. राठोड, बैलहोंगल येथील सामाजिक वनीकरण उपविभागाचे संरक्षण अधिकारी शिवरुद्राप्पा कबाडगी, प्रादेशिक उपविभाग वनसंरक्षण अधिकारी बेळगाव पुरुषोत्तम, विभागीय वनसंरक्षणाधिकारी गिरीश इटगी आदी उपस्थित होते. यासह बस्तवाड गावातील ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, महांतेशनगर सेवा केंद्र आणि एस. निजलिंगप्पा साखर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वविद्यालयाच्या आवारात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून निजलिंगप्पा साखर संस्थेचे संचालक डॉ. खांडगावे उपस्थित होते. यावेळी खांडगावे यांनी साखर कारखान्यांपासून येणाऱ्या धुरामुळे पर्यावरणावर परिणाम होत असल्याचे सांगितले. धुराद्वारे येणाऱ्या कार्बन मोनाक्साईड व दूषित पाण्यामुळे तसेच वाहनांमधून येणाऱ्या धुरांमुळेही पर्यावरणावर परिणाम होत आहे. यामुळे ओझोन थरावर परिणाम होत असल्याने उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. यामुळे ऋतुमानावरही परिणाम झाला आहे. यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे व वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी राजयोगिनी बी. के. अंबिका होत्या. त्यांनी पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी बी. के. मंजुळा, सी. बी. पाटील, प्रा. ए. आर. तारदाळी, बी. के. प्रतिभा, बी. के. विश्वनाथ आदी उपस्थित होते. प्रा. रत्नश्री यांनी मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले.

स्काऊट अँड गाईड

कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन, कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा कायदा सेवा प्राधिकार, विज्ञान केंद्र बेळगाव, भारत स्काऊट अँड गाईड या संस्थांच्यावतीने दि. 5 रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी 10 वाजता व्हॅक्सिन डेपोजवळील स्काऊट अँड गाईड भवन येथून टिळकवाडी परिसरामध्ये जागृती फेरी काढण्यात आली. पर्यावरणासंदर्भात स्काऊटमधील बहुसंख्य बुलबुल (विद्यार्थी) फेरीमध्ये जनजागृती करणारे फलक घेऊन सहभागी झाले होते. या फेरीचे उद्घाटन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गोपालकृष्ण सनतंगी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर स्काऊट अँड गाईडच्या इमारतीमध्ये मुख्य कार्यक्रम झाला. त्याचे उद्घाटन कायदा सेवा प्राधिकारचे कार्यवाह मुरली मनोहर रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून भारत स्काऊट अँड गाईडचे राज्य उपाध्यक्ष गजानन मण्णीकेरी तसेच बेळगाव असोसिएशन फॉर सायन्सचे कार्यवाह के. बी. हिरेमठ, परिसर अधिकारी शोभा पोळे, स्काऊट अॅण्ड गाईडचे अधिकारी विठ्ठल उपस्थित होते. प्रारंभी प्रार्थना झाल्यानंतर प्रास्ताविक व स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांची पर्यावरणाचे महत्त्व सांगणारी भाषणे झाली. याप्रसंगी गोपालकृष्ण सनतंगी यांनी पर्यावरण म्हणजे काय? याची माहिती दिली. मुरली मनोहर रेड्डी यांनी आपल्या जीवनात पर्यावरणाचे महत्त्व काय? याबद्दल मार्गदर्शन केल्यानंतर मण्णीकेरी यांनी समारोप केला.

शेख बीएड कॉलेज

शेख शिक्षण महाविद्यालयात (बीएड) बुधवारी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. इंदिरा सुतार होत्या. स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता. पर्यावरण संरक्षण ही आपली जबाबदारी या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रथम सितीन शेख, द्वितीय संतोष बजंत्री, तृतीय पूजा अंगडी यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले. त्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

Advertisement
Tags :

.