विश्वचषकाच्या अंतिम लढतीची खेळपट्टी ‘अॅव्हरेज’ : आयसीसी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी ज्या ठिकाणी खेळविण्यात आला होता त्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) ‘अॅव्हरेज’ ठरविले आहे. ‘आयसीसी’चे सामनाधिकारी आणि झिम्बाब्वेचे माजी फलंदाज अँडी पायक्रॉफ्ट यांनी आउटफिल्डला मात्र ‘खूप चांगले’ म्हटले आहे.
संथ खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव करून विश्वचषक जिंकला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारताला 50 षटकांत केवळ 240 धावा करता आल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाने सलामीवीर ट्रॅव्हिस हेडच्या 120 चेंडूंतील 137 धावांच्या जोरावर 43 षटकांत लक्ष्य गाठले होते. कोलकाता, लखनौ, अहमदाबाद आणि चेन्नई येथील ज्या खेळपट्या भारताच्या दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पाकिस्तान आणि ‘अॅव्हरेज’ ठरविले आहे.
तथापि, ज्या वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना केला त्याला ‘चांगले’ असे रेटिंग मिळाले आहे. त्या सामन्याच्या अगोदर यजमानांनी खेळपट्टी बदलल्याचे आणि ताज्या खेळपट्टीऐवजी वापरलेल्या खेळपट्टीवर सामना खेळविल्याचे सूचविणाऱ्या बातम्या प्रसिद्धीमाध्यमांत झळकल्या होत्या. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्याचे आयोजन ज्या ठिकाणी झाले त्या कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीलाही आयसीसीने ‘अॅव्हरेज’ रेटिंग दिले आहे. हा कमी धावसंख्येचा सामना ठरून त्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 49.4 षटकांत 212 धावांवर बाद केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 47.2 षटकांत सात गडी गमावून लक्ष्य पार केले होते. ‘आयसीसी’ सामनाधिकारी आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने मात्र ईडन गार्डन्सवरील ‘आऊटफिल्ड’ला ‘खूप चांगले’ ठरविले आहे.