For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विश्वचषकामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत 1.39 अब्ज डॉलर्सची भर

06:46 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
विश्वचषकामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत 1 39 अब्ज डॉलर्सची भर
Advertisement

‘आयसीसी’च्या अहवालात दिलेली माहिती : सर्वाधिक फायदा झालेल्यांमध्ये पर्यटन क्षेत्राचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतातील 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेने 1.39 अब्ज डॉलर्सची आर्थिक भर टाकली आणि त्याचा सर्वांत मोठा लाभ झालेल्यांमध्ये पर्यटनाचा समावेश होतो.

Advertisement

‘आयसीसी’साठी ‘निल्सन’ने आयोजित केलेल्या आर्थिक प्रभाव मूल्यांकनात असा दावा करण्यात आला आहे की, गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित केलेला सदर मेगा-इव्हेंट ही आतापर्यंतची सर्वांत मोठी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ठरली आहे. ‘आयसीसी पुऊष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, 2023 ने क्रिकेटची महत्त्वपूर्ण आर्थिक शक्ती प्रदर्शित केली, ज्यामुळे भारताला 1.39 अब्ज डॉलर्सचा (11,637 कोटी ऊपये) आर्थिक फायदा झाला’, असे ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉफ अॅलार्डिस यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाने स्पर्धेतील भारताची अपराजित वाटचाल संपवून विक्रमी सहाव्यांदा ट्रॉफी जिंकली. ‘सामन्यांना मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी पर्यटक उपस्थित राहिल्यामुळे निवास, प्रवास, वाहतूक आणि खाद्यपदार्थ व पेये याद्वारे यजमान शहरांमधील पर्यटन क्षेत्रात 861.4 दशलक्ष डॉलर्सचा महसूल निर्माण झाला’, असे आयसीसीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘अर्थव्यवस्थेतील दुय्यम आणि वाढीव खर्च हा चालना देणारा मुख्य घटक ठरून त्यातून 515.7 दशलक्ष डॉलर्स उभे राहिले, जे एकूण परिणामाच्या अंदाजे 37 टक्के राहिले’, असेही आयसीसीच्या अहवालात म्हटले आहे. तथापि, आयसीसीने अहवालात नमूद केलेला मोठा आकडा हा वास्तविक महसूल आहे की नाही हे स्पष्ट केलेले नाही. या मेगा इव्हेंटला विक्रमी 1.25 दशलक्ष प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. त्यापैकी जवळपास 75 टक्के प्रेक्षकांनी पहिल्यांदाच आयसीसीच्या 50 षटकांच्या सामन्याला हजेरी लावली होती, असा दावा त्यात करण्यात आला आहे.

‘आंतरराष्ट्रीय पर्यटकांपैकी जवळपास 55 टक्के लोकांनी याआधी नियमितपणे भारताला भेट दिली होती, तर विश्वचषकासाठी नवीन पाहुणे येऊन सुमारे 19 टक्के विदेशी पर्यटकांनी प्रथमच देशाला भेट दिली. विदेशी पर्यटकांनी त्यांच्या मुक्कामादरम्यान अनेक पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. यामुळे 281.2 दशलक्ष डॉलर्स उत्पन्न मिळाले. तसेच स्पर्धा आयोजन आणि आदरातिथ्य उद्योगासारख्या अन्य क्षेत्रांमध्ये 48,000 हून अधिक पूर्ण आणि अर्धवेळ नोक्रया निर्माण झाल्या, असे त्यात पुढे म्हटले आहे..

Advertisement
Tags :

.