वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कसोटीसाठी सज्ज
पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा : पॅट कमिन्सच कर्णधार : कॅमेरॉन ग्रीन, ट्रेव्हिस हेडला संधी
वृत्तसंस्था/ सिडनी
आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ आता काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. मायदेशात पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारी आपला 14 सदस्यीय संघ जाहीर केला. पॅट कमिन्सकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा कायम ठेवण्यात आली असून कॅमेरॉन ग्रीन, ट्रेव्हिस हेड, जोस हॅजलवूड यांचे संघात पुनरागमन झाले आहे. उभय संघातील पहिली कसोटी दि. 14 डिसेंबरपासून पर्थ येथे खेळवण्यात येईल.
इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेत संघाबाहेर बसावे लागलेल्या नवोदित अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनही 14 सदस्यीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. दुसरीकडे, अनुभवी यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरेवर निवड समितीने विश्वास कायम ठेवताना संघात स्थान दिले आहे. विशेष म्हणजे, फिरकीपटू नॅथन लियॉन दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. लियॉनच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला अॅशेसच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर व्हावे लागले होते. पण आता दुखापतीतून सावरल्यामुळे लियॉनची संघात वर्णी लागली आहे. याशिवाय, उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ यांना संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीसाठी संघात 6 गोलंदाजांचा समावेश केला आहे. कर्णधार कमिन्ससह स्कॉट बोलँड, जोस हॅजलवूड, नॅथन लियॉन, मिचेल स्टार्क आणि लान्स मॉरिस यांचाही संघात समावेश आहे.
वॉर्नरची शेवटची मालिका
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवडलेल्या ऑस्ट्रेलियन संघात अनुभवी डेव्हिड वॉर्नरलाही संधी मिळाली आहे. वॉर्नरने आपला शेवटचा कसोटी सामना सिडनीत खेळण्याची इच्छा यापूर्वीच व्यक्त केली होती. यानंतर तो कसोटी क्रिकेटला अलविदा करणार आहे. घरच्या मैदानावर पाकविरुद्ध खेळताना वॉर्नर ही मालिका संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्नशील असेल. उभय संघातील तीन सामने होणार असून यातील पहिला सामना 14 ते 18 डिसेंबर दरम्यान पर्थ येथे, दुसरा सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न येथे तर तिसरा सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान सिडनी येथे होणार आहे.
पाकविरुद्ध कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरे (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, जोस हॅजलवूड, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, लान्स मॉरिस, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.