जगज्जेत्या गुकेशचे चेन्नईत शानदार स्वागत
वृत्तसंस्था/ चेन्नई
नवा बुद्धिबळ जगज्जेता डी. गुकेश सोमवारी मायदेशी परतला असता त्याचे उत्स्फूर्त स्वागत झाले. शेकडो उत्सुक चाहते, तमिळनाडू सरकारातील आणि राष्ट्रीय महासंघाचे अधिकारी विमानतळावर त्याचे स्वागत करण्यासाठी रांगेत उभे होते. या 18 वर्षीय खेळाडूने गेल्या आठवड्यात सिंगापूरमध्ये चीनच्या डिंग लिरेनचा 7.5-6.5 असा पराभव करून सर्वांत तऊण विश्वविजेता बनण्याचा मान मिळविला. 1985 मध्ये 22 वर्षांचे असताना रशियन ‘आयकॉन’ गॅरी कास्पारोव्हने स्थापित केलेल्या विक्रम त्याने मोडीत काढला.
आगमन झाल्यानंतर गुकेशने त्याला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. ‘हे आश्चर्यकारक आहे. तुमच्या पाठिंब्याने मला खूप ऊर्जा दिली. जागतिक अजिंक्यपद जिंकण्याची भावना ही जबरदस्त आहे’, असे गुकेश म्हणाला. माध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी करण्याबरोबर चाहते या तऊणाला जवळून पाहण्याचा प्रयत्न करताना दिसले. ‘भारतात हा चषक परत आणणे खूप अर्थपूर्ण आहे. या स्वागतासाठी धन्यवाद. मला आशा आहे की, पुढील काही दिवस आपण एकत्र आनंद साजरा करू’, असे तो पुढे म्हणाला.

कामराज विमानतळावर तो पोहोचताच तामिळनाडूच्या क्रीडा विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आणि त्याच्या वेलाम्मल विद्याला शाळेच्या कर्मचाऱ्यांनी त्याचे स्वागत केले आणि नंतर विमानतळाच्या लाउंजमध्ये शाल घालून स्वागत करण्यात आले. वेलाम्मल शाळेतून गुकेशने त्याचा बुद्धिबळाचा प्रवास सुरू केला होता. वाट पाहणाऱ्या चाहत्यांनी स्वागत केल्यानंतर गुकेश फुलांनी सजविलेल्या आणि त्याचे छायाचित्र लावलेल्या कारने घरी निघून गेला. आज मंगळवारी त्याचे वल्लाहजाह रोड येथील कलैवनार अरंगम येथे भव्य स्वागत केले जाईल आणि त्याला एका खास मिरवणुकीने प्रतिष्ठित सभागृहात नेले जाईल. गुकेशला पाच कोटी ऊपयांचा धनादेश देण्यासाठी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन या कार्यक्रमादरम्यान उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
‘केवळ रणनीती नव्हे, तर दबाव योग्यरीत्या हाताळणेही कामी आले’
आपले इतिहास रचणारे जगज्जेतेपद हे केवळ बुद्धिबळ पटावरील चांगल्या रणनीतीचाच परिणाम नव्हते, असे भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने सोमवारी सांगितले. सर्वांत मोठ्या टप्प्यावरील स्पर्धेत उतरल्यानंतर येणाऱ्या भावनिक दबावाला नियंत्रणात ठेवण्यास मदत केल्याबद्दल मानसिक प्रशिक्षक पॅडी अप्टन यांना त्याने श्रेय दिले. ‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही फक्त बुद्धिबळपुरते नसते. तिथे खूप मानसिक आणि भावनिक दबाव असतो. पॅडींच्या शिकवण्यांनी मला त्याबाबतीत मदत केली’, असे गुकेश त्याच्या बालपणीची शाळा वेल्लामल विद्यालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला. ‘त्याने केलेल्या सूचना आणि त्याच्याशी झालेले संभाषण माझ्यासाठी, एक खेळाडू म्हणून विकास होण्याच्या बाबतीत खूप महत्त्वपूर्ण राहिलेले आहे’, असेही गुकेशने सांगितले.